' जे उरात उरते काही
ती प्रेरक शक्ती मजला
जगण्याची देते ग्वाही . " या काव्यपंक्तीची मला सदैव आठवण होते ती ऋषीतुल्य , परमपुजनीय , पितृतुल्य मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण यांच्या जीवनचरित्राकडे बघून . नानासाहेबांचा सामान्य परिस्थितीच्या , मध्यमवर्गीय घरात जन्म झाला . खडतर प्रयत्नांनी परिस्थितीशी झुंज देत त्यांनी प्रायमरी शिक्षणापासून ते एल.एल.बी. पर्यंतचे शिक्षण घेतले . शिक्षणात खूप अडथळे आलेत , प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत देत जीवनाचा मार्गाक्रमण केला . आपल्या घरगुती परिस्थितीविषयी कधी नाराजी दाखविली नाही- म्हणतात ना , " "जन्मा येणे देवा हाती , करणी जग हासवी ।
गाणे व्यर्थची कुलथोरवी ॥ "
हे नानासाहेबांनी सार्थ करून दाखविले . आपल्या कर्तृत्वाने , नानासाहेब स्वत : साठी कधीच जगले नाहीत . अहर्निश त्यांनी स्वतःला वाहून घेतले ते शैक्षणिक कार्याला . विविध शैक्षणिक संस्था काढून तालुक्यातील , तालुक्याबाहेरील नव्हे जिल्हयाबाहेरील तरूणांना देखिल नानासाहेबांनी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यात , त्यांनी ' शिक्षणा ' सारख्या पवित्र कार्याला वाहून घेतले . तळागाळातील ग्रामिण जीवनातील मुलांना शिक्षण उपलब्ध करून दिले . प्रथम मुलांचे वसतीगृह काढून मुलांची राहण्याची व्यवस्था केली . खेडयातील मुलं आपल्या परिस्थितीनुसार बोर्डिंगमध्ये धान्य जमा करत . नाममात्र पैसे देत . एखादया मुलाची परिस्थिती अत्यंत गरीबीची असेल , त्या मुलाची शिक्षणाची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्याला पूर्ण सवलत देत - पण त्याला शिक्षणापासून वंचित ठेवत नसत .
वसतीगृह - शाळा - कॉलेज काढायचे , चालवायचे . म्हणजे पैसे हवेत . त्यासाठी नानासाहेबांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिलेत . देणग्यांच्या रूपाने पैसा उभा केला अजूनही हे कार्य चालूच आहे , असंख्य विद्यार्थ्यांना नानासाहेबांनी शिक्षणाची दारे उघडी केलीत . नानासाहेबांनी सुरू केलेल्या शाळा , कॉलेजातून डॉक्टर , इंजिनिअर , वकिल , प्राध्यापक , शिक्षक वा अन्य विभागात उच्च पदस्थ जागा प्राप्त झालेले विद्यार्थी आज देखिल नानासाहेबांचे ऋणी आहेत . त्यांच्यापुढे ते आदराने नतमस्तक होतात . त्यातलीच मी एक , माझे दहावीपर्यंतच शिक्षण माझ्या मामांकडे झाले . माझे वडिल मी लहान असतांनाच वारले होते . मी मॅट्रिकच्या वर्गात म्हणजेच अकरावीत गेले आणि त्याच सुमाराला माझ्या मामांची नोकरी गेली . त्यामुळे मला खेडयात आईजवळ रहाव लागलं . माझ्या मनातून शिकण्याची खूप इच्छा होती . पण शहरात कोठे राहणार . खेडयात सातवी पर्यंतच शाळा होती . अशा अवघड परिस्थितीत माझ्या मामांनी नानासाहेबांची भेट घेतली . माझ्याबद्दलची हकिकत सांगितली . नानासाहेबांनी अंर्तमनात विचार केला . कदाचित नानासाहेबांनी विचार केला असेल . आपण मुलांचे वसतीगृह काढले त्यांच्या शिक्षणाची सोय झाली पण मुलींच्या शिक्षणाचे काय ? नानासाहेबांनी निर्णय घेतला ' मुलींचे वसतीगृह ' काढायचे आणि वसतीगृहाची पहिली विद्यार्थीनी त्यांच्यासमोर अडचणी घेऊनच उभी होती.
मुलींचे वसतीगृह म्हणजेच ' कन्या छात्रालय ' काढायच म्हणजे स्वतंत्र जागा हवी . ती उपलब्ध नव्हती . शिवाय कन्या छात्रालय म्हटलं म्हणजे अत्यंत जबाबदारी . ग्रामिण भागातील पालक मुलींना शहरात राहण्याची व्यवस्था नाही म्हणून शिकायला पाठवत नसत . नानासाहेबांनी घेतलेला निर्णय अंमलात आणला . मुलांच्या वसतीगृहातीलच एक खोली ' मुलींचे वसतीगृह ' म्हणून वापरायला घेतली . नानासाहेब वसतीगृहातच रहात असत . सौ . ताईसाहेबांवर मुलींच्या वसतीगृहाची ' कन्या छात्रायलाची जबाबदारी सोपविली . मी कन्या छात्रालयाची पहिली विद्यार्थीनी . नानासाहेबांच्या सुविद्य पत्नी मा . सौ . सुशीलाताईंनी विनामुल्य अनेक वर्ष कन्या छात्रायलास योगदान दिले .
ते वसतीगृहातील विद्यार्थ्यांना स्वत : शिकवित असत मला देखिल बऱ्याच वेळा नानासाहेबांनी कठिण बीजगणिते सोडवून दिली होती . कन्या छात्रालयात मी एकटीच असल्याने नानासाहेबांनी आपली स्वत : ची पुतणी माझ्या सोबतीला ठेवली . सौ . सुशीलाताई देखिल माझ्यावर मुलीसारखे प्रेम करीत . मी वसतीगृहात रहाते आहे असे मला कधी वाटलेच नाही . कारण नानासाहेबांचे घर हे आपल्या आईवडिलांचेच घर आहे असेच वाटे . कुठलीही उणिव मला भासत नव्हती . आज त्याच छात्रालयात विद्यार्थीनींची संख्या वाढली आहे . मुलींची प्रवेश घेण्याची संख्या वाढल्याने मुली आता शिक्षणापासून वंचित नाहीत . सौ . ताईसाहेबांनी ' कन्या छात्रायला ' साठी तन मन - धन अर्पण केले . अलौकिक पुरूषांच्या मोठेपणात त्यांच्या सहचरणीचा सहभाग असतोच . त्याला सौ . ताईसाहेब देखिल अपवाद नाहीत . संसाराची कुठलीही आच नानासाहेबांना पोहचू दिली नाही . त्यामुळे नानासाहेब विरक्तच राहिलेत .
नानासाहेब मुलांच्या वसतीगृहाकडे जातीने लक्ष देत . स्वतः साडेचार ते पाच वाजता उठत . विशेष म्हणजे सौ . सुशीलाताई देखिल त्याच वेळी उठत . मुलांची प्रार्थना होई . नानासाहेब प्रार्थनेतसहभागी होत असत . सुंदर , सुरेल आवाजात प्रार्थना निनाद , सर्व वातावरण मंत्रमुग्ध होऊन जाई . परमपुज्य साने गुरुजींच्या लेखणीतून प्रसवलेली प्रार्थना , पवित्र शुध्द अंत : करणाने गायिलेली ज्ञानमार्गाजवळ नेणारी- ज्ञान मिळविणे म्हणजे परमेश्वर प्राप्तीच करून घेणे . मात्र हे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान असले पाहिजे . सर्व जग रहाटीच्या मुळाशी काय आहे , ते जाणून घेण्याची तळमळ ज्या ज्ञानाच्या प्राप्तीने शमते . मनातील तळमळीला योग्य उत्तर ज्यामुळे मिळते ते ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान होय . हे ब्रह्मज्ञान म्हणजे स्वत : च स्वत : ला जाणून घेणे . " जाणावे आपणासी आपण । या नांव ज्ञाना " असे समर्थानी म्हटले आहे . अशीच प्रार्थना साने गुरुजींची . नानासाहेब स्वत : आधी प्रार्थना म्हणायचे आणि त्यांच्या मागून विद्यार्थी म्हणत .
" खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ।
जगी जे हीन अती दलित । जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे .. "
नानासाहेबांचे जीवनचरित्र जर बघितले तर किती खडतर जीवनातून त्यांनी प्रतिकुल परिस्थितीतून वाटचाल केली आहे . ' 'राष्ट्रीय वसतीगृहाची' स्थापना केली , एल्. एल्. बी. असून देखिल वकिलीचा व्यवसाय न करता आनंदीबाई बंकट हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली . नानासाहेबांनी जर वकिली व्यवसाय केला असता तर खूप श्रीमंत राहिले असते . पण जन सेवा हीच ईश्वरसेवा ' मानून त्यांनी वरती लिहिल्याप्रमाणे तन - मन - धनाने शैक्षणिक कार्याला वाहून घेतले . खड्डे जीनमध्ये त्यांनी राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना केली . कै . हरिभाऊ चव्हाण थोर स्वातंत्र्य सैनिक यांचे हस्ते विद्यालयाचे उद्घाटन केले . नानासाहेबांनी संस्थेचे चिटणीस म्हणून पद भूषविले ते १ ९ ५३ ते १ ९ ७७ पर्यंत . त्यावेळी नानासाहेबांच्या मदतीला होते कै . रामराव जिभाऊ , के . मोतीरामभाऊ , कै . राजाराम भाऊ , मा . श्री . अण्णासाहेब सोनूसिंग धनसिंग पाटील आणि मा . अण्णासाहेब उदेसिंग पवार . सगळेजण एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेले . सत्तेची लालसा नसलेले . त्यांनी ओळखले होते नानासाहेब या क्षेत्रात परिपूर्ण आहेत म्हणून त्यांच्या कार्यात त्यांनी कधी ढवळाढवळ केली नाही . १ ९ ८७ पासून ते आजतागायत नानासाहेब चेअरमन आहेत . पुढे ते असेच तहहयात चेअरमन राहतील . नानासाहेब जोपर्यंत संस्थेचे चेअरमन आहेत तोपर्यंत हा शैक्षणिक वृक्ष असाच निकोप राहिल यात शंका नाही .नानासाहेब,आमच्या ठिकाणी तुमच्या बद्दल आदर आहे,श्रध्दा आहे,आम्हाला तुम्ही हिमालयासारखे उत्तुंग,सागरासारखे अथांग वाटतात.आमच्यातील ग्यानज्योत तुम्ही तेवत ठेवली.परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.आपणास आरोग्य लाभो.हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा