राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या भव्य - दिव्य अशा विद्यामंदिरात एक मूर्ती विशेष उठून दिसते . विलोभनीय वाटते . कुणाचेही लक्ष वेधून घेते . ही मुर्ती म्हणजे आदरणीय श्री . नानासाहेब चव्हाण होय .
आपल नाव काय असावं हे आपल्याला ठरवता येत नाही . माणसाला कळत नसतं तेव्हाच त्याच नाव ठेवलं जातं . पण आपलं नाव सार्थ करणं हे मात्र माणसाच्या हातात असतं . त्याच्या कर्तृत्वावर ते अवलबून असतं . आई वडिलांनी ठेवलेले यशवंत नाव नानांनी यथार्थ करुन दाखविले आहे . शिक्षणक्षेत्रात ते ' यशवंत ' ठरले आहेत . ' संसार सुखाचा अन् परमार्थ नेटका ' हीच नानांची प्रतिमा . ज्यांना स्वकर्तृत्वावर लोकमान्यता लाभली , जनमानसात ज्यांचेबद्दल आदराचे स्थान आहे अशा व्यक्ती विरळच असतात . आपल्या परिसरात ज्या अशा मोजक्याच व्यक्ती आहेत , त्यात नानांचे स्थान अग्रणी आहे . माझ्या मनात त्यांची प्रतिमा स्थिर आहे . त्यात केव्हाही फरक पडला नाही .
" संसार सुखाचा अन् परमार्थ नेटका ' अपवादात्मक दिसून येणारी ही गोष्ट त्यांचे बाबतीत पूर्णपणे सत्य आहे . वास्तव आहे . स्वतःचे संसाराइतकाच नेटका आणि देखणा विस्तार शिक्षणक्षेत्रात मा . नानासाहेबांनी मांडलेला आहे . म्हणूनच अगोदर म्हटल्याप्रमाणे विद्या मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांची मूर्ती उठून दिसते . मोहक वाटते, हवीशी वाटते .
अतिशय संयमी , तितकेच निग्रहीव्यक्तिमत्त्व . मला करायचे ते मी करीनच . मग तुम्ही ( म्हणजे इतरेजन ) बरोबर आलात तर तुमच्यासह , न आलात तर तुमच्या विरहीत आणि तुम्ही विरोध केला तर महात्मा गांधींच्या तत्व प्रणाली प्रमाणे तुमचा विरोध डावलून मी पुढे जाणार . ही मा . नानांची जीवनप्रणाली . अशा पद्धतीनेच त्यांची वाटचाल दिसून येते . यामुळेच शिक्षणक्षेत्रातील त्यांची वाटचाल यशस्वी ठरली आहे . नेत्रदीपक यशाचे ते मानकरी ठरले आहेत . जनता पार्टीच्या निर्मितीनंतर आमच्या अनेक सहकाऱ्यांनी ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक ' पक्षाच्या वतीने लढविण्याची तयार केली होती . माझा या गोष्टीला विरोध होता . शिक्षणक्षेत्र हे राजकारणापासून अलिप्त असले पाहिजे . शिक्षणप्रेमी व आचार - विचारात तफावत नसणाऱ्या व्यक्तीच्या हातात शिक्षण संस्थांचा कारभार असावा असे माझे मत होते व आजही ठाम आहे . देशाच्या भावी पिढीपुढे काही आदर्श नक्कीच असायला हवेत . मा . नानांच व्यक्तिमत्त्व खचितच असं आहे .
मा . नानासाहेबांना विरोध करण्यापूर्वी त्या तोलामोलाचा समर्थ पयार्य अगोदर उभा करा आणि मगच त्यांना विरोध करण्यात काही अर्थ आहे , अन्यथा तो केवळ विरोधासाठी विरोध होईल असे मत त्यावेळीही मी व्यक्त केले होते .
एका गोष्टीची खंत मात्र आजही वाटते , महाविद्यालयाची निर्मिती करावी या विचाराने आदरणीय कै . रामराव जिभाऊ यांचे अध्यक्षतेखाली आमसभा भरली होती . त्या सभेत आपल्या तालुक्याचा शैक्षणिक विकास व शिक्षणात समतोल राहावा या उद्देशाने चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीने ' कला , विज्ञान आणि वाणीज्य महाविद्यालय अगोदरच सुरु केलेले आहे . तेव्हा राष्ट्रीय सह. शिक्षण प्रसारक मंडळाने तंत्रशिक्षणावरील प्रगत शिक्षण सुरू करावे , पॉलिटेकनिक सुरु करावे असे मत त्यासभेत मी मांडलं होते . तांत्रिक शिक्षणाच्या उत्तम पायाभूत सुविधा आपल्या संस्थेकडे उपलब्ध होत्या . तसे झाले असते तर सारख्याच शिक्षणविभागातून विद्यार्थ्यां ची आज होणारी ओढाताण झाली नसती . शिवाय इंजिनियरींग शिक्षणाची सुविधा येथेच उपलब्ध झाली असती .
मा . नानांचे आणखी एक वैशिष्ट्य दिसून येते , ते म्हणजे त्यांचा पिंडच विधायक कार्याचा आहे . त्यामुळे सहकारातून नेतृत्व आणि त्या नेतृत्वावर राजकारण - सत्ताकारण , याचा मोह नानांना कधी पडला नाही . वास्तविक एवढ्या मोठ्या व्यापक शिक्षणकार्याच्या आणि क्षेत्राच्या आधारावर त्यांना सत्तेच्या गाभाऱ्यात सहज प्रवेश मिळू शकला असता , चांगले वरचे स्थानही प्राप्त करता आले असते . परंतु विधायक कार्यात गाडून घेणाऱ्या देशभक्ताचा आत्मा त्यांच्यात आहे . त्यामुळे शिक्षणक्षेत्र हा सामाजिक कार्याचा व्यापक आवाका ठरवून तो त्यांनी कायम ठेवला.
चव्हाण परिवाराशी आमचे पूर्वापार कौटुंबीक संबधाचा धागा मला लाभला आणि हे स्नेहसंबंध उत्तरोत्तर अधिक दृढ होत गेले . मा . नानासाहेबांनी शिक्षणक्षेत्रात त्यांचा सहकारी होण्याचा बहुमान मला देऊ केला होता. परंतु नम्रतापूर्वक मी स्वीकारला नाही . कारण एका शिक्षणसंस्थेत कार्यरत असतांना दुसरी संधी लाभली तर ती इतरांना दिली पाहिजे आणि आपण निष्ठेने एकाच ठिकाणी काम करावे असे माझे मत आहे .
मा . नानासाहेबांचा सुखद सहवास ' ' डोळ्यांचा धमार्थ दवाखाना ' या संस्थेतही मला गेली अनेक वर्षे लाभत आहे . विद्या मंदिरात उभी असलेली त्यांची मूर्ती विलोभनीय वाटते . ही मूर्ती अशीच तेवत राहावी ही मनोमन इच्छा !
" परमेश्वरा ......
मा . नानांना उदंड आयुष्य दे . उत्तम आरोग्यदे आणि त्यांच्या कार्याचा शतकोत्सव साजरा करण्याचे भाग्य आम्हा कार्यकर्त्यांना लाभू दे .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा