आदरणीय शिक्षण महर्षि कर्मवीर नानासाहेब य
ना . चव्हाण यांनी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केले त्या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सव विधायक कार्यक्रम , शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून आयोजित करण्यात येत आहे व येणाऱ्या नविन पिढीला त्यांचा एक आदर्श डोळयापुढे ठेवून वाटचाल करता यावी म्हणून त्या निमित्ताने स्मरणिकेचे प्रकाशन होत आहे . याबद्दल या संस्थेचा माजी विद्यार्थी व कर्मचारी म्हणून अतिशय समाधान होत आहे ,
ग्रामीण भागातील गरीब , दलित व आर्थिक परिस्थितीने खचलेला बहुजन समाजातील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नानासाहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे श्रम , मेहनत घेऊन आपल्या मार्गदर्शनाखाली रा.स.शि.प्र.मंडळ या संस्थेच्या चाळीसगांव , भडगांव , पाचोरा या तीन तालुक्यात सुमारे ४६ शाखा सुरू केल्या . त्यात बालवाडीपासून तर थेट संगणक , इलेक्ट्रॉनिक्स व विज्ञान ही उच्च शिक्षणाची गंगोत्री खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात रुजविली व एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे . विद्यादानाचे पवित्र कार्य करून , देशाच्या साक्षरतेत वाढ करून सुजाण व सुज्ञ नागरिक तयार करणाऱ्या रा . स.शि.प्र . मंडळाचे नानासाहेब हे खरे मूळ संस्थापक . नानासाहेबांनी ही संस्था कठोर परिश्रम , जिद्द तसेच प्रयत्नांची पराकाष्ठा करून १ ९ ४ ९ साली फक्त एका वसती गृहापासून सुरू केलेल्या या संस्थेचा एका वटवृक्षाप्रमाणे विस्तार होऊन बालवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा,कनिष्ट व वरिष्ट महाविद्यालये, अंधशाळा , आश्रमशाळा अशा ४६ शाखांमधून सुमारे २५००० विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे व ज्ञानसंवर्धनाचे पवित्र कार्य अव्याहतपणे सुरू आहे .समाजा साठी विविध प्रकारे झटणारया व समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सत्कार करण्याची सुबुध्दी व कृतज्ञता बुध्दी समाजात असणे हे ही दुर्मिळ झाले आहे . या सर्व गोष्टीं चा विचार करता आदरणीय नानासाहेब यांचा अमृत महोत्सवी समारंभ म्हणजे एक सुयोग आहे . त्यास्तव मी रा.स.शि.प्र.मंडळ , साने गुरूजी कथामाला व कार्यकारिणीचे आभार मानतो.
मी जेव्हा माध्यमिक विद्यालय तळेगांव येथे शिकत होतो . त्याच काळात तेथील इमारतीचे बांधकाम चालू होते , तेव्हा नानासाहेब सकाळी ७.०० वाजताच त्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हजर असायचे . खादीचा पांढरा स्वच्छ सदरा , धोतर व इस्त्री नसलेली गोल गांधी टोपी असा साधासुधा पेहराव असणारे नानासाहेब आल्याबरोबर शेजारी कामासाठी चूना मळणीचे काम चालू असलेल्या घाण्या जवळ जाऊन चुन्याचा गोळा उचलून ते समोरच्या भिंतीवर मारत , संपूर्ण गोळा भिंतीवर चिकटत नाही तो पर्यंत तो घाणा चालू असायचा,प्रसंगी नाना साहेब स्वत: घाणा हाकायचे , संपूर्ण दिवस कामावर थांबून स्वत : धोतराच्या काचा मारून कर्मचारी , शिक्षक व विद्यार्थी यांचे समवेत श्रमदान करीत . तेव्हा त्यांची ती स्फूर्ती व चैतन्य खरोखरच तरूण पिढीला लाजविणारे होते . त्यामधे गरीब , दलित , होतकरू व आर्थिक दृष्टया दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण सहजपणे उपलब्ध होणे असा एकच सूर मला तरी त्या चैतन्यामधून जाणवत होता . ही तळमळ व जिद्द बघुन मी नानासाहेबांकडे आकर्षित झालो कारण सत्तेपेक्षा सेवा आणि स्वार्थापेक्षा सात्विक त्याग यांना त्यांच्या जीवनात विशेष महत्वाचे स्थान असल्याचे मला जाणवले .
नानासाहेबांशी माझा प्रत्यक्ष संबंध सन १ ९ ८३ मधे मी बी.एस.सी. प्रथम श्रेणीत पास झाल्यावर आला , त्या वेळेस राष्ट्रीय संस्थेत बी.एस.सी. शिक्षकांच्या जागा असल्याची जाहीरात वर्तमान पत्रात वाचली व अर्ज केला . पुढील शिक्षणाची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे घेणे शक्य नव्हते . म्हणून मी नानासाहेबांना भेटण्यासाठी गेलो . मी माझी ओळख करून दिली त्यांनी माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली व आपल्याला मार्क्स चांगले आहेत आपण अजून पुढे शिकावे असा उपदेश मला नानासाहेबांनी दिला . परंतु माझी वस्तुस्थिती मी त्यांना सांगितली त्यानंतर नानासाहेबांनी मला मुलाखत झाल्यावर बघू असे सांगितले . सुदैवाने गुणवत्तेनुसार शिक्षकांची निवड करण्यात आली व त्या यादीमधे शिक्षक म्हणून माझी निवड झाली . शैक्षणिक वर्षासाठी निवड झाल्याने त्या वर्षाचा संपूर्ण पगार मला वर्षाच्या शेवटी मिळाला व मी प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे एम.एस.सी. या उच शिक्षणासाठी प्रवेश घेतला . सन १ ९ ८६ मधे एम.एस.सी. प्रथम श्रेणीत पास झालो राष्ट्रीय महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयासाठी विद्यापीठ निवड समितीने माझी व्याख्याता म्हणून निवड केली . जर नानासाहेबांनी मला एका वर्षासाठी शिक्षकाची नोकरी दिली नसती तर मी अमळनेर सारख्या बाहेरगांवी राहून दोन वर्ष एम.एस.सी. चा खर्च करू शकलो नसतो . एम.एस.सी. झालो नसतो . म्हणून हे श्रेय नानासाहेबांना दिले तर त्यात अतिशयोक्ती ठरणार नाही .
तसेच नानासाहेबांनी तळेगांव मधील ताळागाळातील , मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उदा . चांभार , लोहार , धनगर , हरिजन , मांग , भिल्ल या जमातीतील अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्यामधे शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी स्वत : तेथील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या सहकार्याने प्रयत्न करून त्यांना शिक्षण घेण्यासाठी उत्तेजित केले त्यापैकी अनेक माजी विद्यार्थी राज्य सरकार , केंद्र सरकार , सहकारी संस्था यामधे मोठया अधिकारावर आज कार्यरत आहेत . त्यामुळे अशी अनेक कुटुंबे आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या स्वाभिमानाने उभी करण्याचा व त्या निमित्ताने सामाजिक स्पृष्य - अस्पृष्याची दरी दूर करण्याचा व आदीवासी मागासलेल्यांचा विकास करण्याचे फार मोठे कार्य नानासाहेबांनी तळेगांव या गावी केले . व त्यामधिल बऱ्याच विद्यार्थ्यांना संस्थेच्या सेवेमधे सामावून आर्थिक मदतीचा आधार देण्याचे काम नानासाहेबांनी केले
. महाविद्यालयामधे एका भौतिकशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून माझा नानासाहेबांशी शैक्षणिक कार्याशी फार जवळून संबध आला . महाविद्यालयात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने नानासाहेब आवर्जून उपस्थित राहतात . विद्यार्थी तसेच शिक्षक , कर्मचारी यांना यथोचित मार्गदर्शन करीत असतात . कमालीचा वक्तशीरपणा , शिस्त नानासाहेबांच्या अंगी आहे . कार्यक्रमाच्या नियोजीत वेळेपूर्वी किमान १० मिनिटे ते महाविद्यालयात उपस्थित असतात . चेअरमन या नात्याने व्यवस्थापनाशी निगडीत कुठलाही विषय असेल कर्मचाऱ्यांचा प्रश्न , पालकांच्या अडी - अडचणी , तक्रारी अथवा इतर कुठलाही विषय असला तरी त्या विषया संबंधी संपूर्ण माहीती घेणे त्यांचा सर्व बाजूंनी विचार करणे , संयमाने व विवेकाने नि : पक्षपातीपणे निर्णय घेणे व त्यानुसार प्रमुखांना मार्गदर्शनात्मक आदेश देणे , कोणावरही अन्याय होणार नाही याची ते दखल घेत असतात . ते नेहमी सांगतात " प्रामाणिकपणे काम करा , जाणुनबुजून चुका करू नका , नजरचुकीने काही चुका झाल्यास त्या मान्य करा व परत तशी चुक होणार नाही याची दक्षता घ्या " . त्यामुळे त्यांच्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या मनात एक आदरयुक्त भिती असते व त्याचबरोबर त्यांना त्यांचा मोठा आधारही वाटतो . तथापि संस्थेच्या हिताच्या दृष्टीनेकोनातून काही कठोर न्याय्य निर्णय घ्यावा लागला तरी नानासाहेब तो निर्णय घेतात व त्याची अंमलबजावणी करून एकदा घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहतात.
नानासाहेब हे फार धाडसी आहेत . तेव त्यांचे संचालक मंडळ जिद्दीने व चिकाटीने संस्थेच्या आर्थिक व शैक्षणिक नेत्रदीपक प्रगतीच्या दृष्टीने नेहमी धडपडत असतात . म्हणूनच सन ४ ९ ते सन ६ ९ या काळात वार्षिक निवडणुका असूनही या संपूर्ण काळात त्यांना बिनविरोध पदाधिकारी ठेवून त्यांच्यावर व त्यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त केला केलेला आपणास दिसेल तसेच ६९ पासून आजपर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांना या भागातील जनतेने फार मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिले आहे म्हणूनच संस्थेच्या अल्प काळामध्ये प्रगतीचा फार मोठा आलेख उंचावलेला आपणास दिसेल.
संस्थेचे कुठलेही कर्मचारी, सेवक, शिक्षक, महाविद्यालयाच्या किंवा विद्यालयाचा प्रमुख खाजगी किंवा शैक्षणिक कामानिमित्त नानासाहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जातात तेव्हा कुठलाही भेदभाव न ठेवता खुर्चीवर बसवून त्यांची आदराने चौकशी करणारे नानासाहेब आपल्या संस्थेचे चेअरमन असल्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान वाटतो . म्हणून संस्थेचा कुठलाही कर्मचारी स्वाभिमानाने व ताठ मानेने कार्यरत असतो.
आदरणीय शिक्षण महर्षि कर्मवीर नानासाहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन ! व हार्दिक शुभेच्छा . त्यांचे आरोग्य या ही वयात उत्तम आहे त्यामुळेच कार्य करण्यातली तडफ त्यांचे ठायी आहे . त्यांची प्रकृती अशीच उत्तम राहो व ईश्वर त्यांना दिर्घायुष्य देवो हीच प्रार्थना !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा