रामजणगावच्या गढी शेजारी माती - शेणानं सारवलेल्या भिंती असलेलं अत्यंत स्वच्छ , चौसोपी , प्रशस्त घर , ओसरीच्या खुंटीवर टांगलेले टाळ , पाटावर ठेवलेली ज्ञानेश्वरी व बाजूला असलेली वीणा . डोईवर भरदार पागोटे , प्रसन्न चेहरा , निरागस डोळे , झुबकेदार मिशांतून खुललेली पारमार्थिक चर्चा . , ज्ञानदेव , तुकारामांच्या ओवी - अभंगातून शेत - मळयाचे भान विसरलेले दादा आणि आल्या - गेलेल्यांची आस्थेने वास्त - पुस्त करुन त्यांच्या आतिथ्यात कमी पडू नये म्हणून स्वत : ला पुरते विसरलेल्या नानांच्या मातोश्री . ' प्रपंची असावे । असोनि नसावे । ' अशा वारकरी कुटुंबातून नानांची जडण - घडण झाली . सावकारी , जमीनदारी गाव . दादा आणि आजींनी स्वत : तालेवार नसूनही आल्या - गेलेल्यांची निकङ पुरी करावी , भाकरीतला घास - तुकडा देऊन भुकेल्यांची भूक भागवावी . प्रेमानं विचारपूस करावी . देता येईल तेवढं देत रहावं , लहान - मोठयांचं कोड कौतुक करावं , मायेच्या चार शद्वांनी गावातील सायऱ्यांवर , कारु - नारूंवर , बलुतेदारांवर , सालदारांवर , त्यांच्या लेकी - बाळींवर , पै - पाहुण्यांवर प्रेमाचा वर्षाव करावा असं हे मोठया मनाचं . दिलदा...