मुख्य सामग्रीवर वगळा

'भ्रमर आम्ही कमळाचे!'(डाॅ.विनायक य.चव्हाण,चाळीसगाव)

 

श्री . नानासाहेब , आदर्श विचारांचा समुच्चय ! परंतु • याचा देखावा त्यांनी कधी केला नाही . तळागाळातील सर्व सामान्यांनी शिक्षणापासून वंचित होऊ नये , Education unto the last या विचाराने प्रेरीत होऊन ग्रामीण भागातून शिक्षणाचा प्रसार सुरु केला . ग्रामीण भागातून शैक्षणिक प्रसार हे एकच ध्येय डोळ्यासमोर असल्यामुळे अनेक वेळा स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष झाले . प्रसंगी आर्थिक तणाव सहन करावे लागले . परंतु हेळसांड होऊ दिली नाही . स्वतःच्या मुलांसाठी लक्ष पुरवू शकले नाहीत , कुटुंबासाठी मोकळा वेळ देऊ शकले नाहीत , परंतु आचरणातून व कृतीतून चांगले विचार आम्हा भांवडांत रुजवले . घार फिरते आकाशी , परंतु लक्ष तिचे पिल्लांपाशी किंवा watchfull inactivity या नियमानुसार ते संसाराकडे लक्ष ठेवत . मुलांना संस्कारीत करतांना पालकांनी नुसते शाब्दिक विचार न मांडता स्वत : च्या आचरणातून व कृतीतून मुलं संस्कारीत करावी यावर नानासाहेबांचा भर असे . तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नामुळे , संसार रेटतांना आईची उडणारी तारांबळ व त्यामुळे करावी लागणारी काटकसर आम्हा भावंडामध्ये काटकसरी जीवनाचे महत्व रुजवून गेली . आर्थिक विवंचना असतांना सुद्धा संयम कसा राखावा व तरीपण आर्थिक व्यवहार स्वच्छ कसे ठेवावे हे वडिलांनी आमच्यात बिंबविले ते स्वत : च्या कृतीतून . निर्व्यसनी जीवनाची सवय व काटकसर या सवयींमुळे आमचे परगावी उच शिक्षण अत्यल्प खर्चात करु शकलो .

      लहानपणापासूनच घरी व शाळेत असतांना मुलांकडून छोटी छोटी कामं श्रमदानातून करुन घ्यायची सवय लावल्यामुळे पुढील आयुष्यात पडेल ते अंगमेहनतीचे काम करायचे अंगवळणी पडले . या श्रम संस्कारांचा आम्हा भांवडांना पुढे खुपच फायदा झाला . त्यामुळे आजही दवाखान्यात पेशंटची ट्रॉली ओढायला किंवा संडास साफ करायला कसलाही कमीपणा वाटत नाही . 

     त्यांनी शालेय विद्यार्थ्यांकडून दिवाळी निधी संकलन करण्याचा एक अभिनव उपक्रम सुरु केला . दिवाळीच्या सुट्यांमध्ये आम्ही मुलं गावातील वडिलधाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तिंकडून चार - आठ आण्याची वर्गणी गोळा करुन प्रत्येक दिवाळीत २५-३०रुपये शाळेला गोळा करुन देत असू . दिवाळी - निधीच्या या संकल्यामुळे आपण ही शाळेचे काही देणे देऊलागतोही भावना मनात रुजली . सामाजिक पैसा योग्यपणे हाताळण्याची सवय लागली . समाजातील विविध लोकांकडे जाण्याची संधी मिळाल्यामुळे माणसाच्या स्वभावाची पारख करण्याची सवय लागली . एखादे काम करुन घ्यायची हातोटी गवसली .

      वृक्षारोपण व वृक्षसंगोपनाच्या आवडीमुळे आज विविध शाळांची क्रीडांगणे वृक्षांनी नटलेली दिसतात . या त्यांच्या सवयने त्यांनीआम्हाला वृक्षसंगोपनाचे महत्व दाखवून निसर्गावर प्रेम करायला शिकवले.त्यांच्या शिस्तप्रिय सवयी मुळे आम्हा भावडांना भितीयुक्त आदर वाटत असे की जो आजही टिकून आहे.घरी येणारया पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यावर त्यांचा नेहमी कटाक्ष असे.ताट लावण्यात किंवा वाढण्यात झालेली एखादी चुक ते आवर्जून लक्षात आणून देत या व्यतीरिक्त वडील घरात फारसे लक्ष देत नसत.स्वत:चे कपडे सुद्धा वडिलांनी कधी दुकानात जाऊन आणल्याचे मला स्मरत नाही,तर आई साठी किंवा आम्हा भावंडांसाठी कपडे वा खाऊ आणणे तर दूरच राहीले.दैनदिन बाजारहाट सुध्दा आई व आम्ही भावंडच करत असू.वडिलांना कधि बाजाराची पिशवी हातात धरल्याचे पाहिले नाही.हातात नेहमी असायची ती एकच खादीची पिशवी.वडिल बाहेरगावाहून आले की बरयाच वेळा आम्ही ती पिशवी चोरून लपून चाचपडत असू.परंतू त्या पिशवीत संस्थेच्या कागदपत्रांशिवाय वा देणगी निधीच्या पुस्तकांशिवाय आम्हाला हवा असलेला खाऊ कधीच मिळाला नाही. आमच्या लहानपणासारखीच माझी मुले/पुतणे आपल्या आजोबांची ती पिशवी अधून-मधून चाचपडत असतात , परंतु अद्याप त्यांना सुद्धा हवा असलेला खाऊ अजून गवसला नाही .

 आजच्या लहान मुलांसारखे केक कापून , मेणबत्या पेटवून , भेटवस्तू घेऊन वाढदिवस साजरे करण्याचे आम्हाला माहीत नव्हते . आमच्या लहानपणी आई औक्षण करुन , एखादा गोडपदार्थ भरवून आमचा वाढदिवस साजरा करायची , वडिल चुकून घरी जेवायला आलेच तरी त्यांनाही गोड खायला मिळायचे पण हे गोड का केले ? हे वडिलांना सांगायची आमची हिंमत नसायची आणि वडिलानांही गोड का केले ? हे विचारायला फुरसत नसायची । आमच्या वाढदिवसांची कल्पना त्यांना नसायचीच , चिंता असायची ती संस्थेच्या वाढीची आमच्या वाढदिवसाला आमची आजी सांगायची ' माझ्या नानाचं लहानपण खुप कष्टात गेलं . गरीबीचे चटके खात व पोटाला चिमटे देतच तो लहानाचा मोठा झाला , तुम्ही फार भाग्यवान आहात पोरांनो ' , आणि कदाचित त्यामुळेच नानासाहेबांना वाढदिवसाचं कधी अपृप किंवा कौतुक वाटत नसावं!  

  वसतीगृहातल्या मुलांची सहल एकदा पायी वेरुळ पर्यंत व दुसन्यांदा बैलगाडीने पैठणपर्यंत गेल्याचे वडिलांच्या बोलण्यात यायचे , तेव्हा मी अगदी लहान असेल , कदाचित २ वर्षाचा आम्हा भावडांनाही वाटायचं वडिल आपल्याला पण कधीतरी सहलीला घेऊन जातील , आम्ही तसे कधीतरी थोडस घाबरत , आग्रह पण करत असू परंतु वडिलांचा एका खेड्यावरुन दुसरया खेड्यावर निरंतर प्रवास सुरूच राहीला .कधी बसने,कधी पायी तर कधी दुसरयाच्या मोटारसायकलवर मागे बसून , कधी तळपत्या उन्हात , कधी कडाक्याच्या थंडीत तर कधि मुसळधार पावसातून,कधि अनवाणी  तर कधी गुडघाभर चिखलातून ! दिवसांमागून दिवस गेले , असंख्य दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्या संपल्या , मी चाळीशी ओलांडली  आणि वडिलांनी पंचाहत्तरी गाठली . पण आमची सहल कधी निघालीच नाही . आम्ही भावंड संभ्रमात पडलो , सहलीला न्यायचे पण कोणी कोणाला ? शेवटी या गतीमान झालेल्या जेट युगात आम्हीच वडिलांना सहलीला घेऊन गेलो , पायी किंवा बैलगाडीन नव्हे चक्क जेट विमानाने ।। 

   स्वता साठी द्रव्य संचय हा विचार सुध्दा वडिलांना कधी आवडला नाही . परिणाम हातउसनवारी करुन २५ वर्षापूर्वी ५००० रुपयांना ५ गुंठे घेतलेला एकमेव प्लॉट एवढीच स्वत ची मालमत्ता , परंतु शिक्षणसंस्थेसाठी मात्र विविध शाखा मिळून ५ हजार गुंठे जमीन व ३ कोटींची मालमत्ता निर्माण केली . स्वत : साठी २ खोल्यांचे घर बांधायला अवघड गेले . परंतु संस्थेच्या शाळांसाठी अक्षरश : शेकडो खोल्या जातीने लक्ष घालून बांधून काढल्या . आजचा कोणी ' आधुनिक शिक्षणसम्राट असता तर त्याने वर सांगितलेला स्वत : साठीचा व संस्थेचा हिशोब नकीच उलटा केला असता ,

  माझे वैद्यकिय शिक्षण पूर्ण झाल्यावर चाळीसगावीच व्यवसाय करायचे ठरले . परंतु व्यवसाय सुरु करण्यासाठीचे किमान भांडवल पण नसल्यामुळे साहजिकच बैंकांकडे धाव घेतली . परंतु बँकेचे कर्ज घ्यायचे म्हणजे घेतल्यावर कर्जावर तारण देण्यासाठी आवश्यक ती स्थावर मालमत्ता हवी किंवा बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवीतरी हव्यात . या दोहों पैकी आमच्याकडे काहीही नसल्यामुळे सर्वच बँकांनी त्यांना हवी असलेली पत नसल्यामुळे मोठे कर्ज द्यायला नकार दिला. तात्पुरती सरकारी स्वीकारुन दरम्यान परत बँकेला किमान उपकरणांसाठी तरी कर्ज देण्याची विनंती केल्यावर विनातारण त्यानी मर्यादीत कर्ज उपलब्ध करुन दिले . राहिला प्रश्न जागेचा दवाखान्यासाठी लागणाऱ्या तीन चार खोल्यांच्या बांधकामासाठी वडिलांनी नातेवाईक व हितचिंतक यांच्या मदतीने उसनवारी करुन पुरेसा निधी उपलब्ध करुन मगच मी स्वत: चा व्यवसाय सुरु करू शकलो . व्यवसायाची घडी व्यवस्थित बसल्यावर या सर्साव संबधितांकडू घेतलेल्या रकमेची परतफेड नानासाहेबांनी जातीने लक्ष घालून करून घेतली.

  गांधीजींच्या सत्याचे प्रयोग मधील जीवनातला प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा , ' गीताई ' तील त्याग , पूर्णपणे समर्पण   करण्याची वृत्ती , स्थित प्रध्तान्यता व निष्काम कर्मयोग व साने गुरुजींचा खरा तो एकचि धर्म ' प्रमाणे उपेक्षितांसाठी काहीतरी करीत राहण्याची धडपड , नानासाहेबांमध्ये बघायला मिळते . प्रत्येकाने आपल्या जीवनात एखादे तरी सार्वजनिक कार्य अवलंबावे हा समाजाभीमूख दृष्टीकोन त्यांनीच दिला . हे कार्य करतांना मनापासून , निसपृहपणे करावे व त्यात पारदर्शीपणा असावा . हे ही कृतीतून दाखवून दिले .

   आजच्या भ्रष्ट , स्वार्थी , विघातक , राजकीय व सामाजिक जीवनाच्या दलदलीत नानासाहेबांचे स्वच्छ , निस्वार्थी व विधायक शैक्षणिक कार्य चिखलातल्या कमळासारखे उठून दिसते . या कमळाला दीर्घारोग्य देवून त्यातील मधरुपी सद्गुणांचा आस्वाद आम्हा भ्रमरांना अनंतकाळ अनुभवयास मिळून , आमच्या सारखी असंख्य भावंडे अधिकाधिक संस्कारी होवोत हीच परमेश्वराजवळ प्रार्थना !      

               ***


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...