जै से दीप कलीका धाकूटी
बहु तेजाते प्रकटी ।
तैसे सबुद्धी थेकूटी म्हणो नये ॥
माझा आनंद दुणावला । श्री . यशवंतराव नाना चव्हाणांचा अमृतमहोत्सव होणार . नानांचा परिचय सांस्कृतिक विचार प्रसाराच्या देवाण घेवाणीमधून झाला . गांधीजी , विनोबाजी , साने गुरुजी यांच्या विचार प्रेरणेतून काही पुस्तके प्रकाशित करण्यात थोडासा हातभार लागला . ती बुके नाना हमखास खरेदी करीत .
नानांच्या राष्ट्रीय विचार विकासाचे प्रेरणास्थान कै हरिभाऊ चव्हाण यांची ओळख धुळे जेल व हरिजन सेवक संघ कार्याच्या सहभागातून झाली व ती सतत वाढत गेली . त्यातून चव्हाण नानांच्या भेट परिचयाची मला अमोल देणगी लाभली .
तसे चाळीसगाव धुळे काही मोठे अंतर नाही . सरहद्दी एकमेकांच्या जवळच्याच , शिवाय धुळ्याशीच नव्हे तर धुळे जिल्ह्याशी नानांचे घनिष्ठ संबंध राहीले . धुळे शेतकी शाळा , गरुड हायस्कूल , प्राणीरक्षक संस्था , सोद्धारक संस्था व अन्य शिक्षण संस्था इ मुळे त्यांचा संपर्क अधिकच दृढ होत गेला .
ह्या लेखाच्या प्रारंभी दिलेल्या वचनानूसार नानांचा ज्ञानदीप तेजाने प्रकटला. येवढेच नाही तर त्यांची सद्बुद्धी थेकूटी पडली नाही . भडगाव , पाचोरा इ . तालुक्यांपर्यंत नानांनी विकास गंगा पोहचवली . साने गुरुजी कथामाला व भूदान गंगेतही नाना रंगले - आणि त्यांनी अन्य लोकांनाही रंगविले .
' धन्य तो देश पावन ते कुल जेथे जन्म घेती सद्विचारांचे अभ्यासक ' ' दुर्लभम् भारते जन्म : ' असे अभिमानाने म्हणता येईल .
कोणाजवळ ग्रंथसंग्रह , कोणाजवळ वाद्यसंग्रह असे विविध संग्रह असतात . नानांचा विविध मित्रांचा संग्रह आहे . तो ध्यानी घेता हीच प्रार्थना की त्यांचा अमृतमहोत्सव सोहळा संपन्न होवो . या उत्सवातच फक्त नव्हे तर पुढे त्यांच्या शंभरीच्या उत्सवातही सामील होण्याचे भाग्य आम्हा लाभो आणि ह्या अमृताची गोडी सर्वांना सदैव प्रसन्नता प्रदान करो , हीच शुभेच्छा !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा