मुख्य सामग्रीवर वगळा

श्रमपंढरीचे वारकरी नानसाहेब(प्रा.पांडूरंग दोधू सुतार,बहाळकर,राष्ट्रीय ज्यु. काॅलेज,चाळीसगाव)

 

ज्यां च्या नावातच विजयाची पताका आहे असे नानासाहेब यशवंत , गुणवंत व धैर्यवंत तर आहेतच पण त्याच बरोबर संतही आहेत कारण संत नामदेवांनी सांगितलेली संतसज्जनांची लक्षणे पहा- 
    निंदील हे जन सुखे निंदू द्यावे । सज्जनी  क्षोभावे नये बापा      निंदा आणि स्तुती समान पै झाली| त्याची स्थिती आली समाधीला | 
 शत्रू आणि मित्र समसमानत्वे । तोचि पै देवाते आवडला । 
माती आणि सोने भासे समान तो एकनिधान योगीराज । 
नामा म्हणे ऐसे संत जे असती । तेणे पावन होती तिन्ही लोक ॥
        अडतीस वर्षापूर्वी माझ्या बहाळगावी त्यांच्याशी पहिली भेट झाली . त्यावेळी दोन देशसेवेसाठी , जनसेवेसाठी कार्यरत होते . महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण आणि चाळीसगावचे शिक्षणमहर्षी यशवंतराव नारायणराव चव्हाण , साधी राहणी , उच्च विचारसरणी हे त्यांचे साधे तत्वज्ञान . खादीचे पांढरेशुभ्र धोतर , पूर्णबाह्यांचा सदरा , डोक्यावर तशीच पांढरीशुभ्र टोपी , हातात लहानशी कापडी पिशवी आणि छत्री एवढ्या सरंजामासह नानाबाहेर पडतात . छत्री नाही पण पिशवी आजही असते . पिशवीलहान तिचे कार्य मात्र महान तिच्यात असतात पावतीपुस्तके , विनोबांची गीताई , नामदेव तुकोबांचे अभंग आणि सानेगुरुजींची पुस्तके . 
      नाना श्रमपंढरीचे वारकरी आहेत . श्रमदान हा त्यांचा स्थायीभाव आहे . आजच्यासारखी पूर्वी खेडोपाडी वाहनांची सोयनव्हती . त्यामुळे तरवाडे , वाडे , बहाळ , खेडगाव , पोहरे , कळमडू , दहिवद असा त्यांचा प्रवास पायीच असायचा . त्याच्या व  जनताजनार्दनाच्या श्रमातूनच आजची ज्ञानमंदिरे उभी राहिली . आजही तरुणांच्या बरोबरीने श्रमदान करतात . तरुण थकतात पण ते नाही . श्रमसेवेत त्यांनी प्राचार्य , मुख्याध्यापक , शिक्षक , विद्यार्थी , सेवक , ग्रामस्थ सर्वांनाच सहभागी करुन घेतले . त्यामुळे ही आपली संस्था आहे , ही आपली शाळा आहे . हे आपले कॉलेज आहे अशीच सर्वांची भावना झाली आहे . या सर्व शैक्षणिक इमारती ज्या खेडोपाडी    आणि शहरातून उभ्या राहिल्या त्या श्रमदानातून ! 
   श्रमदान शिबिरात नानांचा सहवास म्हणजे एक आनंद असतो त्यात त्यांची बौद्धिके असतात . अभंग आणि गाणी म्हणण्यात सर्वांना ते सहभागी करुन घेतात . थकवा आणि वेळ कसा निघून जातो तेही कळत नाही . बोलणे अतिशय कमी पण श्रम मात्र भरपूर . ' बोले तैसा चाले ' या तुकोबांच्या वचनाप्रमाणे त्यांचं वागणं आहे . 
  नाना श्रमपंढरीचे जसे वारकरी आहेत तसे ते पंढरीच्या विठोबाचे निस्सीम वारकरी आहेत . त्यांचा जन्म वारकऱ्यांच्या घरात झाला . माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा || आजही त्यांच्या घरात ही वारी चालू आहे . नानांची वारी फक्त दोन दिवसांची , आल्या आल्या चंद्रभागेमध्ये स्नान करीत . पिशवीत विनोबांची , साने गुरुजींची , संतांची पुस्तके व फराळाचे घेत . दर्शनाच्या बारीमध्ये रांगेत अगदी शेवटी उभे राहात . रांगे मध्ये घुसण्यासाठी ओळखीच्या लोकांनी कितीही आग्रह केला तरी ते तिकडे दुर्लक्ष करून गोपाळपूरयाला शेवटच्या माणसामागे उभे राहून  पंधरा ते वीस तासानंतरच विठोबाचे दर्शन घेत . श्रम घेऊन आणि धक्के खाऊनच त्यांनी देव पाहीला.
    संत नामदेवांचा त्यांचा एक आवडता अभंग आहे .
 काळ देहाशी आला खाऊ । आम्ही आनंदे नाचू गाऊ ॥१ ॥  .  कोण वेळे काय गाणे । हे तो भगवंता मी नेणे ॥२ ॥
टाळ मृदंग दक्षिणेकडे । माझे गाणे पश्चिमेकडे ॥३ ॥
नामा म्हणे बा केशवा । जन्मोजन्मी द्यावी सेवा ।।४ ।। 
    विशेष म्हणजे हा अभंग ते गाऊन दाखवितात . ' जन्मोजन्मी द्यावी सेवा ' या चरणावर जास्त भर देतात . कारण हा अभंग ते जगतात . संत विनोबा , परम कारुण्य आणि मांगल्याची मूर्ती साने गुरुजी ही नानांची आराध्य दैवते आहेत . त्यांनी विनोबांजवळून श्रम घेतले तर साने गुरुजींजवळून सेवा घेतली . साने गुरुजी कथामाला दरवर्षी त्यांची पुण्यतिथी साजरी करते . विनोबांची ' गीताई ' आणि साने गुरुजींची ' मैत्री ' काव्यसंग्रह यांची संगत आजही नानांना आहे . साने गुरुजींची कविता सदैव त्यांच्या ओठावर असते .
    नानांच्या सहवासात जे आले असतील त्यांच्या बरोबर श्रमशिबिरात व पायी दिडींत सामील झाले असतील त्यांनाच समजेल की नाना ही कविता का म्हणतात आणि आपल्या मागून सर्व श्रमसेवकांना का म्हणायला लावतात ? कविता शिकणं , शिकवणं आणि त्याहीपेक्षा ती जगण्यातच शाश्वत आनंद आहे . शिक्षक आणि विद्यार्थ्यांविषयी नानांच्या मनात नितांत आदर आणि जिव्हाळा आहे . अगदी लहान मुलाशीही ते आदराने बोलतील . पण कामचुकारपणा व टाळाटाळ करणाऱ्यांवर ते रागावतात . ते रागावणं देखील प्रेमाचे असते . बोर्डिंगमध्ये असतांना नानांनी विद्यार्थ्यांना आईचे प्रेम दिले पण त्याच बरोबर त्यांना शिस्तही लावली . आज या संस्थेतून हजारो विद्यार्थी , विद्यार्थीनी शिकून बाहेर पडत आहेत . अनेकांचे संसार सुखाचे झाले . ही ज्ञानाची गंगा त्यांनीच खेड्यापाड्यात नेली . गरीबातल्या गरीब मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली झाली . सर्वत्र ज्ञानाचे मळे बहरले . श्रम करणाऱ्या नानांच्या हातांनी पंच्याहत्तरी ओलांडली . त्यांचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे . त्यांना दीर्घआयुष्य आणि आरोग्य लाभो ही पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो . श्रमपंढरीच्या ह्या महान वारक- याला शतश : प्रणाम !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...