गीता प्रवचनातील एका प्रवचनात विनोबाजी आपले विचार मांडतांना म्हणतात , ' ' कर्म , भक्ती , ज्ञान यांचा अलगपणा मला सहन होत नाही . काही साधकांची निष्ठा अशी असते की त्यांना फक्त कर्मच सुचते . कोणी भक्तीचा मार्ग कल्पितात व त्यावरच भर देतात . काहींचा कल ज्ञानाकडे असतो . जीवन म्हणजे केवळ कर्म , केवळ भक्ती , केवळ ज्ञान असा केवल वाद मी मानू इच्छित नाही . उलटपक्षी कर्म , भक्ती व ज्ञान यांची बेरीज असा समुच्चयवादही मला पटत नाही . आधी कर्म मग भक्ती मग ज्ञान अशा सारखा क्रमवादही मी स्वीकारत नाही . तिन्ही वस्तूंचा मेळ घालावा असा सामंजस्यवादही मला पटत नाही . मला असे अनुभवावेसे वाटते की कर्म म्हणजेच भक्ती म्हणजेच ज्ञान . एका दृष्टांताद्वारे अत्यंत मार्मिकपणे समजावतांना ते म्हणतात , ' बर्फीच्या तुकड्यातील गोडी , तिचा आकार , तिचे वजन या गोष्टी वेगवेगळ्या नाहीतच . ज्या क्षणी बर्फीचा तुकडा तोंडात टाकला त्याच क्षणी तिचा आकारही खाल्ला तिचे वजनही पचवले , तिची गोडीही चाखली . तिन्ही गोष्टी एक आहेत . बर्फीच्या कणाकणात आकार , वजन , गोडी आहे . त्याचप्रमाणे प्रत्येक कृत्य सेवामय , प्रेममय व ज्ञानमय व्हावे . जीवनातील सर्व अंगप्रत्यंगात कर्म , भक्ती , ज्ञान भरून रहावे याला म्हणतात पुरुषोत्तम योग !
हा पुरुषोत्तम योग आदरणीय नानासाहेबांच्या जीवनात आपणास पहावयास मिळतो . त्यांच्या शब्दांच्या मागे त्याग आणि तपश्चर्येचे सामर्थ्य आहे . हृदयात गोरगरीबांविषयी अपार करुणा आहे . याची प्रत्यक्ष जाणीव ते विविध श्रमशिबिरातून स्वत : काम करीत असतांना विद्यार्थ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या समोर केलेल्या भाषणातून होते . त्यांच्या भाषणातील शब्द केवळ शब्द नसतात तर ती असतात शाश्वत जीवन सत्ये व जीवनमुल्ये , म्हणूनच त्या शब्दात परिवर्तनाचे सामर्थ्य आहे . नवनिर्मितीची शक्ती आहे .
निर्माल्यातून नवनिर्मिती करण्याची शक्ती , त्यातही सौंदर्य बघण्याची दृष्टी नानासाहेबांच्या ठिकाणी आहे . हातांची शक्ती आणि मनाची भक्ती यांची सांगड घालून वाया जाणाऱ्या श्रमशक्तीला त्यांनी योग्य दिशा दिली आहे . नानासाहेबांनी श्रमप्रतिष्ठेला महत्व प्राप्त करुन दिले आहे . आज राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमीटेड चाळीसगाव या शिक्षण संस्थेची जी भव्य दिव्य अशी . ज्ञानमंदिरे उभी आहेत त्याच ठिकाणी एके काळी डोक्यापर्यंत खोल नाले होते . मोठमोठाले खड्डे होते . झाडा झुडुपांनी आणि काटेरी कुरुपाटांनी वेढलेली त्यामुळे निरुपयोगी म्हणून टाकून दिलेली जमीन होती . परंतु नेहमीच श्रमदेवतेची आराधना करणाऱ्या नानासाहेबांनी जनशक्तीला आव्हान केले आणि त्यातून आज या ठिकाणी दिसणाऱ्या शारदेच्या सुंदर मंदिरांची उभारणी केली.
हजारो गोरगरीब विद्यार्थी आज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत.
शिक्षणाबरोबरच नानासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्रमप्रतिष्ठेचे धडेही गिरवीत आहेत . कोणतेही काम निस्वार्थपणे मनापासून करण्याची शिकवण त्यांना येथे मिळत आहे . नानासाहेबांनी आपल्या खाजगी आणि सामाजिक जीवनात गरीब , श्रीमंत , उच्च - नीच , लहान - मोठा असा भेदभाव कधीही मानला नाही . त्यांच्या घराचा दरवाजा सतत सर्वांसाठी उघडा असतो . कोणालाही आत येण्यासाठी परवानगीची गरज लागत नाही . साने गुरुजींनी सांगितलेली समानतेची ही शिकवण
" हृदयातीलही शेती करुन । स्नेह दयेचे मळे पिकवून । समानता स्नेहाला निर्मुन । सौख्या आणू पूर । आम्ही देवाचे मजूर । आम्ही देशाचे मजूर ।
आपल्या आचरणात आणली आहे . संस्थेत याच आचार विचारांची पेरणी केली आहे . समाजातील गोर गरीब , मागास जाती जमातींच्या लोकांनाही सन्मानाची वागणूक मिळते आहे . उद्याचे नेतृत्व मतांच्या पेटीतून नव्हे तर श्रमशक्तीतूनच वर येईल असा नानासाहेबांचा निश्वास आहे . या ठिकाणी पद्भविभूषण महामानव बाबा आमटे यांनी लिहीलेल्या कवितेतील ओळी नानासाहेबांनी सार्थ केल्याचे दिसते .
" येथे नांदतात श्रमर्षी , या भूमीला क्षरण नाही
येथे ज्ञान गाळते घाम , विज्ञान दानव शरण नाही,
येथे कला जीवनमय,अर्थाला अपहरण नाही
येथे भविष्य जन्मत आहे ,या सीमांना मरण नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधी , पूज्य विनोबाजी , साने गुरुजी आणि चुलते कै . हरिभाऊ चव्हाण ही नानासाहेबांची श्रद्धास्थाने आहेत . त्यामुळे सत्तेपेक्षा शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे महत्वपूर्ण साधन बनू शकेल ह्यावर त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे जाळे विणले . आज या संस्थेचा अतिशय सुंदर असा डौलदार आम्रवृक्ष डोलतांना दिसत आहे . अर्थातच हा वृक्ष लावण्याचे व त्याला निकोपपणे वाढविण्याचे मोठे श्रेय आदरणीय नानासाहेबांनाच आहे .
असे हे अत्यंत मितभाषी , कर्मवीर नानासाहेब ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत . त्यानिमित्ताने त्यांचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. यापुढेही नानासाहेबांच्या हातून अशीच भव्य समाजपयोगी कामे होत राहोत . त्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभून त्यांच्या वयाच्या 100 वर्षा नंतर त्यांचा हिरक महोत्सव साजरा करण्याची संधी आम्हाला मिळो हिच प्रभुचरणी प्रार्थना करतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा