रामजणगावच्या गढी शेजारी माती - शेणानं सारवलेल्या भिंती असलेलं अत्यंत स्वच्छ , चौसोपी , प्रशस्त घर , ओसरीच्या खुंटीवर टांगलेले टाळ , पाटावर ठेवलेली ज्ञानेश्वरी व बाजूला असलेली वीणा . डोईवर भरदार पागोटे , प्रसन्न चेहरा , निरागस डोळे , झुबकेदार मिशांतून खुललेली पारमार्थिक चर्चा . , ज्ञानदेव , तुकारामांच्या ओवी - अभंगातून शेत - मळयाचे भान विसरलेले दादा आणि आल्या - गेलेल्यांची आस्थेने वास्त - पुस्त करुन त्यांच्या आतिथ्यात कमी पडू नये म्हणून स्वत : ला पुरते विसरलेल्या नानांच्या मातोश्री . ' प्रपंची असावे । असोनि नसावे । ' अशा वारकरी कुटुंबातून नानांची जडण - घडण झाली . सावकारी , जमीनदारी गाव . दादा आणि आजींनी स्वत : तालेवार नसूनही आल्या - गेलेल्यांची निकङ पुरी करावी , भाकरीतला घास - तुकडा देऊन भुकेल्यांची भूक भागवावी . प्रेमानं विचारपूस करावी . देता येईल तेवढं देत रहावं , लहान - मोठयांचं कोड कौतुक करावं , मायेच्या चार शद्वांनी गावातील सायऱ्यांवर , कारु - नारूंवर , बलुतेदारांवर , सालदारांवर , त्यांच्या लेकी - बाळींवर , पै - पाहुण्यांवर प्रेमाचा वर्षाव करावा असं हे मोठया मनाचं . दिलदार अन्त : करणाचं , साधु सत्पुरुषाचं घर सर्वांसाठी खुलं होत . जात , धर्म , पंथ , श्रेष्ठ - कनिष्ठ , उच्च - नीच या सर्वांना दादांनी तिलांजली दिली होती . समत्व , शुचित्वाचा पायरव घरात होता . अशा वातावरणात नानांच्या वैचारिक , भावनिक व सामाजिक पिंडाची जडण - घडण साकारत होती .
' शुध्द बीजा पोटी । फळे रसाळ गोमटी । ' पुत्र व्हावा ऐसा गुंडा । ज्याचा तिही लोकी झेंडा ।। ' ' कुळी कन्या - पुत्र असती जे सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ।। '
यासारखी वचने अधुन - मधून कानावर पडत . परंतु घरातील सोज्वळ , पारमार्थिक , संस्कृती संपन्न आचरणातून नानांच्या व्यक्तीमत्वात कळत - न - कळत बदल होत गेले . कायद्याचे पदवीधर होत असतांनाच दादा आणि आजीच्या संस्कारांनी मंडित झालेल्या नानांचे अंत : करण अठराविश्वे दारिद्रयात खितपत पडलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा - वेदनांनी गहिवरून येई . ज्ञानेश्वरांच्या ' ज्ञानेश्वरीने ' , तुकोबांच्या ' गाथेने ' , विनोबांच्या ' गीताई ' ने आणि सानेगुरूजींच्या ' श्याम ' , श्यामची आई , पत्री ' ने नानांच्या अन्तर्बाहय जीवनात बदल घडवून आणला . ' गोर - गरीब , दीन - दलित , त्रस्त बहुजन समाजाविषयीच्या तळमळीने नानांनी आपले जीवनसूत्र निर्धारित केले . ' बहुजन हिताय । बहुजन सुखाया ' हा त्यांच्या उक्ती आणि कृतीचा धागा बनला . पन्नास वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रीय समाजातील होत असलेल्या परिवर्तनाची पार्श्वभूमी आणि चिंतन मननातून मनाचा ठाम निश्चय झाला . परिपूर्तीच्या दिशेने टाकलेली विचारपूर्वक पाउले नानांच्या प्रारंभीच्या जीवनकार्यातील या काही ठळक पाऊलखुणा ,
पन्नास वर्षापूर्वीच्या कायद्याच्या पदवीधराला लठ्ठ पगाराची नोकरी स्वीकारून फर्स्ट क्लास गॅझेटेड ऑफिसर म्हणून माना सन्मानाने , सुखा - समाधानाने जीवन जगता आले असते . आणि ' मला काय त्याचे ' ? अशा बेफिकीर वृत्तीने जीवन घालविता आले असते . परंतु ' अंतरीचे धावे । स्वभावे बाहेरी । यत्न परोपरी करोनिया ।। ' या उक्तीप्रमाणे नानांच्या समोर फक्त स्वत : चा संसार नव्हता . दृष्टी केवळ स्वकीयांपुरतीच मर्यादित नव्हती . केवळ घरादारापुरताच मर्यादित विचार नव्हता . गांधीजींच्या आंदोलनाने नानांच्या मनात पुरते घर केले होते . असहकार , सत्याग्रह यासारख्या आंदोलनात सक्रीय सहभागही नानांनी घेतला . परंतु नानांचा पीड हा राजकारणाचा नव्हता . जोतिबा फुले , कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आदर्श त्यांचे समोर होते . बहुजन समाजासाठी शिक्षण हाच मरणोपाय आहे अशी खात्री पटताच नाना शिक्षण क्षेत्रात उतरले . शिक्षकी पेशा पत्करला . अल्पावधीतच नाना विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागलेत . नानांनी गणित , भूमिती शिकविता शिकविता जीवनाचे गणित शिकवावे . भूमितीतील प्रमेये शिकवितांना जीवनातील प्रमेये सोडविण्याची दिशा दाखवावी . साने गुरूजींचा आदर्श हाडी - मांसी खिळलेले नाना अल्पावधीतच ' हाडाचे शिक्षक ' ( Born Teacher ) म्हणून पंचक्रोशीत नावारूपाला आलेत .
' A Teacher is a Social Engineer . ' शिक्षक हा खऱ्या अर्थाने समाजाचा शिल्पकार असतो . म्हणून केवळ शाळेत शिक्षणदानाचे पवित्र कार्य करीत जीवन व्यतीत करावे की बहुजन समाजासाठी फुले , भाऊराव पाटील , गाडगे महाराज यासारख्यांच्या समर्पण वृत्तीने कार्य करणाऱ्यांचा आदर्श समोर ठेवून व्यापक , सर्वसमावेशक स्तरावर कार्याला वाहून घ्यावे या द्वंद्वातून नानांनी स्वत : ला सावरले . समाजाची सेवा म्हणजे असिधाराव्रत . तारेवरची कसरत , हाती भिकेची झोळी , प्रतिगाम्यांच्या टीकेचा विषय , उपेक्षित जीवनाचा साक्षीदार आणि प्रसंगी चारित्र्य हननाचा बळी ! प्रस्थापितांची मक्तेदारी कमी करतांना या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे . याची मनोमन खात्री करून अतुल धैर्याने आणि प्रखर निष्ठेने नानांनी तनमनधनाने हे सतीचं वाण स्वीकारलं आणि तालुक्यातील मुलामुलींचे ते सानेगुरूजी बनलेत !
१ ९ ५८ ते ६० या काळातला राष्ट्रीय वसतीगृहातला मी विद्यार्थी होतो . खड्डा जीनमधील राष्ट्रीय विद्यालय ही माझी शाळा होती . या शाळेतून स्वावलंबनाचे , कर्तव्याचरणाचे , मानवतेचे , भूतदयेचे समता - स्वातंत्र्यअन् बंधुभावाचे , चारित्र्याचे , राष्ट्रनिष्ठेचे धडे नानांनीआम्हा विद्यार्थ्यांकडून गिरवून घेतले . शरीराबरोबरच मनाचीही मशागत करवून घेतली . शिस्तबध्द जीवनाची आणि चांगल्या सवयींची आवश्यकता सांगून शारीरिक कष्ट , अन्यायाचा प्रतिकार वाचनातील रुची , दैनंदिनी लेखन , श्रमदान , सायंकालीन तशीच प्रात : कालीन प्रार्थना साफ - सफाई यासारख्या अनेकानेक गोष्टींनी विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी होईल याकडे नानांनी जातीने लक्ष पुरविले . आम्हा विद्यार्थ्यांना नानांनी नुसत्याच पुस्तकी ज्ञानाने पुस्तकी - किडा बनविले नाही तर जीवनातील आव्हाने स्वीकारण्याचे धैर्य विद्यार्थ्यांच्या ठायी कसे उत्पन्न करता येईल याचा ही ध्यास घेतला . नानांच्या करडया व कठोर शिस्तीचा प्रसाद माझ्या काही सहाध्यायांनी अनुभवला आहे . पण त्यामागे मातृदयाचा ओलावा व पित्याच्या कठोर भूमिकेचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नसे .
मार्च ६० मधील ११ वी ची बोर्डाची परिक्षा प्रथम श्रेणीत संपादन करून उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहात प्रवेश मिळविण्याची खटपट मी करीत असतांनाच नानांनी मला वाघळी शाखेवर लेखनिक - कम - शिक्षक म्हणून रवाना केले . १ ९ ६५ गध्ये डेप्युटेशनवर बी.एड् . साठी धुळयाला पाठविले आणि ६८ ६ ९ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन व्होकेशनल गाइडन्स साठी मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिटयूट मधे धाडले .व्हालंटरी शिक्षकाच्या मुलाला नानांनी दिलेला हा हात ! अशीच माया नानांनी आम्हा अनेक विद्यार्थ्यांवर केली . नानांनी लावलेला हा ' जीव ' आठवला म्हणजे या धैर्याच्या महामेरुपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते . आज माझ्या सारख्या गोर - गरीब , बहुजन समाजातील असंख्य मुला - मुलींचे जीवन नानांनी सुरू केलेल्या शाळांनी उजाळून निघालेले आहे . ज्यांना सकाळ - संध्याकाळची भ्रांत अशांना नानांनी प्रेमाने सांभाळले . त्यांना धीर दिला आणि ताठ मानेने जीवन जगण्याची , सुरू केलेल्या शाळांमधून प्रेरणा दिली . शिक्षणाची गंगा खेडयापाडयांपर्यंत पोहचवून नानांनी सर्वांना शिक्षणाची दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिली . आज राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचा शाखा विस्तार पाहिला म्हणजे नानांच्या निरपेक्ष कार्याची महती जाणवते .
१ ९ ७२ मध्ये एम.ए. परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याचे वृत्त नानांना समजताच नानांना झालेला विलक्षण आनंद आजही माझ्या चक्षूं समोर जशाचा तसा उभा राहतो . प्राध्यापक म्हणून शहादा कॉलेजमध्ये रूजू होण्यापूर्वी नानांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो असताना नानांचे आनंदाने डबडबलेले डोळे खूप काही सांगून गेले . म्हणून तर नानांचा विद्यार्थी , राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचा सभासद , ६० ते ७२ अखेरपर्यंतचा एक सहकारी शिक्षक म्हणून सांगताना मला खरोखरच धन्यता वाटते . नानांचे मार्गदर्शन ज्यांना - ज्यांना लाभले , त्यांच्या जीवनाचे सोने झाले . परिसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने व्हावे , तद्वत नानांच्या सहवासात जे आलेत , त्या सर्वांनाच अभूतपूर्व अशा जीवनाचा लाभ झाला . त्याच्या मोबदल्यात नानांनी काय मागीतले म्हणाल , तर केवळ कृतज्ञता ! शाळांसाठी नानांनी हाती झोळी घेऊन अथक पायपीट केली . पै - पै जमवून , स्वतःश्रमदान करून शाळेच्या इमारती उभ्या केल्यात . तांत्रिक शिक्षणाचीही सोय केली.तशीच अंध - अपंग , भटक्या विमुक्त जाती - जमातीच्या मुला - मुलींसाठी आश्रमशाळाही सुरू केल्यात . महाविद्यालय सुरू करून उच्च शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून काळजी घेतली . बालवाडीपासून उच्च शिक्षणापर्यंतचा हा एकखांबी तंबू अव्याहतपणे गेल्या पाच दशकांपासून नानासाहेब समर्थपणे सांभाळत आहेत . हा त्यांचा आदर्श नव्याने शिक्षणसंस्था सुरूकरणाऱ्यांना प्रेरक ठरणारा आहे .
एवढा मोठा पसारा सांभाळणाऱ्या नानांच्या जीवनात आजही तीच पायपीट आहे . आजही तोच खादीचा जाडाभरडा वेश अंगावर आहे . तोच साधेपणा . तेच साधन शुचित्व , तीच साधना , उपासना . जी दादांनी व आजींनी आपल्या आचार - विचारातून त्यांचे समोर ठेवली . ज्ञानेश्वरीतील पसायदानास आपण पात्र व्हावे म्हणून तीच घडपड , तीच धावपळ आजही वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी , नाना आज पूर्वीच्याच उमेदीने , जिद्दीने , नेटाने कार्य करीत असल्याचे दिसून येते .
शिक्षणाचे कार्य करीत असतांनाच नानांनी सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक , आचार्यकुल , भूदान - ग्रामदान चळवळ , आंतरभारती , सानेगुरूजी कथामाला , ग्रामीण वाचनालये , विविध चर्चासत्रे , कृती - प्रकल्प , संमेलने , शिबीरे , शासनाच्या सुधार योजना यासारख्या विधायक उपक्रमांना सक्रीय पाठिंबा दिला . विविध शाखांतील अध्यापक वर्ग कृतीप्रवण एवं अद्यावत रहावा म्हणून त्यांनाही विविध योजनात सहभागी करून घेतले . पालक वर्गाशी अनुसंधान राखून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून विविध कलागुणांचा , क्रीडा नैपुण्याचा विकास साधला . नानांची दूर दृष्टी त्यांच्या इमारतींच्या उभारणीतून , सेवक वर्गाच्या निवडीतून दिसून येते . या दुर्मिळ गुणांचा समन्वय नानांच्या व्यक्तिमत्वात झालेला असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत या शिक्षणमहर्षीचे नाव जाऊन पोहचले आहे . कामाचा हा प्रचंड उरक सांभाळून ज्ञानेशांच्या ज्ञानेश्वरीची आणि तुकारामांच्या गाथेतील अभंगांची संगत करणाऱ्या नानांकडे पाहिले म्हणजे या धैर्यधरापुढे विनम्र व्हावेसे वाटते .
आपल्या संस्थेतील मुला - मुलींचा भाग्यविधाता , पालकांनी निश्चिंतपणे पाल्यांची टाकलेली जबाबदारी पेलणारा , सहकारी सेवक वर्गास आस्थेने , आपुलकीने मार्गदर्शन करणारा , थोर दिलाचा , नि : स्पृह , निर्भिड , अखंड झिजणारा , तापसी शिक्षण महर्षि म्हणून नानांचे नांव खानदेशच्या शैक्षणिक इतिहासात नोंदविले जाईल . धैर्याच्या या महामेरूला उदंड दीर्घायुरारोग्याचा लाभ होवो अशी प्रभुचरणी प्रार्थना करून हे शब्दसुमन नानासाहेबांच्या चरणकमलयुग्माशी विनित भावाने सादर करतो .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा