मुख्य सामग्रीवर वगळा

मा.नानासाहेब चव्हाण : अभिनंदन(श्री.रमेश एकनाथ शिंदे,14,बजरंग नगर ,चोपडा)

 

 अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! 

    नानासाहेब माझ्या लहानपणीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा माझ्यावर उमटला आहे. माझे दोन मित्र श्री प्रकाश देशमुख (गायकवाड ) व श्री सुभाष ठोके यांना याची चांगली कल्पना आहे. आपण माझ्या जन्म वर्षापासून राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले. तळागाळातील , गरीब दुबळ्यांची ग्रामीण व शहरी भागातील मुले शिकून सवरून सर्वंकष बनावेत . हा आपला त्यामागील निश्चितच हेतू होता . आपले अनेक शैक्षणिक संस्था , सामाजिक संस्था व शिक्षणाला पूरक अशी विविध मंडळे उभारणीत योगदान आहे . विनोबांच्या , भूदान चळवळीत आपण सहयात्री होते व आजही आपण कांचनमुक्ती आंदोलनाचे सैनिक म्हणून व ग्रामीण भारताच्या परिवर्तनाचा वसा घेतला आहे . आपल्या या विशाल कर्तृत्वामुळे यंदाचा ' नंदिनी ' पुरस्कार थोर साहित्यिक मा . राम शेवाळकर यांच्या शुभहस्ते आपणास प्रदान करण्यात येत आहे .पुरस्काराचाच गौरव होत आहे एवढे आपले कार्य थोर आहे .  

  नाना , आम्ही सहा भांवडे , वडिलांची परिस्थिती सर्वसाधारणच . सहा अपत्यांना ते निश्चितच दुसऱ्या ठिकाणी शिकवू शकले नसते . तळेगावी आपण सुरु केलेल्या माध्यमिक शाळेतच आम्ही शिकलो . परिणामी सर्व नोकरीस लागलो . तळेगावी हायस्कूल नसते तर रोजंदारी करण्याशिवाय पर्याय नव्हता . आम्हासारख्या असंख्य ग्रामीण भागातील कुटुंबाच्या भलेपणात निश्चितच आपला सहभाग आहे . हे मला या प्रसंगी विशेषत्वाने सांगावेसे वाटते . नानासाहेब आपल्या वयास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत . आपले अमृतमहोत्सवी वर्ष आहे हा योगायोगच आहे . आपल्या अमृतमहोत्सवी वर्षी संस्था व तालुक्याच्या वतीने आपला सत्कार होत आहे . मी व माझ्या पत्नीने त्यात फुल ना फुलाची पाकळीच्या रुपाने सहभाग घेतला आहे . नाना , दीनदुबळ्यांना , तळागाळातील व अंध अपंगांना शिक्षण प्राप्त करुन देण्यासाठी परमेश्वर आपणास आयुरारोग्य व दीर्घायुष्य देवो . हीच प्रभुचरणी प्रार्थना .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...