थोर शिक्षणमहर्षि मा . नानासाहेबांना ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी वयाची ७५ वर्ष पूर्ण होत आहे . या अमृतमहोत्सवादिना निमित्ताने त्यांच्या चरणी' कृतज्ञतापूर्ण ' शब्द पूष्पांजली.
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन मा . नानासाहेबांनी चाळीसगाव , भडगाव , पाचोरा या तीनही तालुक्यात शिक्षणाची गंगोत्री खेळविली आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींना ज्ञानरूपी जीवन पाजले . म्हणूनच आजवर होऊन गेलेल्या शिक्षण महर्षीच्या पंक्तीत येवून बसण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे . बालवाडी ते वरिष्ट महाविद्यालयात उच्च शिक्षणापर्यंतची सोय त्यांनी करून दिल्यामुळे गोरगरीब ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता आला .
मा. नानासाहेबांनी या संस्थेकरीता आपल्या आयुष्यातील अत्यंत बहुमोल वेळ दिला . गीतेत भगवान श्रीकृष्णाने " कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन् " असे सांगितले आहे . कोणत्याही फलाची आपेक्षा न करता सतत कर्म करीत रहावे असे या लोकाचे मर्म मा.नानासाहेबांनी कर्मच आपले जीवन सुख मानले . आजही ते एखाद्या तरूणाला लाजवील इतके उत्साही , वक्तशीर , कोणतेही काम करण्यास सतत पुढेच असतात . त्यामुळे त्यांना कर्मयोगी म्हणणे वावगे ठरणार नाही. एक प्रसंग मा.नानासाहेबांच्या सहवासातला अगदी मनावर कोरला गेला आहे . एकदा वालझिरीस यात्रेच्या पूर्वतयारी निमित्त वारकरी संप्रदायाची रात्री १-०० वाजता मिटींग होती . त्या मिटींगसाठी मला त्यांच्याबरोबर जाण्याचा योग आला . कोणत्याही सामान्य माणसाने एवढ्या रात्री तेथे जायचे टाळले असते . हे नानासाहेबांमधील असामान्यपणच आहे यात शंका नाही . यावरुन नानासाहेबांजवळील वेळेला महत्व व कर्तव्यदक्षता दिसून येते . तसेच शिक्षण कार्याबरोबरच वारकरी संप्रदायाशी सुद्धा नानासाहेब निगडीत असल्याचे आपणास दिसून येते .
त्यांच्या संपूर्ण जीवनावर महात्मा गांधी , साने गुरुजी , विनोबा भावे यांच्या तत्त्वज्ञानाचा पगडा आहे . नव्हे त्यांच्या विचारांशी ते इतके एकरुप आहेत की , या थोरांच्या तत्वज्ञानाप्रमाणे श्रमाला त्यांनी जीवनता अनन्यसाधारण महत्व दिले . जणू काही श्रमदान हाच नानांचा छंद . मध्यंतरी भारताच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी ९ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या सप्ताहात श्रमदान व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता . या कार्यक्रमात मा . नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा सहकाराचा पैलु निदर्शनास आला की , " साथी हाथ बढाना , एक अकेला थक जायेगा , मिलकर बोझ उठाना ' या सुप्रसिद्ध गीतांच्या पंक्ती नकळत ओठावर आल्या . सामाजिक कार्याची त्यांना मनापासून आवड . म्हणून ते सतत वेगवेगळी शिबिरे घेत असतात . या शिबिरात विधायक कार्याबरोबर अध्यात्मिकतेचीही जोड असते . शिबिरात गेल्यामुळे शिबिरार्थीच्या विचारांची देवाण घेवाण होते . माणसांच्या मनोवृत्तीत बदल होतो , मन प्रसन्न राहते , काम करण्याची प्रवृत्ती अंगी बळावते , शिवाय आपण समाजासाठी काहीतरी केले हे प्रचंड समाधान ही असतेच असते . असे ते नेहमीच शिबिराच्या माध्यमातून शिबिरार्थीना सांगत असतात . संत तुकारामाने आपल्या अभंगवाणीत म्हटले आहे की , " सुख पाहता जवापाडे , दुःख पर्वताएवढे ! " नानासाहेबांच्या जीवनात अनेक समस्या आणि संघर्ष आलेत . परंतु ते डगमगले नाहीत . त्यांना अशा संघर्षामध्ये शक्ती मिळाली ती निरामय सेवेतून . त्यांच्यावर लहानपणापासून असलेल्या आध्यात्मिक संस्कारामुळेच . त्यांच्या वागण्यातून- बोलण्यातून जसा अहंकार कधी जाणवत नाही त्याप्रमाणे जातियता हा शब्द त्यांच्या कोशात नाही . त्यांना कोणत्याही जातीविषयी असूया नसून सर्व जातींविषयी आपुलकी , प्रेम व सदैव पददलीतांचे व समाजातील सर्व घटकांचे हित साधणारे श्रेष्ठ सत्पुरुष आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .
तसेच त्यांना अंध - अपंगाविषयी देखील अत्यंत कळवळा आहे . चाळीसगाव येथे अंधशाळा काढुन त्यातून ते सिद्ध झालेले दिसते . नानांबरोबर आंतरभारतीच्या कार्यक्रमासाठी मुंबईला जाण्याचा प्रसंग आला . तेव्हा सोबत असलेल्या अंधांना त्यांनी बोट धरुन मुंबईत फिरविले व मुंबईची माहिती दिली . हा प्रसंग त्यांच्यातील मानवता व अंधांविषयी असणारा जिव्हाळा सांगून जातो .
एक शांत , सोज्वळ मानवतावादी , आधुनिक संतश्रेष्ठ सत्पुरुष म्हणजेच मा . नानासाहेब . असे म्हणणेच योग्य आहे असे मला वाटते.
या त्यांच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त परमेश्वर त्यांना उंदड , दीर्घ , आयुरारोग्य प्रदान करो . त्यांच्या हातून अधिकाधिक भरीव समाजकार्य घडो अशी या प्रसंगी प्रार्थना व सदिच्छा !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा