मी चाळीसगावांत चाळीस वर्षांपूवी , जेव्हा प्रथम पाऊल ठेवले तेव्हा दोन प्रमुख संस्थांची मला माहिती देण्यात आली . एक म्हणजे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी व दुसरी म्हणजे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ , पहिल्या संस्थेचे प्रमुख होते मा . श्री . दादासाहेब पाटसकर , त्यांचा व माझा परिचय झाला होता . त्याकाळी त्यांचे राजकारणात नाव गाजत होते . दुसऱ्या संस्थेचे प्रमुख होते श्री . मा . यशवंतराव उर्फ नानासाहेब चव्हाण , त्यांचेही नाव अनेकांच्या बोलण्यात नेहमी यावयाचे . परंतु त्यांचा व माझा अजून परिचय झालेला नव्हता . श्री . नानासाहेबांनी लहान लहान खेड्यातून शाळा काढलेल्या आहेत . मुलांमध्ये - चाळीसगाव तालुक्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून ते प्रयत्न करत आहेत . मागासलेल्या व गरीब मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांना फार कळकळ आहे . अशा मुलांना चाळीसगावात राहता यावे म्हणून त्यांनी एक वसतीगृह पण सुरु केले आहे . अशा प्रकारची विविध माहिती मला नेहमी मिळत असे . त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य डोळ्यापुढे ठेवून ते कार्यरत आहेत . हे माझ्या लक्षात आले . होते . पण त्यांचा व माझा परिचय व्हावा असे मला मनापासून वाटू लागले . पण भेटीचा योग जुळून आला नव्हता .
एकदा मी दवाखान्यात जात असताना राष्ट्रीय विद्यालयाच्या मैदानावर मुले काम करतांना दिसली . पू . साने गुरुजी व श्रमदान यावर माझी विशेष श्रद्धा असल्या मुळे मी तेथे थांबलो . मुले खणत होती . मातीची पाटी डोक्यावर घेऊन दूर टाकत होती . आणि हे सारे हसतखेळत चालले होते . त्यांच्या बरोबर एक मजबूत बाध्याचा सावळातरुण धोतराचा काचा मारून डोक्यावर मातीची पाटी घेऊन माती दूर टाकत होता . हा तरुण मुलांमध्ये मिसळून गेला होता . मुलांना तो आपला दोस्त वाटत होता . मी एका मुलाला विचारले , ' ते गृहस्थ कोण रे ? ' तो म्हणाला , ' डॉक्टर , ते तर आमचे नानासाहेब . संस्थेचे प्रमुख . ' मला आश्चर्याचा धक्काच बसला . एवढ्या मोठ्या संस्थेचा प्रमुख , एवढा साधा राहतो . मुलांमध्ये मिसळून , त्यांचा मित्र होतो . माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना . शेवटी मी नानासाहेबांपर्यंत पोहोचला . हात जोडले व म्हणालो , " मी डॉक्टर देव . आपला परिचय व्हावा अशी फार इच्छा होती . आज तो योग आला . श्री . नानासाहेब म्हणाले , ' डॉक्टर , एकदा घरीच या ना . म्हणजे परिचयाचे रुपांतर ओळखीत होईल . त्यांच्या घरी जावे , ओळख वाढवावी , असे मला पण वाटत होते . पण त्याच बरोबर थोडा संकोचही वाटत होता . काही दिवस असेच गेले . आणि एक दिवस श्री . नानासाहेबांचा निरोप आला की , ' मुलगा आजारी आहे . घरी येऊन जाल का ? ' मी लगेच होकार दिला कारण मी ज्या संधीची वाट पहात होतो ती संधी आयती चालून आली होती .
मी कल्पना करत होतो की नानासाहेबांचे घर चांगले प्रशस्त असेल - वगैरे वगैरे पण त्यांच्या घरी गेल्यावर दिसले की नानासाहेबांचे घर अगदी छोटेसे आहे . फर्निचर अगदी साधे व आवश्यक तेवढेच आहे . माझ्या ध्यानात येण्याचे अगोदर श्री . नानासाहेबांनी माझ्या हातातून बॅग घेतली व मला आत नेले . तेवढ्यात सौ . वहिनींनी स्वत : च एक खुर्ची आणली . हे अगत्य हा साधेपणापाहून मी पुष्कळच मोकळा झालो . मनावरचे दडपण केव्हाच गेले . मी मनात एक खूणगाठ बांधली की - या माणसाशी आपले गोत्र जमेल . हळूहळू पेशंट - डॉक्टर हे नाते संपले व मी त्यांच्या घरातील एक आप्तस्वकीय झालो . श्री . नानासाहेबांनी त्यांच्या सुसंस्कृत कुटुंबात मला सामावून घेतले . १ ९ ७८ मध्ये आंध्र मध्ये जेव्हा प्रचंड मोठे चक्रीवादळ झाले व समुद्रकाठचा १५ कि . मी . चा सर्व टापू पूर्णपणे वाहून गेला . हजारो माणसे मृत्युमुखी पडली व त्या पेक्षा कितीतरी जास्त माणसे निराधार झाली . तेव्हा तेथे मदतीला जावे असे मला वाटू लागले व त्याप्रमाणे मी जाण्याचे ठरविले . मी , नानासाहेब व सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ शिरुडे यांची स्टेशनवर भेट झाली . तेही आंध्रप्रदेशच्या वादळाच्या ठिकाणी आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी निघाले होते . आंध्र मध्ये ' अवनीगुड्डा ' येथे पोहोचल्यावर जो भाग समुद्राच्या लाटांमुळे पार धुवून निघाला होता , जेथे डोक्यावर छप्पर असणार नाही , तेथे दोन्ही वेळा , जेवावयाला मिळेलच असे नाही याची पूर्ण कल्पना आम्हाला होती . तेथे नानासाहेबांनी अपार कष्ट उपसले . प्रेते उचलणे , त्यांची अंत्यक्रीया करणे , लोकांना कपडे वाटणे , झोपड्यांसाठी बांबू वाटणे , ही कामे ते आठ आठ तास करत . संध्याकाळी अंधार पडावयाला लागला की ते दुभाष्याच्या सहाय्याने मुलांना सुदंर सुदंर गोष्टी ही सांगत असत .
आज ७५ व्या वर्षी ही त्यांचा उत्साह पूर्वीप्रमाणे उफाळत आहे . कामाचा व्यापही पूर्वीइतकाच आहे . फक्त थोडासा फरक जो झाला आहे तो म्हणजे केस पांढरे झाले आहेत व चाल थोडी मंदावली आहे . बस्स ! त्यांचे हृदय मात्र पहिल्या इतकेच चिरतरुण आहे . अजूनही ही नवीन नवीन आव्हाने पेलावयास ते तयार असतात . अजूनही नवीन नवीन स्वप्ने ते पहात असतात . पूराणातील ' ययातीचे तारुण्य ' भोगासाठी ' होते . श्री . नानासाहेबांचे ' तारुण्य ' सेवेसाठी आहे आणि जीवन त्यागावर आधारलेले आहे . शंभरी गाठल्यावर ही श्री . नानासाहेबांचे तारुण्य असेच उफाळत राहो . अनेक समाजोपयोगी प्रकल्प त्यांच्या हातून पूर्ण होवोत . हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना !
***
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा