श्रमयज्ञाचे आम्ही पुजारी!(बाळासाहेब विश्वासराव चव्हाण,प्राचार्य,राष्ट्रीय कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)
नुकताच आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा केला . भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भारतमातेच्या असंख्य सुपुत्रांनी हसतहसत हौतात्म्य पत्करले . अनेकांनी तुरुंगवास पत्करला . लाठीमार सहन केला . आपल्या सौख्याची , कुटुंबियांच्या सौख्याची पर्वा केली नाही . अनेकांनी विविध आंदोलनामध्ये सक्रीय राहून अज्ञातवास पत्करला . स्वातंत्र्यापूर्वीची पिढी देश स्वतंत्र करण्याच्या ध्यासाने भारावून गेली होती . वाटेल तो त्याग करण्यास सज्ज होती . त्या भाग्यवान पिढीतील नानासाहेब आहेत .
देशाला स्वातंत्र्य मिळाले . स्वातंत्र्यानंतर मातृभूमीची सेवा कशी करायची ? कोणता मार्ग पत्करायचा ? नानासाहेबांच्या मनात प्रश्न निर्माण झाले . ध्येयासक्त मनाने कौल दिला , नोकरी करायची नाही , वकिलीही करायची नाही . शिक्षणप्रसाराच्या माध्यमातून भारतमातेची सेवा करायची . आपल्या गरजा अतिशय सीमित ठेवायच्या , अर्थार्जन करायचे नाही आणि शिक्षणप्रसाराचे पुण्यकर्म त्यांनी स्वीकारले.
ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत , गावात शाळा नसल्यामुळे ती शिकू शकत नाही . गरिबीमुळे शहरात जाऊन त्यांना शिक्षण घेत येत नाही . हे त्यांच्या मनाने हेरले . खेडयातील भारताचा विकास घडवून आणण्यासाठी शिक्षणासारखे समाजपरिवर्तनाचे दुसरे साधन नाही , हया विचारांनी प्रेरित होऊन ' शिक्षणप्रसार ' हे आपल्या जीवनाचे ध्येय मानून दिनचर्येचा प्रत्येक क्षण हया महान कार्यासाठी आजतागायत ते वेचत आहेत . राष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाचे पुनरूज्जीवन करून आपल्या कार्याला त्यांनी प्रारंभ केला .
महात्मा गांधी , आचार्य विनोबा भावे आणि पूज्य सानेगुरुजींचा नानासाहेबांवर मोठा प्रभाव आहे . गांधीजी म्हणत ' प्रत्येकाने ध्येयनिष्ठ व्हावे , शुध्द ध्येयं उराशी बाळगावीत , पण केवळ ध्येय शुध्द असून चालत नाही , तर त्या ध्येयापर्यंत नेणारी साधनेही शुध्द असावी लागतात " .
शिक्षणप्रसाराचे शुध्दध्येय नानासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवले. राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . चाळीसगाव , हया संस्थेची स्थापना केली . संस्थेच्या उभारणीसाठी सर्वसामान्यांना सहभागी करून घेतले , श्रमशक्तीचा उपयोग करून घेतला . ग्रामस्थ , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी हया सर्वांना आपण सुरू केलेल्या श्रमयज्ञात सहभागी करून घेतले . कर्मचाऱ्याच्या अंगी असणाऱ्या कारागीरीचा कौशल्याने उपयोग करून घेतला . आपले काम सांभाळून कर्मचाऱ्यांनी मोठया आनंदाने आपल्या कारागीरीच्या माध्यमातून संस्थेची सेवा केली . स्वत : नानासाहेब श्रमदान करतात . हे बघून प्रत्येकालाच स्फूर्ती मिळायची , प्रेरणा मिळायची , प्रत्येकजण मोठया आनंदाने श्रमदान करायचा आणि आजही करीत आहे . संस्थेच्या स्थापनेपासून नानासाहेबांनी चेतविलेले श्रमदानाचे यज्ञकुंड पूर्वीच्याच जोमाने आजही धगधगत आहे . श्रमदानाच्या माध्यमातून लक्षावधी रूपयांची कामे संस्थेत झाली आहेत . फार मोठी ताकद त्यामुळे संस्थेला प्राप्त होऊ शकली . संस्थेच्या प्रत्येक शाखेवर श्रमदान झाले आहे . योजकतेने सर्व कामे आखली जातात . सर्व कामाचे अचूक नियोजन केले जाते . जमीन समतल करणे , झाडांसाठी योग्य मापाचे खड्डे खोदणे , विहीर खोदणे , इमारतीचा पाया खोदणे , इमारतीच्या बांधकामात मदत करणे , परिसर स्वच्छ करणे , अशा प्रकारची कामे केली जातात . दरवाजे , खिडक्या , लोखंडी जाळया बनविणे अशीही कामे श्रमदानाच्या माध्यमातून केली जातात . झालेल्या कामाचं मूल्यमापन करून , तेवढे मूल्य संस्थेला देणगीरूपाने प्राप्त होऊन संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास त्यामुळे आपोआपच मदत होते .
संस्थेच्या विविध शाखांवर झालेल्या श्रमदानाचे स्वरूप कसे असते , हे आपणास अंधारी आणि राजदेहरे येथे झालेल्या कामांवरून कळेल .
अंधारी हे चाळीसगाव तालुक्यातील दुर्गम गाव . त्या ठिकाणी शाळा नसल्यामुळे , शिक्षणापासून वंचित होते . तेथे शाळा सूरू केली पाहिजे , हे नानांनी ठरविले . परिसरातील ग्रामस्थांना मोठा आनंद झाला . अंधारी येथे शाळा सुरू करण्यात आली . शाळेसाठी इमारत बांधण्याचे ठरले . परिसरात उपलब्ध असणारया बांधकाम साहित्याचा वापर करून , ग्रामस्थांच्या सहभागाने बांधकाम पूर्ण करायचे हे नानांनी ठरविले . कामाची आखणी करण्यात आली . अंधारी शिवारात , मन्याड नदीच्या खोऱ्यात इतस्तत : पडलेला दगड उपयोगात आणायचे ठरले . बांधकामासाठी चुना पाहिजे , चुन्यासाठी शिवारातील चुनखडी जमा करायची , मन्याड नदीच्या पात्रातील वाळूचा वापर करायचा हे निश्चित झाले . ग्रामस्थांना सर्व योजना आवडली . नानांच्या दोन हातांच्या मदतीला शेकडो हात पूढे सरसावलेत . परिसरातील चुनखडी वेचण्याचे काम सुरू झाले , गावातील स्त्रिया , मुले आणि पुरूषांच्या झुंडीच्याझुडी कामास लागल्यात . चुनखडीचे ढीग जमूलागलेत . गरीबाघरचे , श्रीमंताघरचे सर्व जातीजमातीचे अबालवृध्द हया कामात सहभागी झालेत . आपापल्या बैलगाडींवर ग्रामस्थांनी चुनखडी वाहून आणली , गावातील तरूणांनी चुना भाजण्यासाठी रानातून सरपण जमा करून आणले . जाणकार व्यक्तीकडून अल्पशा मोबदल्यात चुना भाजण्यासाठी भट्टी लावण्यात आली . पांढऱ्या शुभ्र रंगाची चुन्याची फक्की तयार झाली . इतरही भट्ट्या लावण्यात आल्या चुण्यासाठी घाणा तयार करण्यात आला.वाळू आणण्यासाठी गावातील बैलगाड्या मन्याड नदीच्या दिशेने धावायला लागल्यात. बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या नादाने सारा आसमंत निनादून गेला खंडो गणती वाळू वाहून आणली गेली . वाळू घाळण्यात आली . चुना मळणीचे काम सुरू झाले. प्रत्येकाने पाळीपाळीने आपली बैलगाडी घेऊन चुना मळून दिला. तीन-तीन तास घाणा चालवून उत्कृष्ट चुना तयार केला इतका दर्जेदार की भिंतीला मारल्यानंतर गोळा चिकटलाच पाहिजे .रानात, नदीच्या खोऱ्यात पडलेला दगड वर काढण्यात आला हातोड्याने फोडण्यात आला.गावकऱ्यांनी आपल्या बैलगाडीवर दगड वाहून दिला . बांधकाम सुरू झाले . पाया खोदणीही श्रमदानानेच करण्यात आली . गवंडयांच्या हाताखाली बांधकाम साहित्य पुरविण्याचे कामही श्रमदानानेच झाले . हळूहळू इमारत आकार घेऊ लागली . ग्रामस्थ , शिक्षक , स्त्रिया , मुले हे सर्व देवाचे मजुर झालेत . अंधारीच्या भूमीवर जी सरस्वतीदेवीचे मंदिर उभे राहिले . इमारती लाकूड आणि लोखंड आणि मजुरी हयासाठीच पैसा मोजावा लागला , इमारतीचे बाकी सर्व काम श्रमदानाने आणि परिसरात उपलब्ध असणाऱ्या सामुग्रीचा उपयोग करून करण्यात आले .
दुसरे उदाहरण राजदेहऱ्याचे देता येईल . राजदेहरे हे डोंगर कपारीतील गाव . अनेक तांडयापासून बनलेले , प्रामुख्याने वंजारी आणि आदिवासी बांधवांची वस्ती असलेले , अठरा विश्व दारिद्रय असलेले , शिक्षणापासून वंचित असणारे गांव . तेथील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी , म्हणून तेथे आश्रमशाळा सुरू करण्याचे नानासाहेबांनी ठरविले . शाळेसाठी जागा निश्चित करण्यात आली . सुमारे २ एकर क्षेत्रफळ असणारा भुखंड तो होता . त्यातून नाले वाहत होते . त्यामुळे मोठमोठया घळी त्या ठिकाणी पडलेल्या होत्या . श्रमदानाने आश्रमशाळेची इमारत बांधावयाची हे निश्चित झाले . श्रमशिबिरांचे आयोजन केले गेले . वेळापत्रकाप्रमाणे श्रमशिबिरे सुरू झालीत . विविध विद्यालयाचे विद्यार्थी , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , साने गुरुजी कथामालेचे कार्यकर्ते स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थी हयांनी श्रमशिबिरांमध्ये आपले योगदान दिले . सुमारे १५० शिबिरे आयोजित केली गेली . शिबिरार्थी स्वखर्चाने , स्वत : ची शिदोरी घेऊन शिबिरात दाखल व्हायचे , हे शिबिराचे वैशिष्टय . श्रमदानाबरोबरच बौध्दिकांचेही आयोजन केले गेले.गीता , ज्ञानेश्वरी , संतवाड:मय , साने गुरुजींचे वाङमय , पत्री काव्य संग्रहातील कविता हयातील नवनीताचे पौष्टिक खाद्य , सात्विक खाद्य शिबिरार्थीना नानासाहेबांनी आपल्या बौध्दिकांमधून पुरविले , त्यांच्या मनाची मशागत केली .
श्रमशिबिरात जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले , नाल्यांचा प्रवाह योग्य ठिकाणी अडविण्यात आला . झाडांसाठी खड्डे खोदून वृक्ष लागवड , फळझाडांची लागवड , विविध वेलींची लागवड करण्यात आली , विहीर श्रमदानाने खोदून तिचे बांधकाम झाले . इमारतीचा पाया खोदून इमारतीचे बांधकाम करण्यात आले . नानासाहेबांचे , शिबिरार्थीचे श्रम सार्थकी लागलेत . आज त्या भूमीवर वृक्षराजीने , फुलझाडे आणि विविध वेलींनी नटलेल्या निसर्गरम्य टुमदार इमारतीत साने गरुजी आश्रमशाळा शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचे जीवनउत्थान करीत आहे .
उपलब्ध साधनसामुग्री आणि मनुष्यबळाचा श्रमदानाच्या माध्यमातून कल्पकतेने उपयोग करून घेतल्याने शुन्यातून विश्वनिर्मिती होऊ शकते , हे नमुन्यादाखल दिलेल्या वरील उदाहरणावरून आपणास दिसून येईल .
विकसनशील अशा आपल्या भारतदेशात प्रचंड प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध आहे . फार मोठे मनुष्यबळ आहे . हयांचा उपयोग वरील तंत्राने करून घेतल्यास सुखी आणि समृध्दी अशा भारताची निर्मिती होऊ शकेल .
शिक्षणप्रसाराचे शुध्द ध्येय नानासाहेबांनी हृदयी बाळगलं , आपलं संपूर्ण आयुष्य त्यासाठी समर्पित करण्याचा संकल्प केला , सेवाभावी वृत्तीने निस्वार्थीपणाने समाजाची सेवा ते करीत आहेत . भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी , कामाचे सुयोग्य नियोजन , अचूक अंमलबजावणी आणि अथक परिश्रम हयांच्या जोरावर संस्थेच्या रूपाने एक वटवृक्ष त्यांनी उभा केला आहे . समाजाच्या सेवेच्या अनेक कल्पना त्यांच्या डोक्यात आहेत . अनेक स्वप्न त्यांनी उरी बाळगली आहेत . त्या कल्पना , ती स्वप्ने साकार होण्यासाठी परमेश्वर त्यांना शतायुषी करो , ही प्रभुचरणी प्रार्थना !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा