'यशवंतराव नाना चव्हाण शिक्शणातील एक अखंड तेवती ज्योत'(प्रा.वसंत चव्हाण,संपादक साप्त.शब्दशक्ती,जळगाव)'
आज यशवंतराव नानांच्या व्रतस्थ जीवनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत . त्यातील ४५ वर्षे अगदी उमेदीच्या काळापासून ते आजतागायत बहुजनांच्या जीवनातील अंधार हा शिक्षणानेच दूर होवू शकेल हया श्रध्देपोटी खेडयापाडयात ज्ञानाची गंगा पोहचवण्याचे अविरत कार्य करणाऱ्या यशवंतराव नाना चव्हाणांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या चरणावर आमुचा माथा !
मी हिमालय तर अद्याप पाहिला नाही पण त्याची उंची गाठणारे माझ्या सार्वजनिक जीवनात जे थोडेफार लोक आलेत त्यापैकी एक श्री . य.ना. तथा नानासाहेब चव्हाण हे आहेत . आम्ही लहान असतांना राष्ट्रसेवादलाच्या शाखेवर जायचो . साने गुरूजींच्या गाण्यांची पारायणे करता करता गुरूजींचा फोटो जो घरात लावलेला होता त्याकडे निरखून पाहता पाहता तशीच एक मूर्ती आपल्या वडिलांकडे वारंवार येते हे लक्षात यायचं ... ते हॉलमध्ये बसतात आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या संदर्भात काही - बाही चर्चा करतात . काहीच कळत नव्हत , पण ते बालपण शाखेवरच्या संस्काराने पोसले जाणारे असल्याने तुलना करू लागले की शाखांनायकाने सांगितलेल्या गोष्टीतील गुरूजींसारखा पेहराव व गोड मिठास वाणी . हेच तर गोष्टीतले साने गुरूजी नाहीत ना ! .... अस वाटत राहायचं साने गुरूजी आम्ही पाहिले नाहीत कारण गुरुजी गेलेत तेव्हा कुठे मी अवघा सहा महिन्याचा होतो . माझे वडिल आणि सारा परिसर भाग्यवान असा की त्यांच्याबरोबर काही अंतर चालत गेले ... याचच त्यांना अप्रूप वाटायच .... यातच ते धन्य झाले . गुरूजी जरी पाहिले नाहीत तरी गुरूजी जो संस्कार सोडून गेले त्याचे वारसदार आम्ही आहोत . मी सातवीच्या परिक्षेत केंद्रात पहिला आल्याने आमच्या मनातले साने गुरू जी आमच्या घरी योगायोगाने आले . त्यांना वडिलांनी माझा पराक्रम सांगितला . गुरूजी खुष झाले अन् त्यांनी माझं अभिनंदन केलं . मला काहीच समजत नव्हत पण कोणीतरी मोठी व्यक्ती आहे म्हणून मी पाया पडला आणि त्या थोर व्यक्तीने माझ्या वडिलांना सांगीतले , हयाला चाळीसगावला पाठवा . टेक्नीकलमध्ये प्रवेश द्या . गावात शाळा असूनही वडिलांनी हया मोठया माणसाचा आदेश मानला आणि मला नाना टेक्नीकलसाठी आपल्या सोबत घेवून आलेत . मी वाचलं होतं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी कौलापूर हया लहानशा खेडयातून फाटक्या चड्डीतल्या पांडुरंगाला खांदयावर उचलून घेतले व शिक्षणासाठी आपल्या सोबत आणले . पुढे तो पांडुरंग शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू बॅ . पी.जी. पाटील झाला . मलाही असचं काहीस वाटू लागल . हया मोठया माणसाचा परिस स्पर्श आपल्याला झाला नक्कीच आपलं सोनं होईल . तेव्हा सेवादलाची ठिकठिकाणी होणाऱ्या शिबिरांना मी जावू लागलो . तेथेही राजारामभाऊ , नाना हे माझ्या अगोदर हजर . मला बोलायला लावायचं . चर्चेत भाग घ्यायला शिकवायचे . गाणी म्हणं ... खेळ असं सारखे मागे लागायचे . बरचं काही ऐकवायचं , आम्हांलाही बर वाटायचे , ते मंतरलेले दिवस होते . आम्हाला त्या राष्ट्रीय शाळेत खरच राष्ट्रीयत्वाच शिक्षण मिळाले ते हया ध्येयवेडया नानांमुळे . म्हणून त्या नानांना माझा पहिला सलाम ! .... बराच काळ गेला आणि १ ९ ७२ च्या सुमारास राष्ट्रसेवादलाचं राष्ट्रीय पातळीवरचं मुंबईला मानखुर्द येथे अधिवेशन होते . मी सेवादलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता व पदाधिकारी असल्यामुळे माझ्या महाविद्यालयातील १५ ते २० सैनिकांचा ग्रुप प्रा . काकडे काकांच्या सोबतीने जाणार होता . पूर्वतयारीची बैठक काकडेकाकांनी राष्ट्रीय विद्यालयात घेतली होती तेथे हे धोती - टोपी - खादीधारी नाना हजर . माझ्या मनातले हे साने गुरुजी काही जात नव्हते अजूनही मला ते साने गुरुजीचं वाटत होते . मी मनाला कल्पनेच्या विश्वातून वास्तवात आणलं . गुरुर्जीच वाङमय वाचलं तेव्हा आपल्या जन्माच्या काही दिवसांच्या अंतराने गुरूजी गेलेत तरीही आपल्या मनात गुरूजींच स्थान पक्क घेवून बसणारी ही व्यक्ती का जात नाही याचा अचंबा वाटत होता . काही समजतं नव्हतं . नानांनी काही सुचना केल्या आणि अंधांच्या जीवनाबद्दल माहिती दिली . आम्हाला भडभडून आलं आणि नेमका त्याच वेळेचा फायदा घेवून आमच्यापुढे प्रश्न टाकला . मग अंधासाठी तुम्ही काय करणार ? आम्ही गप्पचं . काहीच सुचेना ... नानाच बोलू लागले , आपण सर्वजण शिबिराला जाणार तेव्हा यांनाही आपण सोबत घेवून जावू . आम्हाला त्यावर काही प्रश्नच करता येत नव्हते , कारण नानांचा नैतिक दबावच एवढा होता की ते नक्कीच काही चांगलं करतील . अंधांच्या मनाचा विचार करणारे नाना मला त्या दिवशी खूप श्रीमंत मनाचे वाटले. मुंबईच्या त्या शिबिराने मला खूप काही दिले पण त्या सर्वापेक्षा जास्त काय दिले असेल तर निष्काम कर्मयोग ज्याला म्हणतात त्याचा प्रत्यंतर यशवंतराव नानांच्या कृतीतून प्रगट झाला आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होण्यास देखील आपण अपुरे आहोत याची जाण झाली . प्रसंग असा होता की नानांनी अंध शाळेतील विद्यार्थी शिबिरासाठी आणले होते . पॅसेंजरचा दिवसभराचा प्रवास . खाण्यात , पाण्यात बदल झाल्यामुळे मुलं खूप थकली होती . नवीन जागा असल्यामुळे अंधांच्या विधी करण्याच्या जागा सवयीनुसार ठरलेल्या असतात त्यामुळे फारशा अडचणी येत नाही , येथे मात्र तंबूची व्यवस्था असल्याने सवयीन वेळ लागणार .... त्यात पुन्हा मुलं थकलेली असल्याने त्यांनी रात्री तंबूत घाणीचे आगारच करून टाकलं , नाना जवळच असलेल्या पुरूषांच्या तंबूत झोपले होते , तेही दिवसभर गाडीत सर्वांवर लक्ष ठेवून थकले होते त्यामुळे सकाळी उठता उठता पाहता तो त्या तंबूच्या सर्व बाजूंनी माशांनी वेढले होते आणि आजूबाजूचे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सैनिक जमा झाले . तेही माशां सारखेच गोंगाट करू लागले . प्रमुखाला बोल लावू लागले की , अंधांना कशासाठी आणले ? वगैरे बोलू लागले . सेवादलाच्या शाखेवर घेतलेले संयम , सेवा , त्याग , पिडीतांबद्दल कणव हे संस्कार क्षणार्धात वितळून गेले आणि हया अंध मुलांनी खूप काही अपराध केला हया भावनेने त्यांचे तिरस्कारी करण्याचे शब्द हया मुलांच्या हृदयाला छेडून जात होते . मुलं घाबरली होती आणि तंबूच्या एका कोपऱ्यात थरथर कापीत रडकुंडीला आली होती , आपल्या प्रारब्धाच्या नावाने मनात रडत होती मोठं करूणामय व संवेदनशील मनाला हेलवणारे दृश्य होते . सर्वत्र कोलाहल चालू होता . शिव्या शाप ऐकून घेण्यापलीकडे बिचारे विद्यार्थी काय करू शकत होते , परिस्थितीपुढे दुबळे होते . नानांनी प्रथम सर्वांना शांत केले , व जमलेल्या जमावाची माफी मागून मला थोडा अवधी द्या मी सर्व स्वच्छ करून देतो असे आश्वासन दिले . सर्व गर्दी पांगली , नाना कुणावरही न रागवता चिडता त्या मुलांजवळ गेलेत त्यांना धीर दिला . आमची सूरदास मंडळी भितीने अक्षरश : थरथरत होती . लोक तर मुलांची कीव करून नाकाला रूमाल लावत निघून गेली आणि मग हया कर्मयोग्याच्या कामाला सुरूवात झाली . नानांनी प्रथम बादल्या भरून पाणी आणले आणि ऐकऐका सुरदासाला दगडावर उभं कराव लहान मुलांना जशी आंघोळ घालतो तसं अगदी मायेच्या ममतेने सारं ते करीत होते , कुठेही उपकाराची भाषा नव्हती की भाव नव्हता उलट ते आपलं कर्तव्यच आहे अशी भावना होती . आम्ही ते दृश्य पाहिले आणि आमचीच आम्हाला लाज वाटू लागली . नकळत आमचे हात त्या रिकाम्या बादल्यांकडे गेलेत आणि नानांच्या त्या कार्याला मदत करण्याची संधी मिळाली , नानांनी सूरदासांची व्यवस्था केल्यावर संपूर्ण तंबू अगदी पहिल्यासारखा स्वच्छ करून टाकला .. हे प्रसंग जेव्हा जेव्हा आठवतात तेव्हा बाबा आमटे खरचं कुष्ठरोग्यांची सेवा करतात काय ? असा क्षुद्र प्रश्न विचारणाऱ्या क्षुद्र माणसांची कीव येते व नानांबद्दलचा आदर अधिकच दृढ होतो . जेंव्हा जेंव्हा म्हणून अपंग , अंध व्यक्ती मला दिसली की किंवा त्यांच्याबद्दल दयेच्या भावनेने कोणी तावातावाने बोलत असेल तेंव्हा मात्र एकदम नानांची अंधांबद्दलची भूमिका डोळ्यासमोर येते व माझा माथा नकळत त्यांच्या नावापुढे टेकला जातो .
नानांसोबत मी साने गुरूजी कथामालेच्या कामात बराच काळ .बरोबर होतो . मी जो हया संस्थेत शिक्षक म्हणून आलो तो साने गुरुजींच्या विचारांनी भारावूनच आलो होतो , अंत्योदयाचा विचार फक्त समाजवादी विचारधाराच पूर्ण करू शकते . त्याशिवाय पर्याय नाही याची मला खात्री आहे . म्हणून मुंबईसारख्या शहरातील सचिवालयातील नोकरी सोडून विचारांची बांधिलकी मानून काम करावं अशी माझी धारणा होती व त्यातूनच शाळा शाळांमधून विचारवंतांची व्याख्याने आयोजीत करावीत , शिबीरे घ्यावीत , प्रबोधन घडवावे आणि मुलांसाठी सानेगुरूजींचा प्राण असलेल्या सेवादलाच्या शाखा काढाव्यात . त्याप्रमाणे मला संस्थेत संधी मिळताच कामाला लागलो . नानांचा त्याला पूर्ण पाठिंबा मिळाला . नाना स्वतः लक्ष घालून मदत करू लागले आणि बघता बघता संस्थेतील सर्वच शिक्षकांनी हया कामाला बांधून घेतले . कारण हे काम काही माझ एकटयाचं किंवा नानांचं , बाहीकरांचं , बी.एस भाऊंचं किंवा माधव वाबळेचं नव्हतं तर ते आपणा सर्वांचं आहे ही भावना आम्ही सर्वांमध्ये निर्माण करू शकलो आणि सर्व संस्थाच सेवादलमय कथामालामय झाली मला येथे आल्याचे समाधान झाले . प्रथमत : नानांचा संबंध हा वैचारिकदृष्ट्या महात्मा गांधींच्या चळवळीपासून सुरू होवून विनोबांच्या भूदान चळवळीपर्यंतचा असल्यामुळे त्यांच्या मनात समाजवादी मंडळीबद्दल थोडीशी कडवट भूमिका होती ती मला जाणवत होती . परंतु सानेगुरुजींबद्दल त्यांचे प्रेम वादातीत होते .त्यांच्या विचारांवर त्यांची नितांत श्रध्दा होती आणि हेच मी हेरून भावना आम्ही सर्वामध्ये निर्माण करू शकलो आणि सर्व संस्थाच सेवादलमय कथामालामय झाली मला येथे आल्याचे समाधान झाले . प्रथमत : नानांचा संबंध हा वैचारिकदृष्ट्या महात्मा गांधींच्या चळवळीपासून सुरू होवून विनोबांच्या भूदान चळवळीपर्यंतचा असल्यामुळे त्यांच्या मनात समाजवादी मंडळीबद्दल थोडीशी कडवट भूमिका होती ती मला जाणवत होती . परंतु सानेगुरुजींबद्दल त्यांचे प्रेम वादातीत होते . त्यांच्या विचारावर त्यांची नितांत श्रध्दा होती आणि हेच मी हेरून सर्वांचा वीक पॉईट साने गुरुजी आहेत म्हणून त्यांच्या मनातील कडवटपणा दूर करून साने गुरूजीसाठी तरी आपण एकत्र येवून काम करू या . या भूमिकेवर त्यांना आणलं व साने गुरुजी कथामालेचं काम नानांनी सुरू केले . भावजागरण दिंडी व सानेगुरूजी मंगल यात्रेने तर नानांच्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मध्यवर्ती समितीचे कोषाध्यक्षच बनवून टाकले व फेब्रुवारी १ ९९ ४ ला नानांनी चक्क अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेचे २२ वे अधिवेशनच ह्या साने गुरुजींच्या सहवासाने संस्कारीत झालेल्या खानदेशात भरवून आंतरभारतीचा परिवार निर्माण करण्यात चंद्रकांत शहांच्या मदतीने नाना यशस्वी झालेत . आणि आता तर या सर्व कार्याची पोच म्हणून की काय अ.भा.सा. गुरूजी कथामालेतर्फे दिला जाणारा या वर्षाचा ' बालसेवा पुरस्कार ' यशवंतराव नानांकडे चालत आला . एवढयावरच ह्या पुरस्काराचं येणं थांबलं नाहीतर आता तर पुरस्कारच चाळीसगावला शोधत येत आहेत
आणि पुन्हा साने गुरूजी हाउसिंग सोसायटीतल यशवंतराव चव्हाण यांना नाशिक येथील' सारडा 'प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी दिला जाणारा तेवढाच प्रतिष्ठेचा मानाचा माला जाणारा' नंदिनी' पुरस्काराने अधिष्ठान वाढले असे आम्हाला वाटते. या कथामालेच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले.त्यांचा स्वभावच असा झोकुन देण्याचा आहे. नव उभ करण्याचा आहे त्यासाठी पडतील ते कष्ट सहन करून, प्रसंगी मानहानी ही त्यांनी स्वीकारून काम तडीस नेले आहे. म्हणून सार्वजनिक कामात त्यांची भूमिका सहकार्याची असते त्याचे मूर्त स्वरूप म्हणून आज महाराष्ट्रात गुणात्मक दृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या संस्कारक्षम अशी संस्था नाना उभी करू शकले . फार मोठ्या भव्यदिव्य इमारती नसतील पण त्या ठिकाणी अध्यापनाचे संस्काराचे काम करणारा गुरुवर्य हा नानांच्या संस्कारित राष्ट्रीय विचारांच्या कुठल्यातरी शाखेवर चा माजी विद्यार्थी आहे म्हणून तेवढ्याच तन्मयतेने व कर्तव्याच्या भावनेने तो ऋणमुक्त होण्यासाठी विद्यादानाचे काम करतो हे करीत असतांना त्याच्या समोर आदर्श असतो त्यांचा की ज्यांचा दिवस सकाळी पाचला सूरू होतो , गीताई पठणाने त्यांच्या अवतीभवतीचं वातावरण प्रसन्न व निर्मळ होतं . त्यामुळे साध्या राहणीच्या निर्मळ मनाच्या नानांच्या हृदयात सदैव बहुजन समाजाचा उध्दार हाच असल्याने एकेकाळी बहुजनांसाठी शिक्षण किती कष्टाचे व दुरापास्त होते ते या बहुजन समाजातील लोकां साठी वकिलीची पदवी घेतलेल्या पण वकिली न करता शिक्षकाचा पेशा पत्करला व वर्तुळातच विशिष्टांसाठी शिक्षण ह्यात त्यांचा जीव गुदमरू लागला व ही ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत , झोपडीपर्यंत गेली पाहिजे म्हणून ते वर्तुळ छेदून बाहेर पडले व प्रथम खेडयापाडयातील शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या ज्ञानपिपासूंची तहान भागावी म्हणून राष्ट्रीय बोर्डींग काढली . स्वत : जातीने लक्ष देवून वर्गणी , देणग्या गोळा करून जाणीवपूर्वक खेडयापाडयातील अडाणी बापाची मुलं शहरात आणली आणि शहाणं करून सोडण्याचं व्रत घेतलं . आणि ते पूर्ण केलं म्हणून त्यांना कर्मयोगी म्हणणं उचीत ठरेल .
प्रसंगी वेळोवेळी आरोप प्रत्यारोप झाले नाहीत असे नाही . वेळ प्रसंगी नानांनी कटू निर्णय घेतले , त्या प्रसंगी कदाचित ते अपरिहार्य होते असचं आपण समजू . नानांच मोठपण मान्य करीत असतांना आमच्यात आणि नानात कुठेतरी मदभेद झालेत पण कटूता नव्हती कारण आम्ही सर्व शेवटी साने गुरुजींच्या विचारांच्या पालखीचे वारकरी होतो . आमची बांधिलकी विद्यार्थ्यांशी होती, विचारांशी होती म्हणून कुठेही कटूता न येवू देता आमच्या लोकशाहीतील स्वतंत्र वाटा प्रसंगी आंम्ही चोखाळल्यात . काही दुष्ट शक्तींनी आमच्यात दुरावा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला . नानांचे प्रचंड काम व एवढा मोठा त्याग असतांना सुध्दा माझ्या सारख्याच्या मनात दुरावा निर्माण करण्यात काही कारणे कारणीभूत झालीत तसी त्यांच्याही मनात आपल्याविषयी दुरावा निर्माण करण्यात ही वर्तुळ करून जगणारी आपलीच मंडळी यशस्वी झालीत एवढ समाधान मानून शेवटी नानांचे ही पाय मातीचेच आहेत . काही प्रसंगी माणूस लडबडून जातो त्याला देवही अपवाद नाहीत शेवटी आपण तर सामान्य माणसं आहोत . राग , लोभ हा असणारच असं मानून संस्था बहुजनांची आहे म्हणजे आपणा सर्वांची आहे हाच विचार करून आम्ही सदैव नानांशी सहकार्यच केले . कदाचित आपलं कार्यक्षेत्र अधिक विस्तृत व्हावं हेच नियतीच्या मनात असेल म्हणून काही कटू प्रसंग येवूनही शेवट गोड झाला यातच समाधान आहे . माणसापेक्षा , आपला स्वार्थ , मान - सन्मानापेक्षा संस्था मोठी आहे , समाज मोठा आहे हे तत्त्व लक्षात घेवून संस्था उभारणीत सर्वांनीच सहकार्य केले म्हणूनच आज ४८ वर्षाच्या संस्थेच्या आयुष्यात शिक्षणाची जास्तीस जास्त क्षेत्रे कशी खुली करता येतील हाच कटाक्ष घेतला व बालवाडीपासून ते महाविद्यालये , आश्रमशाळा , अंधशाळा अशा ४६ शाखा सक्षमपणे उभ्या केल्यात . त्यात सुमारे २५,००० विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य सतत चालू आहे . खेड्यापाड्यातील शेवटच्या मुलापर्यंत ज्ञानाचा दिवा नेण्याचे काम नानांनी सतत ह्या माध्यमातून केले याबद्दल कुणाच्याही मनात त्यांच्याबद्दल आदरच ,आहे . हे संस्थात्मक काम करण्यासाठी नानांसारखी कर्मयोगी , त्यागी माणस किती काळ आपला वेळ , श्रम देवू शकतील याचाही विचार व्हावा . तशा प्रकारची दुसरी फळी नानांनी उभी करावी की त्यांनी ज्या संस्थेला एखाद्या प्रचंड वृक्षाचे स्वरूप प्राप्त करून दिले ते सांभाळण्यासाठी लागणाऱ्या ह्या दुसऱ्या फळीबद्दल आमच्यासारख्या नानांबरोबर संस्थेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना चिंता वाटते . तेवढी तोलामोलाची माणसं संस्थेत यावीत असा प्रयत्न जाणीवपूर्वक व्हावा . संस्थेचा नावलौकिक असाच राहून ती बहुजनांसाठीच कसे कार्य करीत राहील हे पाहिले जावे . सर्वांनाच यशवंतराव नाना होता येणार नाही पण नानांनी घालून दिलेले पायंडे , संस्थेला दिलेली दिशा ही अशीच गतीशील कशी राहील यासाठी सामुहिक नेतृत्व निर्माण व्हावं अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली तर ती काही अप्रस्तुत होईल असं वाटत नाही कारण आता संस्थेच्या जीवनात सिंहावलोकन करण्याचा काळ आला आहे . मध्यंतरी केवळ एकमेकांच्या अहंभावामुळे फाटाफुटीचे चित्र समाजापुढे आले आणि त्याचे परिणाम संस्थेच्या प्रगतीवर व नावलौकिकावर आघात करणारे ठरत आहेत असे आम्हाला वाटते म्हणून पुन्हा ह्या निमित्ताने विनंती की आपण सर्वांनी ह्या संस्थेच्या उभारणीत आपले योगदान देवूया व यशवंतराव नानांनी ज्या पध्दतीने ह्या संस्थेसाठी आपले आयुष्य पणाला लावले व ह्या ज्ञानयज्ञात आपल्या आयुष्याची आहुती दिली त्या नानांच्या ऋणात आपण सर्वजण आहोतच त्यांना चांगलं दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा