माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,
सा.न.वि.वि.
आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते . नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो आहोत . तुम्ही खऱ्या अर्थाने विपत्तींचे संधीत रूपांतर केलेत . कोसळणारी संकटे अंगावर झेललीत तुम्ही भोवतालातील आपल्या स्थितीतील माणसांचे भान ठेवलेत . मला तर वाटते तुमच्या समृध्द जीवनाची नाळ अशी दुःखितांशीच बांधून घेतली आणि त्यांना बळ देता देताच स्वत : ही समर्थ झालात .
हे आता आमच्या पिढीला जमेल का ? स्वतःच्या अश्रूं नाही आम्ही प्रामाणिक राहू शकत नाही अशी भयावह आत्मघातकी वृत्ती तरारून उठत असतांना आम्हाला तुम्ही ' थोर ' न वाटला तरच आश्चर्य.
तुम्ही फार भाग्यवान ठरलात . तुम्हाला आदर्श लाभलेत आयुष्यांच्या बिकट वळणांवर आणि त्या थोर पुरूषांच्या पावलांची धूळ तुम्ही मस्तकी लावून आयुष्याचे प्रस्थान ठेवले . तुमची श्रध्दास्थाने कदाचित् म.गांधी असतील , पू साने गुरुजी असतील . पू.विनोबांच्या जीवनदायी अध्यात्माचा खोल ठसा तुमच्या आयुष्यावर कोरला गेला असेल . तुमच्या अस्तित्वाने आम्ही किमान या थोर पुरुषांकडे आदराने अजून आठवणीतून पाहू शकतो . हे काय कमी ऋण आहे तुमचे ?
' श्रद्धा ' शब्दाने खुप गोंधळात पडायला हवे अशा या दिवसात , या शब्दाचे निखळ रुप तुम्ही तुमच्या आचरणाने आम्हाला देऊ केलेत . माणूसकीच्या धर्माची जपणूक तुम्ही उभ्या केलेल्या कामाच्या डोंगरातून डोकावत राहील . ' भावी पिढीच्या काळजीने आम्ही गळे काढू बरेच काही शब्दातून सांडत असतो , त्यावेळी नकळत तुम्ही आठवलात की आमच्या बेगडीपणाने आमचे पितळ उघडे पडल्याचे स्वच्छ दिसू लागते . तुम्ही असे काही व्यक्त करण्यासाठी शब्दाचे माध्यमवापरतच नाही . तुम्ही शब्दांची किंमत जाणता म्हणून ते उगाच उधळू देत नाहीत . उद्याची पिढीची काळजी घेण्याची तुमची रीत आता सगळ्या जगापुढे उभीच आहे . नुसत्या इमारतीच्या रुपाने नव्हे , तर त्यातून संस्कार घेणाऱ्या असंख्य पिढ्यांच्या रुपाने .
तुमची प्रथमच भेट केव्हा झाली ते आठवत नाही . पण बहुधा कथामालेच्या शिबिरात ती झाल्याचे आठवते : आणि तुम्ही आमच्यासारख्या पराकोटीच्या बहिर्मुख वृत्तीच्या माणसांच्या डोळ्यात कसे मावणार ? कारण तुम्ही , सगळा भार आपल्या शिरावर असल्याच्या , ओझ्याने वाकून गेलेल्या चेहऱ्यात कधी विसरलाच नाही . व्यासपीठावरुन दिग्गजाची वाणी दुथडी वहात असतांना कधी व्यासपीठावर आलाच नाही . शिस्तीचे बाळकडू देतानाही कधी करडेपणा दाखविण्याचा प्रयत्न केलाच नाहीत , लगबग तुम्ही कधी केली नाही . आणि असे काहीन करणाऱ्यांना आमच्या कोणात प्रतिष्ठा देण्याची आम्हालाही सवय नसल्याने तुमच्याकडे लक्ष द्यायला उशीरच झाला . पण पुष्कळ गोष्टी समजून आल्या . पर्वतप्राय कार्य उभे करतांनाही मौन मोलाचे असते . खऱ्या अर्थाने लक्षवेधी असते .
तुम्ही उभ्या तालुक्याला शिक्षणमय करुन सोडायचा वसा घेतलात . हा वसा घेतलात त्याकाळात तुमचे आदर्श होते बहुधा कर्मवीर भाऊरावासारखी उत्तुंग माणसे ! ऋषीच ते . शिक्षणमहर्षी म्हणून महाराष्ट्र अशा व्यक्तिंना ओळखत असेल आणि त्यांनाही धन्य वाटत असावे या उपाधीने . तुमच्यासाठी सुद्धा हे ' शिक्षणमहर्षी ' बिरूद वापरायला आजच्या काळात तुम्ही बहुधा एकमेव असे याभागात असतांनाही आमची जीभ हा शब्द तुमच्यासाठी उच्चारायला कचरते , इतक्या भीषण वास्तवावर आम्ही हा शब्द
आणून ठेवला आहे . हाच काय , कितीतरी शब्दांना आम्ही बघता बघता गेल्या अर्धशतकात पार नासवून ठेवले आहे . सुदैवाने तुमच्या सारख्या व्यक्तिंचे कोठल्याच गौरवी शब्दांकडे लक्ष नसते . त्यामुळे त्याचा त्रास फक्त आम्हाला होतो . प्रत्यक्षात काहीही न करण्यान्यांना आता तुमच्या कर्तृत्वाला पर्यायी शब्द शोधण्याऐवजी फक्त ' नानासाहेबच पुरेसा वाटणे , याला बराच अर्थ आहे .
खरेतर शिक्षणसंस्था चालकांच्या नव्या पिढीशी तुमचा फारसा परिचय नसावा आणि ते फार चांगले आहे , अन्यथा दुरान्वयानेही तुमचे मन : स्वास्थ या वयात विस्कटण्याची भिती वाटते.इतका प्रचंड कारभार सांभाळतांना तुमच्या हातात असते एक लहानशी खादीची पिशवी . तीसुद्धा दुरुन रिकामी वाटावी अशी . आणि मलातर हे दृश्य विनोदीच वाटू लागते . तुमच्या पेहरावावरुन आमच्या तुमच्या विषयींच्या कल्पनेला तडाच जातो . साधा पोषाख , तोही खादीचा आणि चांगल्या परिटघडी शिवाय आमच्या डोळ्यांना खादी पहाण्याची सवय नाही ! पण खरे सांगायचे तर तुमच्या बिन परीटघडीची ही शुभ्र , जाडीभरडी वस्त्रेच अजून खादीची लाज सांभाळून आहेत . तुमच्या कार्याच्या थोरवीचे समोरच्या माणसावर अजिबात दडपण येत नाही . तशी मुद्दाम तुम्हाला काळजी घ्यावी लागत नाही . अंगभूत नम्र सभ्यतेचा इतका चांगला आविष्कार क्वचित पहायला मिळतो . त्यामुळे एखादे वैयक्तिक दुःखही तुमच्यापुढे मोकळे करायला कोणाला संकोच वाटू नये . असा गोडवा तुम्ही वागण्यात आणला आहे.
***
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा