मुख्य सामग्रीवर वगळा

चाळीसगावचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.नानासाहेब चव्हाण गुणग्राहक आणि रसिक व्यक्तिमत्व(श्री.सोमनाथ परब,गीत संघटक:एक सूर एक ताल,13/अे,आनंदाश्रम शिक्षण महर्षी दादा साहेब रेगे मार्ग,शिवाजी पार्क,मुंबई)

 

खान्देशात  प्रकाशभाईची मंगलयात्रा सुरु होती . या यात्रे मी सहभागी झालो होतो , श्री . नानासाहेब चव्हाण यांनी या मंगलयात्रेचे संपूर्ण नियोजन केले होते . तेही या यात्रेत सहभागी झाले असल्याने मला या गुणग्राहक आणि रसिक व्यक्तिमत्त्वाचा जवळून परिचय झाला . प्रथमदर्शनी गंभीर , मितभाषी वाटणारे नानासाहेब सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात चटकन एकरुप होताना मी अनुभवले . संकल्प आणि कार्यवाही याचे अचूक गणित साधण्याचे कौशल्य व कार्यकर्त्यांना कार्यप्रवृत्त करण्याचे कसब हे नानांचे खास वैशिष्ट्य आहे . मंगल यात्रेचा मार्ग , वाटेतील गावा गावातून यात्रेचे महत्त्व पटवून देऊन , त्या गावातील आबाल वृद्धांना गावाच्या वेशीवर स्वागताला प्रवृत्त करणे यासाठी नानांनी आपल्या संस्थेतील शिक्षक - सेवक कार्यकर्त्यांना अनुभवसिद्ध मार्गदर्शन केले होते . शाळाशाळांमधून जाऊन हे कार्यकर्ते मंगलयात्रेचे महत्त्व , हेतू सांगत असत . ज्या मार्गावरुनही मंगलयात्रा जाणार असेल त्या मार्गावरील गावातून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला . मोठ्या प्रमाणावर मंगल साहित्याची विक्री झाली . याचे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे कारण म्हणजे श्री . नानासाहेब चव्हाणांचे रेखीव नियोजन , त्याच बरोबर त्यांनी सामाजिक बांधिलकीने उभे केलेले शिक्षण संस्थेचे कार्य तत्वज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून संधी वंचित समाजाला शिक्षणाची संधी मिळवून देण्याचे फार मोठे कार्य नानांनी केले आहे . त्यामुळे  नानांचा शब्द ही एक शक्तीच होऊन राहिली आहे , याचे पावलोपावली प्रत्यंतर येत गेले .  
        मंगलयात्रा मुंबईहून नाशिकमार्गे अंमळनेरला पोहोचली त्यावेळी नानासाहेबांनी या मंगलयात्रेतील यात्रेकरूंचे स्वागत अत्यंत भावभक्तीने प्रचंड उत्साहाने भव्य - दिव्य स्वरुपात केले . पूज्य साने गुरुजींच्या बद्दलचा नितांत आदर व विचार आचारावरील श्रद्धा यामुळे संपूर्ण खान्देशात मंगल यात्रा अपेक्षेपेक्षा यशस्वी झाली . माणसांच्या मनाची मशागत नानांनी करुन ठेवली होती म्हणूनच हे भरघोस यश मंगल यात्रेला मिळाले असे मला मनापासून वाटते . नानासाहेब स्वत : जातीने या यात्रेतील सहभागी घटकांची विचारपूस करीत . कोणताही उणेपणा राहू देत नसत . एवढा मोठा शिक्षणतज्ज्ञ व समाजमान्य जेष्ठ नेता आपली काळजी करतो आहे हे पाहून आमचा थकवा आणि व्यक्तिगत अडचणी कोठल्या कोठे पळून जात . आमची कार्यशक्ती दुप्पट होते आहे असे वाटत राही चाळीसगावी आम्ही पोहोचलो . खान्देशातील संपूर्ण नियोजनानंतर श्री . नानासाहेब आपल्या गावी आमच्या स्वागताला आले होते . वयाची सत्तरी ओलांडलेले नाना आमच्या ' एक सूर एकताल ' कार्यक्रमात लहानात लहान बनून सहभागी होत . अभिनयासह गाणे म्हणत आणि या उपक्रमाला आलेल्या बघ्या मंडळींना स्फूर्ती देऊन सहभागी करुन घेत . समारंभात आपले मोठेपण विसरुन तल्लीनतेनेसहभागी होणारे महाभाग वचितच पाहाण्यात येतात . नानांमधील हे अपवादात्मक रसिकत्व मी अनुभवत आलो आहे . 
   स्फूर्तिगीते , बालगीते , बडबडगीते तितक्याच आवेशाने साभिनय म्हणणारे नानासाहेब पाहून शिक्षक , पालक सर्व समुदाय या गीत गायनाच्या कार्यक्रमात सहभागी होत असे . चाळीसगावामधील आपल्या शिक्षण संस्थांच्या सर्व विभागातून नानांनी मला समुहगीते शिकवण्यासाठी नेले . नानासाहेबांच्या बरोबर जातांना मला संकोचल्या सारखे होई . कारण नानांच्या विषयीची आदरयुक्तभावना व समर्पण वृत्तीची जाणीव पाहून या रसिक महापुरुषाचे मोठेपण मला अधिकाधिक जाणवत गेले . प्राथमिक शाळेतील मुले , वसतीगृहातील मुले , माध्यमिक शाळेतील मुले आणि महाविद्यालयातील युवकांना नानासाहेबांचा आधार वाटत आहे हे पाहून आणि अंधशाळेपासून व्यावसायिक शिक्षण विभागापर्यंतची अध्यापन प्रक्रिया ती . नानासाहेबांच्या प्रचंड कार्यशक्तीची व कार्यतत्परतेची आविष्कार ठरते .
    आज नानासाहेबांचे अमृतमहोत्सवी संवत्सर आहे ! या पंचाहत्तर वर्षाचा नव्या उमेदीचा , निष्कलंक चारित्र्याचा , गगनाला गवसणी घालू शकणारा युवक ! मला भारतीय युवाशक्तीचा प्रतिनिधीच वाटतो . एक सेवाभावी , प्रचंड उमेद बाळगून जीवन सार्थकी लावणाऱ्या या शिक्षणमहर्षीला माझे विनम्र अभिवादन . 
   आदरणीय नानासाहेबांना उदंड दीर्घायुरारोग्य लाभो ही प्रभू चरणी प्रार्थना .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...