मुख्य सामग्रीवर वगळा

अमृताचे डोहाळे(डाॅ.हेमंतराव देशमुख,माजी आमदार,दोंडाईचा)

 

सु खी माणसाचा सदरा शोधायला लागलो तेव्हा विज्ञानाचा व विवेकी बुद्धिवादाचा कैफ उतरला होता ; मी पस्तीशी ओलांडली होती आणि माझ्या अर्ध्या दमदार आयुष्याचा इतिहास झाला होता . 

   एव्हाना मी प्रथितयश डॉक्टर झालो होतो . राजकारणात मुसंडी मारली होती . पैसा व नावलौकिक मिळाला होता . व्यावसायिक , सार्वजनिक व राजकीय जीवनात मी अधिकाधिक व्यस्त व लौकिकदृष्ट्या यशस्वी होत होतो . इर्षा , स्पर्धा , राजकीय लढाया आणि जिंकण्याची जिद्द यांनी सर्व जगणे व्यापून टाकले होते . हे चक्र कधी थांबेल , याचा शेवट कशात होईल व याचे फलित काय निघेल याचे उत्तर दृष्टिपथात नव्हते . 

   जीवनाची क्षणभंगुरता सर्वांना समजते . डॉक्टर म्हणून मी ती जवळून व सातत्याने अनुभवित होतो . आयुष्याचा एक एक पळ हातातून निघून जातांना पाहात होतो . जे मिळविले ते व्यावहारिक जीवनाचा व जागृत मनाचा भाग होते . आतले मन समाधानी नसावे . म्हणून ते सुखी माणसाचा सदरा शोधायला लागले तेव्हा मी अस्वस्थ झालो . तसे आपण सगळे केव्हातरी आपल्या जीवनात सुखी माणसाचा सदरा शोधू लागतो . अर्थात त्यासाठी आधी सुखी माणूस सापडावा लागतो . तुकाराम महाराजांनी फार पूर्वीच सुख जवापाडे व दुःख  पर्वता एवढे  असल्याचे सांगून ठेवले आहे . पण आता आपण सर्व भौतिक शास्राच्या योगाने सुखसाधने निर्माण कराण्यात फार मजल मारली आहे . माणसांची गर्दीही अफाट बाढली आहे . त्यामुळे खरे तर आता सुखी माणूस लवकर सापडला पाहिजे. पैसा , सत्ता , यश यांनी काही भाग्यवानाच्या हाती पूर्वीच्या सर्व मर्यादा  ओलांडल्या आहेत . उलट इंदिराजीच्या आणि राणी इलीझा बेथच्या या आपल्या काळात सुखजवाऐवजी परमाणू एवढे झाल्यासारखे वाटू लागले आहे . 

    तरीही मला सुखी माणसाचा सदरा सापडला ! " काखेत कळसा आणि गावाला वळसा " अशी आपल्या ग्रामीण भागात म्हण आहे . तसा मला मात्र सुखी माणूस घरातच सापडला , आमचे मामा आणि आता वयाची सफल पंच्याहत्तरी पूर्ण करणारे चाळीसगावच्या  राष्ट्रीय सहकारी शिक्षण संस्थेचे संस्थापक - चालक श्री . यशवंतराव नारायणराव चव्हाण यांच्या अंगावरील नेहमीचा जाड्या भरड्या खादीचा नेहरु सदरा . हाच तो सुखी माणसाचा सदरा होय . 

   मी देखील आता साठीला आलो आहे . पंचवीस वर्षापूर्वी हा सुखी माणसांचा सदरा सापडला नसता तर आजही मी तुकाराम महाराजांचा सुख जवापाडेचा अभंग आळवित बसलो असतो .      तो सदरा सापडला आणि मी देणेघेणे , यशअपयश ,  आशानिराशा , माझेतुझे किंबहुना जगणे मरणे या द्वंद्वापासून मोकळा होऊ लागलो . " Biggest truths are the simplest " अशी म्हण आहे . तसा हा परिणाम एका साध्या पण विश्वव्यापून दशांगुळे उरणाऱ्या मनाच्या आध्यात्मिक वृत्तीतून निर्माण होणाऱ्या क्रियाशील श्रद्धेचा होय .

   माझे वडिल कै . भास्करराव देशमुख चौफेर वाचन असलेले अत्यंत व्यासंगी शिक्षक आणि कठोर बुद्धिवादी कम्युनिस्ट होते.  मार्क्सच्या सर्व पोथ्यांचे वाचन व चर्चामाझ्याही आवडीचा भाग असे . अगदी लहानपणापासून ते दहावी पर्यंत दिवाळीची व उन्हाळ्याची सुटी मिळून वर्षातून किमान २ महिने तरी मी आजोळी मामांचे गावी रांजणगावी राहात असे . तिथे दिवसभर शेतात व संध्याकाळी घरी आजोबांचे संवगडी असलेल्या तुकाराम - ज्ञानेश्वरांशी गाठीभेटी  होत असत , आजोबांची एकतारीवरील भजने हा माझ्या सारख्या एका अपरिपक्व व अजाण मार्क्सवाद्यालाही मोठा आनंदाचा अनुभव असे . 

    असे मार्क्स आणि तुकाराम - ज्ञानेश्वर माझ्या मनावर व डोक्यात आदळले . पुष्कळ पुढे माझ्या लक्षात आले की पाच सातशे वर्षांपूर्वी तुकाराम - ज्ञानेश्वराने माणसाच्या दुःख निवारण्याची जी थेअरी ( तत्वे ) सांगितली होती तीच मार्क्सच्या प्रेक्टीकलमध्ये होती . मार्क्सच्या कोरड्या बुद्धिवादी अनुयायांनी आध्यात्मिक श्रद्धेचा त्याग केल्याने त्यांची मार्क्सच्या समाजवादाची , माणुसकीची गाडी चुकली आणि त्यामुळे सुखी माणसाचा सदरा त्यांच्या हाती लागलाच नाही . 

   श्री . यशवंतराव नानांची मनोभूमिका मुळातच श्रद्धावान . असल्याने त्यांच्यावर आमच्या आजोबांचा म्हणजे त्यांचे वडिल कै . नारायणदादा यांचा आध्यात्मिक श्रद्धेचा संस्कार अत्यंत दृढपणे रुजला आहे . नानांच्या संस्कारक्षम तरुण वयात महात्मा गांधी , विनोबाजी भावे व साने गुरुजी यांची भारतीय जनमानसावर जबरदस्त राजकीय व आध्यात्मिक पकड होती . या सगळ्या महापुरुषांच्या सेवाभावी आध्यात्मिक जीवनदृष्टीचा पारदार्शिक स्पर्श नानांच्या संपूर्ण जीवनाला तेव्हाही व आताही व्यापून राहिला आहे . म्हणून व्यक्तिगत , सांसारिक व व्यावहारिक स्वार्थ त्यांचे पासून आजपावेतो दूर राहिले . सेवाभावाने जगण्यासाठी त्यांना स्वत : शी फार मोठा I झगडा करावा लागला असे दिसले नाही . 

       बरीच वर्षे ते करगाव रस्त्यावरील राष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाच्या तळमजल्यावरील ३ खोल्यात आपला संसार स्थापून होते . तिथे कधी मी मुक्कामाला राहिलो की सकाळी , संध्याकाळी वसतीगृहातील विद्याथ्यांची प्रार्थना ऐकू येई . त्यात गीताई मधील स्थितप्रज्ञाच्या वर्णनाचा समावेश असे . माझ्या मनात तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरी आजोबांच्या एकतारीशी जोडली गेली आहे . तशीच चाळीसगावच्या त्या विद्यार्थी वसतीगृहातील स्थितप्रज्ञ वर्णनाची प्रार्थना नानांच्या जीवनाशी व त्यांच्या शैक्षणिक कार्याशी जोडली गेली आहे . सुखी माणसाचा सदरा मला सापडला तेव्हा मनात या स्थितप्रज्ञ वर्णनाच्या प्रार्थनचाच उजेड पडला होता . 

    आताच्या शिक्षणक्षेत्राचे रुपांतर अल्पकाळात विनाकष्टाने प्रचंड पैसा मिळवून देणाऱ्या एका अत्यंत किफायतशीर इंडस्ट्रीत झाले आहे . एकाएका वर्षात हे शिक्षणवीर लक्षाधीश होत आहेत आणि दोन पिढयांची विनासायास बेगमी करीत आहेत . अशा काळात कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षी कर्वे , डॉ . दादासाहेब घोगरे यांच्या मार्गान गावोगाव व घरोघरी एक छत्री काखोटीला मारून झिजलेल्यापायताणांनी पायी , सायकलने , एस्.टी.बसने प्रवास करीत जाऊन  सामान्य माणसापासून पै - पैसा जमा करुन त्या बळावर सुमारे ५० शाळा , कॉलेजांचा प्रचंड संसार उभा करावयाचा व तोही स्वतःच्या न व्यक्तिगत संसारावर उभा जन्म पाणी सोडून ! ही असामान्य घटना " आहे . मागील पिढीत गांधीजींच्या चरित्राच्या परीसस्पर्शाने अनेक  सामान्य माणसातून असामान्य कार्यकर्ते विविध क्षेत्रात उभे राहिले त्याचे यशवंतराव नाना एक जिवंत उदाहरण आहे .

    अध्यात्माच्या प्रभावाने स्वार्थ सोडून केवळ कर्तव्य भावनेने यश - अपयशाचा किंवा परिणामांचा विचार न करता मनुष्य जेव्हा काम करतो तेव्हा ते काम स्थिर बुद्धीने म्हणून उत्तम दर्जाचे होते . त्या कार्यकर्त्याला कर्तव्याचे समाधान असते व ते अक्षय असते . अशा कार्यकर्त्याला जगण्यातले मर्म समजलेले असते . जीवनाच्या क्षणभंगूरत्वावर , आत्म्याच्या अमरत्वावर , ईश्वराच्या प्रेमावर व सर्व चराचर सृष्टी ईश्वराचेच स्वरुप आहे यावर त्याची परम श्रद्धा असते . त्याच्यासाठी रोजचे कार्य ही जनसेवा म्हणजे ईश्वरसेवाच असते . म्हणून त्यात तो फलित शोधीत नसतो . गीताईने अशा कार्यकर्त्याचे १८ व्या अध्यायात पुढीलप्रमाणे यथार्थ वर्णन केले आहे . 

" नि : संग निरहंकार उत्साहि धैर्यमंडित ।

 फळो जळो चले ना तो कर्ता सात्विक बोलिला ॥।

                                                             ( गीताई १८-२६ ) 

   समाज कार्याच एखादे क्षेत्र निवडून त्यात जन्मभर सेवावृत्तीने काम करणाऱ्या श्री . यशवंतराव नानांसारख्या सेवाभावी कार्यकर्त्यांच्या । कार्याचे मुल्यमापनच हा श्लोक करीत आहे . माझ्या मर्यादित - जीवनातील समस्यांशी झगडत असता त्यांचे फलित काय किंबहुना या जीवनाचा अर्थ काय ? त्याचे प्राप्तव्य काय ? या प्रश्नांची उत्तरे । मार्क्स , तुकाराम , ज्ञानेश्वर यांच्या प्रकाशात शोधता शोधता मी श्रांत झालो असता निष्काम कार्यकर्त्यांच्या म्हणजे स्थितप्रज्ञ वर्णनाच्या । प्रार्थनेचे बटन लागून लख्ख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशात मला । या सुखी माणसाचा सदरा सापडला . त्यामुळे माझ्या जगण्याचा मार्ग प्रशस्त झाला . मी " फळो जळो चले नासा ' झालो . 

   नि : संग , निरहंकार आणि त्यातही ' फळो जळो चले ना' . अशा वृत्तीच्या माणसाशी कोणत्याही बाईला संसार करणे सोपे नाही . न तुकारामच्या आणि सॉक्रेटीसाच्या बायकांचा आक्रोश याच जातीचा होता .पण आमच्या सौ लीला मामींनी हा संसार चांगला रेटला व नानांच्या करता व त्यांच्या किरता ही सुखाचा  झाला . याचा सर्वांना आनंद आहे .

 । ।  सर्वत्र सुखिन : सन्तु ।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...