स्काऊट गाईड चळवळीचे स्फूर्ती स्थान नानासाहेब य.ना.चव्हाण(श्री.बी.डी.वाबळे ,सहाय्यक जिल्हा कमिशनर,जळगाव भारत स्काऊट आणि गाईड जि.जळगाव)
महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड संस्थेच्या कौन्सिलर पदी माझी निवड झाली असता , माननीय नानासाहेबांनी एके दिवशी खास मला बोलावून माझी मुलाखत घेतली . ह्या मुलाखतीत स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास , ह्या शिक्षणाची गरज , उद्दिष्ट्ये , महत्त्व जाणून घेतले . ह्या संबंधित असलेली पुस्तके माझे जवळून मागून जिज्ञासापूर्वक वाचलीत . राष्ट्राला , समाजाला आदर्श , सुसंस्कृत , शिस्तबद्ध , निष्ठावान नागरिक व नेतृत्व देणारी ही चळवळ अतिशय मोलाची आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले . काळाची गरज विचारात घेता राज्यातही चळवळ उत्तम प्रकारे कशी राबविली जाईल असे प्रयत्न करा , असे त्यांनी आवाहन केले .
स्वावलंबन व श्रमदान यावर नानासाहेबांची मोलाची श्रद्धा . संस्थेच्या शांखावरील स्काऊट गाईडचे मेळावे व कॅम्पमध्ये नानासाहेब श्रमदानात व वृक्षारोपणात सातत्याने सहभागी असतात . १ ९ ८४ साली महाराष्ट्र राज्य स्काऊट आणि गाईड या संस्थेने चाळीसगाव येथे ५ दिवसांचा चार जिल्ह्यांचा नासिक विभागीय मेळावा आयोजीत केला होता.मेळाव्याचे उद् -घाटक नानासाहेब य.ना. चव्हाणच होते.सदर मेळाव्यात तीन हजार मुलांसाठी तीनशे तंबूची उभारणी करून भास्कराचार्य नगर तयार केले होते .निवास व्यवस्थेत व रचनेत नानासाहेबांनी मोलाचे परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले. मेळावा सचिव म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्यात नानासाहेबांचे मोलाचे श्रेय होय . यामुळे आपल्या संस्थेला प्रतिष्ठा लाभली . राज्य निरिक्षकांनी संस्थेचा गौरव केला . स्टेट चिफ कमिशनर माननीय श्री . व्यंकटराव रणधीर व कर्नाटकचे स्टेट चीफ कमिशनर यांनी राष्ट्रीय विद्यालयाला भेट दिली . संस्थेतील स्काऊट चळवळीचे कामकाज पाहून त्यांनी मन : पूर्वक समाधान व्यक्त केले .
दर तीन वर्षांनी होणारे चाळीसगाव तालुक्याचे स्काऊट गाईड मेळावे नानासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार होत आहेत . नियोजित चाळीसगाव स्काऊट गाईड प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीत नानासाहेबांनी मोलाचे योगदान देऊ केले आहे . जागेचा विकास आणि कब , बुलबुल , स्काऊट गाईड , मुला मुलींसाठी आपण काहीही कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिलेले आहे . नानासाहेब हे स्काऊट गाईड चळवळीतील पदाधिकारी जरी नसले तरी ते मोलाचे कृतीने , मनाने , जागरुकतेने व नीतिने पवित्र राहून या चळवळीचे स्फूर्ती व प्रेरणास्थान आहेत . स्काऊटचे ब्रीद ' तयार रहा ' यासाठी शरिराने सुदृढ , मनाने जागरुक व नीतिने पवित्र राहून इतरांच्या सदैव उपयोगी पडण्यासाठी तयार राहण्याचा स्काऊट प्रयत्न करतो . नानासाहेबांच्या कार्यातून , प्रेरणेतून , सहवासातून अनेक स्काऊट गाईड न कळत घडले , बनले . स्काऊटची व्याख्या म्हणजे जो विश्वसनीय असतो , धोका व संकटे यांना न जुमानता जो आपले कर्तव्य न चुकता , न कचरता पार पाडतो आणि कितीही अडचणी आल्या तरी देखिल तो आनंदी व उत्साही वृत्ती कायम ठेवतो तो खरा स्काऊट होय .
स्काऊट गाईड संघटनेचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी जगातील स्काऊटस , गाईडसना मरणापूर्वी निरोपाचे चार शब्द सांगितले आहेत . त्यात ते म्हणतात , कोणत्याही घटनेकडे उदासिन वृत्तीने व निराशेने पाहू नका . उल्हासपूर्वक व आशादायक दृष्टीने इतरांना सुखी करणे हाच समाधान मिळविण्याचा खरा मार्ग आहे . या जगात तूम्ही पाऊल ठेवलेत त्या पेक्षा जातांना हे जग थोडे तरी अधिक बरे करण्याचा प्रयत्न करा . म्हणजे जेव्हा मरणाची वेळ येईल त्यावेळी आपण आपले आयुष्य व्यर्थ घालविले नाही . आपण आपल्याकडून शिकस्त केली आहे असे समाधान तुम्हास मिळेल . या प्रमाणे आनंदात जगण्याकरीता आणि आनंदाने मरणाकरीता ' तयार रहा ' . या आपल्या स्काऊट वचनाची आठवण ठेवा . तुमचे बालपण संपल्यानंतरही स्काऊट वचनांचे पालन करा . देव तुम्हास या प्रयत्नात यश देवो . असा निरोप त्यांनी दिला .
नानासाहेबांच्या ७५ वर्षांच्या आयुष्यात त्यांच्या सहवासात जे लहान थोर आलेत , ते प्रेरणा व स्फूर्ती घेऊन गेलेत . त्यांचे जीवन सुखी व समृद्ध झाले . नानांच्या ध्येयातून व कृतीतून मोलाच्या संस्कारांचा व शिक्षणाचा प्रसार झाला . त्यांच्या त्यागाचा , सेवेचा आदर करुन , स्काऊट गाईड संघटनेच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो . ईश्वरकृपेने त्यांना शतायुष्य लाभून त्यांची स्फूर्ती , प्रेरणा , आदर्श व मार्गदर्शन सातत्याने लाभत राहो ही अमृतमहोत्सवी शुभेच्छा व्यक्त करतो . ' जय हिंद ' !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा