मुख्य सामग्रीवर वगळा

खानदेशच्या ज्ञान गंगेचे भागीरथ-श्री.नाना चव्हाण(प्रा.प्र.द.पुराणिक.पुणे)एम् ए. बी. टी.


कोणाही व्यक्ती विषयी अल्पपरिचया वरून त्या व्यक्तीच्या व्यक्तीत्वा विषयी लिहीणं तसा अवघडच ,भेटीगाठी तून परिचय होण आणि सहवासा नंतर परिचय होणं, यापैकी खरा परिचय सहवासानंतरच होतो.

  अ.भा.साने गुरूजी कथामालेच्या बैठकी होतात,शिबीरे होतात. त्यावेळी माननीय श्री नानांची हमखास गाठ पडते . शिबिराच्या वेळी सहवासाचा  योग अधिक येतो. शिबिरात उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींची त्या वेळी अधिक ओळख होते. प्रतिनिधी स्वतः राहतात कसे, बोलतात कसे ,व्यवहार करतात कसे, आधी अनेक तऱ्हेने त्यांचा परिचय वाढत असतो.     बैठकीच्या वेळी , सभेच्या वेळी, भाषणाच्या वेळी जी ओळख,जो  परिचय होतो तो बहुतांशी  औपचारीकअसतो. औपचारिक परिचय वरवरच्या मुखवट्याचा परिचय  असतो.मुखवटा काढूनच खरा परिचय होणे शक्य असते. सहवासातून ,गप्पातून ,चर्चेतून ,प्रसंगातून ,फिरता-फिरता विचार मांडले जातात. तेव्हा ही परिचय होतो. हा अनौपचारिक परिचय अधिक जवळ आणणारा असतो.मनाच्या तारा जुळवणारा,स्नेहाचे धागे  निर्माण करणारा ठरतो . भावनांनच अदान प्रदान अशा अनौपचारिक परिचयाच्या वेळीच अधिक होतं. ज्या व्यक्तीचा सहवास घडतो ती व्यक्ती जर मितभाषी असेल तर मनाची ठेवण ,हृदयाची स्पंदने, भावनांचे तरंग समजणे अवघड असतं.

   मितभाषी नाना : 

श्री नाना चव्हाण फार मितभाषी आहे .असा माझा समज आहे तो बरोबर आहे असं ही माझं मन मला सांगत. त्यांच्याशी संवाद करायचे अनेक प्रसंग आलेत . मी जेव्हा-जेव्हा काही बोलतो, काही विचार मांडलेत,  एखादा मुद्दा उपस्थित केला तर त्यांनी त्या विचाराच, मुद्याचं एकाच वाक्यात उत्तर दिलेलं मला आठवतं. अगदी स्मरणशक्तीला ताण दिला तर दोन वाक्यात उत्तर दिलं असेल. त्यांना पसरट भाषा वर्ज्य  असावी. ते मनात नेहमी म्हणत असावेत, "काय मुद्याचं असलेलं ते बोला' ज्याला खूप काम करायची असतात, ज्याला कामाचे डोंगर उपसायचे असतात, ते नेहमी सूत्रमय बोलतात. अशा स्वभावामुळे ती व्यक्ती आपली शक्ती संचित करीत असते. महात्माजींनी सोमवारी मौन व्ररताच रहस्य हेच सांगितलं होतं. त्यांनी  स्वतः  ऐके ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे, सोमवारच्या मौनव्रता मुळे माझी शक्ती संचित होते .ती मला इतर सहा दिवसांसाठी उपयोगी पडते .नाना मितभाषे मुळे शक्ती संचित करतात असं वाटतं.

   मला स्वभावा वरून मितभाषी असायचं दुसरेही एक कारण असावं असा माझा अंदाज आहे. श्री. नानांचा जीवनपट वाचला आणि थोडे चिंतन केले की या माझ्या दुसऱ्या करण्याचा अंदाज खरा आहे असं कुणालाही पटेल. ज्या-ज्यावेळी नाना रांजणगाव सोडून इतरत्र क्षेत्राच्या ठिकाणी अध्ययनार्थ व स्वतःच्या विकासार्थ गेले ,तेव्हा त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे विनामूल्य असलेल्या संधीचा लाभ घेणे अपिरीहार्य ठरलं. अन्यथा शिक्षण थांबलं असतं. म्हणजे जीवनाचा विकास थांबला असता. ज्या तरुणांना पैशाची ऊब असते, खिशात नाणी खणखणत असतात, त्या तरुणाच्या अंगी ताठाच  असतो. ताठा नसला तरी नम्रता कमी असते हे कटू सत्य आहे. श्रीनानांना  आपल्या परिस्थितीची पुरेपूर जाणीव होती. जीवनाच विदारक सत्य त्यांना स्पष्ट दिसत होतं. असा जीवनाची दृष्टी गवसलेला  तरुण नम्रही असतो. मितभाषीही  असतो. श्री नाना त्या काळी अशा तरूणापैकी एक होते.त्यांच्या अंगी ती दृष्टी होती म्हणून ते आज भव्य सृष्टी सेवेतून निर्माण करू शकले. स्वोध्दारक संस्था कष्टांची खाणच होती . कष्टकरी मितभाषीच असतो.

   साधे नाना:

श्री नानांना प्रथमदर्शनी पाहतांना एकदम व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल असं भारदस्त व्यक्तिमत्व नाही. साधी गांधी टोपी, साधे खादीचे धोतर ,साधा खादीचा सदरा- शर्ट, धोतर मात्र दोन काचा मारलेल.मी वर दोन चार ठिकाणी साधा शब्द वापरलेला आहे. साधी गांधी टोपी आणि इतरांनी घातलेली गांधी टोपी यात फरक असतो का असा आपण मला विचाराल, तर मी म्हणेन, निच्शित फरक असतो. पुढाऱ्यांची गांधी टोपी जरा निरखून बघा म्हणजे फरक कळेल. पुढाऱ्यांच्या गांधी टोपीचे दोन्ही पुढचे मगचे टोक इतके टोकदार असते, इतके कडक असते की ते टोक बोचणार तर नाही ना अशी पाहताक्षणीच भीती वाटावी. नानांची टोपी इतकी शुभ्र नसते की इतरांनी पहात रहावं. त् पुढाऱ्यांची टोपी पहा तिची शुभ्रता आणि कडकपणा हजारात उठुन दिसेल. धोब्याला  अज्ञाच अशी असते की बाहेरची शुभ्रता इतकी असावी की लोकांनी पाहताक्षणीच गार व्हाव थबकून जावं. श्री नानांच्या टोपीत चमकणारी शुभ्रता नसते कारण ते कुणालाही दिपवून दुसऱ्याला टोपी घालू इच्छित नाही . हीच स्थिती शर्टाची आणि धोत्राची  असते. यामुळे नाना साधे नाना वाटतात. त्यामुळे त्यांच्या जवळ यायला कुणी बिचकत  नाही. हा साधेपणा हृदयात ,विचारातही आहे. त्यांनी पूर्वायुष्यात जे कष्ट उपसलेत, अध्ययनाच्या वेळी जी फरफट झाली. ती गरिबांना होऊ नये म्हणून तर ते ज्ञानगंगा गावा-गावात नेऊ इच्छितात . भडक पोशाखाने  आपल्यापासून कोणी दुखावू नये ही त्यांची आंतरिक तळमळ आहे.

नियमीत नाना:

    अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या अनेक बैठकीच्या, वेळी शिबिरांच्या वेळी   माझ्या सहज अवलोकानात  आलं की कुठे कसली कितीही गडबड असो, गैरसोय सोय असो, नसो श्री नाना अगदी वेळेवर हातात साधी कापडी पिशवी घेऊन हजर असतात. सामान्य सभासदांच्यात  जमेल तेथे बसतात.कुणी  अत्याग्रहच केला आणि पदाधिकाऱ्यांनी विशिष्ट ठिकाणी सभेच्या संचलनाच्या सोयीसाठी बसायचे आहे असं सांगितलं तरच त्या ठिकाणी आढेवेढे न घेता निमूटपणे जाऊन बसतात . आपल्यामुळे कार्यात व्यत्यय होऊ नये ही त्यांची भूमिका असते. जो मुलगा गरिबीच्या मुशीतून ,जो तरुण अडचणीच्या धगधगणाऱ्या ज्वालातून आपला जीवनपट साकार करीत असतो त्याला नियमित रहरवेच लागते. तशी त्याला आतून प्रेरणा मिळते. त्याला वळण लागतं .म्हणून कसलंही दळण दळायच्या भानगडीत  तो पडत नाही, पडू इच्छित नाही असा माझाही अनुभव आहे. श्री नानांचा पिंड त्याचा अनुभवाच्या दिव्यातून तयार झाला. असा तरुण बाह्य सृष्टीत शांत आणि अंतसृर्ष्टी  सतत जागरूक असतो, सचेतन असतो, कर्तव्यतत्पर असतो, त्याला आपल्याला बोल लावेल का याची सतत जाणीव असते . नियमितपणा त्याच्या अंगवळणी पडतो. त्याची सवय लागते . सातत्यामुळे, सवयीमुळे इतरांना वाटणारी नियमितपणा ची बोच, कटकट त्याला वाटत नाही तो सहजच या गोष्टी करीत असतो.

हिशेबी नाना:

  श्री नाना अ.भा. साने गुरुजी कथामालेचे कोषाध्यक्ष आहेत. या संस्थेची जेव्हा बैठक असते तेव्हा त्यांच्या हातात असलेल्या छोट्याशा थैलीत सर्व हिशेब,सर्व अर्थ-अनर्थ होऊ नये म्हणून सुरक्षित असतो. हिशेब मांडतांना सुद्धा ते मोजकेच बोलतात. ते वाचावीर  नाहीत. हे त्यावेळी पटते आणि जीवनपट पाहिला आणि त्यावर चिंतन केले की ते वाचा वीर नसून कर्मवीर आहेत हे मनाला उमगते . विद्यालयाचा जो विशाल वृक्ष निर्माण झाला आहे तो जर नजरेखालून घातला तर श्री नाना हिशेबी नसतील तर विकासाची वाटचाल खंडित होईल.       दोन-तीन वेळा शिबिराच्या वेळी त्यांच्याशी विभिन्न विषयाची चर्चा करायचाही अवसार आला .त्या त्या क्षणी सहाय्यक शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना, सेवकांना सूचना देताना मी पाहिले. कोणती गोष्ट किती लागेल, किती उरेल, किती मंडळी येतील, किती निमंत्रणे पाठवली गेलीत... अनेक प्रश्नांची उकल करून निश्चित सूचना देताना ऐकतच रहावे असे वाटते . सूचना देताना त्यांचा स्वर इतका मंद असतो की मंद कर्णाला तर काहीच ऐकू येणार नाही. आमच्या सारख्या ला ही लक्ष दिले तरच ऐकू येईल पण त्या मंद स्वरात विलक्षण शक्ती आहे हे जाणवते.

 नानांच्या नाना कळा: व्रतनिष्ठ तत्वनिष्ठ

  अ.भा.साने गुरूजी कथामालेच्या अधिवेशन होते. एका सत्रात चर्चेसाठी विषय होता -"कथामाला आणि संस्कार" त्या सतराचा मीच अध्यक्ष होतो . विषयाची व्याप्ती आणि महत्व लक्षात आल्यामुळे सभागृह तुडुंब भरले होते. सुरुवातीला चर्चेची  जी अवस्था  असते तशीच होती. म्हणजे कशी? कुणीच विषयाला प्रारंभ करायला झालेला पण हळूहळू एकेक प्रतिनिधी पुढे पुढे सरकले आणि विषय

चांगलाच रंगात आला आणी रंगत वाढत गेली. चर्चेत सहसा  भाग न घेणारे उभे राहिले .मी त्यांच्याकडे थोड्या स्तंभीत झालेल्या आणि औत्सुक्याने  भरलेल्या नजरेने पाहिले. माझ्या नजरेतला आशय होता -नाना आणि तुम्ही चर्चेत भाग घेणार? पण त्यांच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास प्रकाशात होता. मी होकार देताच त्यांनी धडाधड ज्ञानेश्वरीतील ओव्या, संत श्रेष्ठ तुकारामांचे अभंग, समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक, श्रोत्यांच्या कानावर बुलंद आत्मविश्वासाच्या आवाजात फेकायला सुरूवात केली. श्री नानांच्या अंतरंगात आणि सात्विक मनात असा विलक्षण भांडार असेल ह्याची कुणालाच कल्पनाा नव्हती मी पण क्षणभर स्तंभित झालो .सर्ळ सभाच ते संस्कारक्षम श्लोक,ओव्या ऐकून स्तंभित झाली.  श्री नानांच्या  अंगी असं पावित्र्याचं, उपासनेचं मनोबल आणि आत्माबल असेल अशी कल्पनाही कुणाच्या मनाला शिवली नसेल.  अनेकांंना अशी सवयच असते की बाहेर रूपावरून ,त्या व्यक्तीविषयी मोल करायचं ,पण काही प्रसंगी अशी फसगत होते की आश्चर्यानं तोंडात बोटच घालाव लागतं. श्री नाना हे अंतरंगात असे अनमोल असतील हे त्या दिवशी परिचितांना कळलं. सर्वसाधारण मनुष्य अशा अनुभवावरून ही धडा घेतील आणि स्वतः मध्ये बदल घडवतील. हा संस्कार त्यांना आई-वडिलांकडूनच मिळाला असे स्पष्ट जाणवतं. काही विद्वान(?) संस्कार म्हणजे मुलावर , बालपणावर लादलेलं अकाली बंधन असं मानतात . त्यांच्या बद्दल मला काही मत मांडायच नाही. त्यासंबंधी मत मांडायचं हे स्थानही नाही. पण माझ्या मनाला निश्चित असं वाटतं की श्री नानांच्या व्यक्तिमत्व जी शालीनता आहे ती घरातील आई-वडिलांच्या आणि एकूण संस्कारपूत वातावरणामुळे आहे .दृढ संस्कार नसते तर त्यांचं पाऊल कुठेही सहज घसरल असतं .संस्कार म्हणजेेेेे संयम.संस्कार म्हणजे लघुतप .                                                 देशभक्ती- देशभक्ती चा ओनमा: संस्कृत मध्ये एक सुंदर सुभाषित आहे ,"सत्संगात् भोवतीही साधूना खलानाम् | साधुनाम नही खल संगमात् खलत्वम्||आमोदं कुसुम भवं मुदेव धत्ते |मृदगंधम्नहि कुसुमाती धारयांनी ||मातीला फुलांचा सुगंध लागतो.माती गंधीत होते. श्री नानांचा बालपण अशाच.गंधित वातावरणात, अशा थोरांच्या सहवासात आणि देशभक्तीने भारलेल्या कुटुंबात गेलं की स्वदेशीचा संस्कार मनावर आणायसे कोरला गेला. त्याच्यामुळे साधी राहणी अंगवळणी पडली. कष्ट उपसण्याची, घाम गाळून विकसित   व्हायची, फुलायची प्रेरणा मिळाली ती आजपर्यंत टिकून आहे असा वारसा मिळणे हे भाग्यच . श्री. नानांच्या पोशाखाचे वर्णन थोड  दिलाचं आहे .मी स्वतः त्यावेळी ची स्वावलंबनाच्या ध्येयाने भीरलेली, स्वदेशीच्या व्रताने व्रतस्थ करणारी, स्वतःच्या धर्म बिंदूंनी, देशभक्ती चे धडे देणारी संस्था मी पाहिली आहे, कै. तोंडगावकर हे ध्येय वेडे होते ,धडपडीचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांच्या संगतीने ,संस्काराने, सहयोगाने श्री . नाना घडले त्यांच्या देशभक्तीची, देशप्रेमाची ज्योत तेथेच प्रज्वलित झाली .ती विझली नाही. नानांनी विझू दिली नाही. एवढेच नाही तर पणतिने पणती पेटवायचे व्रत अंगिकारले .ते आजतागायत डौलदार  वटवृक्षाच्या रूपाने डोलते आहे.     एवढ्या संस्था सांभाळायच्या, वात्सल्याने फुलवायच्या म्हणजे कठोर व्रतच असत.पण श्री .नाना व्रताला कधी कंटाळले नाहीत. जर कंटाळले असते तर त्यांच्या मुखमंडलावरील त्रस्तता चटकन दिसली असती .अशा व्यक्तीचा त्रासिक भाव त्याच्या चेहर्‍यावर चटकन उमटतो, अशा व्यक्ती पटकन रागवतात, दुसऱ्याच्या अंगावर खेकसतात. या उलटश्री. नानांच्या चेहऱ्यावर समाधानाचे व्रत सफल झाल्याच  सात्विक समाधान झळकत असतं .पू. साने गुरुजींच्या धडपडणार्‍या तरुणांपैकी आम्ही असल्यामुळे,ते ओळखायला कसरत करावी लागत नाही. सुगरण भात शिजला की नाही हे भारताचे एकच शीत दाबून ओळखू शकते तसेच पू. साने गुरुजींच्या सहवासात वाढलेल्या अस्सल सहकाऱ्यांना ते समाधान ओळखता येतं.                                          नानांच्या शब्दात मंत्र शक्ती : श्री नाना यांचा जीवनपट मला जीवनपट वाटत नाही. जीवन सफल करण्यासाठी जी तपश्चर्या लागते ती तपश्चर्या आहे. तपश्चर्येची टप्प्याटप्प्याने विकसित झालेली जीवन सिद्धीची पावले आहेत. पूजनीय विनोबांनी गीता प्रवचनात योगी आणि संन्यासी यांची तुलना करून असे स्पष्ट केले आहे की ,संन्यासी ही तितकाच प्रेरक असतो. जितका योगी ,संन्यासी शांत बसून प्रेरणा देत असतो. त्याची आत्मशक्ती सक्रिय असते. ती इतरांना प्रेरणा देत असते. मनोबल वाढवत असते .इतरांना प्रगत  करीत असते. सन्यांसी सतस जागृत असतो.त्याची गती चटन दिसत नाही तस श्री.नानांच आहे .त्यामुळे त्यांच्या शब्दाला मंत्राच सामर्थ्य निर्माण झालं आहे. त्यांनी शब्द, वाक्य ,उच्चारले की ते कार्यान्वीत, कार्य उभ राहतं, शेवटी त्या शब्दशक्तीने कार्य सिध्दीस जातं. नानांची ही शक्ती  कायम टिकून राहो,अधिक शक्तिशाली होवे आणि अधिकाधिक जनकल्याणार्थ,देशकल्याणार्थ  प्रयुक्त होवो हीच या अमृत महोत्सवाच्या प्रसंगी ईश्वरचरणी प्रार्थना! परमेश्वर त्यांना निरामय दीर्घायुष्यी करो ही मनोकामना !!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...