मुख्य सामग्रीवर वगळा

मनाच्या गाभाऱ्यातील देव माणसं ति.स्व.नानासाहेब व सौ.ताई (सौ.सुनेत्रा दि.कुलकर्णी,जळगाव)


 ति . स्व . नाना आणि ति . सौ . ताई यांची आठवण मला भूतकाळात घेऊन जाते . १ ९ ६१ चा जून महिना , माझ्या वडिलांसोबत मी दुपारी ति , नानांच्याकडे प्रथम गेले . घरात शिरल्याबरोबर बाहेरच्या रखरखीत उन्हाचा विसर पडला . सौम्य स्मित करीत अतिशय आपुलकीनं आमचं स्वागत करणारे नाना , सौ . ताई आणि घरातलं साधं , स्वच्छ व शितल वातावरण नकळत मनाच्या कप्प्यात स्थान पटकावून बसलं . मी कॉलेज शिक्षणासाठी चाळीसगावच्या कन्या छात्रालयात प्रवेश घेतला . माझ्यासारख्या साध्या शाळामास्तरांच्या मुलीला त्या काळात स्वतंत्र खोली घेऊन राहणं परवडणार नव्हतं . पण नानांच्या , होय वि नानांच्याच , कारण सौ . ताई आणि ती . नाना हे छात्रालयातील सर्व विद्यार्थिनींचे आईवडिलच होते . छात्रालयानं मला सामावून घेतलं , मदतीचा हात दिला , स्वावलंबन शिकवलं , सहजीवन शिकवलं , माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवायला अप्रत्यक्षपणं मदत केली , प्रोत्साहन दिलं , संरक्षण दिलं आणि आश्वासन केलं . छात्रालयात प्रवेश घेणाऱ्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय गरीब विद्यार्थिनी गहू , ज्वारी , बाजरी , डाळी व वरखर्चाचे पैसे बऱ्याचदा वेळेवर देऊ शकत नव्हत्या . पण आमची रोजी रोटी त्यांनी कधी अडू दिली नाही . त्यामुळं मुलीचं शिक्षण विनाअडचण चालू राहिलं . विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांच्या छात्रालयांचं हे वेळ , श्रम मागणारं आणि चिंता वहायला लावणारं  काम व्रतासारखं अनेक वर्षे या पतिपत्नींनी नेम म्हणून केलं . आज न माझं वय वाढल्यावर त्यांचं श्रेष्ठत्व मनाला अधिकच भिडतं . 
    या कालखंडात हळूहळू राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ , त्याचे पदाधिकारी , ति . नानांची शिक्षणाबद्दलची आस्था , विद्यार्थ्यांबद्दल कळकळ , त्यादृष्टीने अथक परिश्रम करण्याची वृत्ती या सर्वांचा जवळून परिचय झाला . ति . नानांचं वैशिष्ट्य म्हणजे योग्य कामासाठी योग्य व्यक्ती हेरण्याची त्यांची हातोटी . त्या काळात राष्ट्रीय विद्यालय , राष्ट्रीय कन्याशाळा , कन्याछात्रालय या सर्वांच्या प्रगतीसाठी त्यांनी तरूण , तडफदार व शैक्षणिक कार्याविषयी आवड असणाऱ्या श्री . गु . स . परदेशींसारख्या अनेक शिक्षकांना हेरून आपल्या संस्थेत आणलं होतं . त्यामुळं शाळांना प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणं कठिण गेलं नाही . आपल्या संसाराचा भार आपल्या सुविद्य , विचारी कर्तबगार , मायाळू परंतु करारी पत्नीवर , सौ . ताईवर सोपवून ति . नाना सर्वस्व झोकून राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी सतत धडपडत राहिले आणि आजही त्यांचं हे कार्य चालूच आहे . चांगलं कार्य जराही न कंटाळता , न थांबता सातत्यानं करणं हे असिधारा व्रत ति . नानांसारख्या एखाद्याच कर्मयोग्याला पूर्णत्वाला नेता येतं .
    माझ्या पुढच्या शिक्षणासाठी मी जळगावी आले . १ ९ ६५ च्या मे मध्ये माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून चाळीसगावी ति . नानांना भेटले . या सुमारास राष्ट्रीय विद्यालयात इंग्रजी माध्यम शाळा सुरू करावयाची असल्याने माझ्या वडिलांनी या संस्थेत यावे अशी ति . नानांची तीव्र इच्छा होती . त्यानुसार माझे वडिल नगरदेवळा सोडून राष्ट्रीय विद्यालयात आले . त्याच वर्षी मी B.Sc. परीक्षेस बसले होते . माझीही लेखी आणि तोंडी मुलाखत होऊन मी राष्ट्रीय कन्याशाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाले . यावेळी संस्थेचे सेक्रेटरी म्हणून ति . नानांची एक वेगळी बाजू मला बघायला मिळाली . बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या व्यक्तीस मुलाखतीस बोलावतांना तिला इंग्रजी भाषेचं कामापुरतंतरी ज्ञान असलंच पाहिजे असा ति . नानांचा आग्रह मला लेखी मुलाखतीतून प्रत्ययास आला . ति.नाना व मंडळातील इतर सन्माननीय यांनी संस्थेत अनेक चांगले पायंडे पाडले . त्यातला मला भावलेला एक म्हणजे एस् एस् सी . निकालानंतर प्रत्येक शाळेच्या ११ वीस शिकविणाऱ्या शिक्षकांकडून त्यांच्या विषयात अत्तीर्ण - अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती मागवणं अन् निकाल चांगला / वाईट ज्याप्रमाणे असेल त्यानुसार मंडळाने शिक्षकास शाबासकी देणं किंवा कर्तव्यात कसूर केल्याची जाणीव देणं , यामुळं झालं काय की आपल्या विषयाचा निकाल चांगला लागावा यासाठी शिक्षकांमध्ये अहमिका लागली ज्यामुळं शाळांचे निकाल उंचावू लागले . माझ्यातला चांगला शिक्षकति . नानांच्या हाताखाली राष्ट्रीय कन्याशाळेत घडू लागला . 
   माझ्या वडिलांच्या अकाली मृत्युच्यावेळी आमच्या सर्व कुटुंबाच्या ति . नाना व सौ . ताई यांनी दिलेला आधार , सांत्वन व सर्व प्रकारची मदत हा त्यांच्या ठायी असलेल्या सामाजिक जाणीवेचा परिपाक आहे . त्याबद्दल आम्हा कुटुबियांना त्यांच्या ऋणात रहायला आवडेल . आमच्यासारख्या अनेक कुटुंबांना त्यांनी सर्व प्रकारचा आधार दिलेला मला माहीत आहे . ति . नानांचं आणि सौ . ताईच घर ही आमची शिक्षक म्हणून व व्यक्ती म्हणून अडचणी सांगायची हक्काची जागा होती अन आहे .
  ति . नानांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत . त्यांनी समाजातील अनेक अंगांना स्पर्श करून आपलं स्वत : च व्यक्तिमत्त्व तर संपन्न बनविलं आहेच . परंतु त्यांच्या नेतृत्वानं , सहभागानं अनेक उपक्रमांचं सोनं झालं आहे . माझ्या दृष्टीनं ति . नानांमधला माणूस जागा आहे , जिवंत आहे , संवेदनशील आहे . म्हणूनच ति . नाना आम्हाला वडिलांच्या जागी आहेत . ति , नाना , सौ . ताई आणि त्यांचा गोकुळासारखा संसार असाच फुललेला राहो , ति , नाना तुम्हाला शि.सा.नमस्कार , जिवेत शरदः शतम् !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...