नासाहेबांबद्दल काय आणि किती लिहावं . त्यांचे संपूर्ण जीवन तर कारूण्याचा व कर्तृत्वाचा अथांग सागर आहे . नानासाहेबामध्ये गुंतावला व समर्पित व्हायला मला खूप आवडते . तासनतास नानासाहेबांची कनवाळू मूर्ती बघायला व सश्रद्ध पुजायलाही आवडते . " बहुजन हिताय " हा नानासाहेबांचा शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रमुख ध्येयवाद आहे . हा माझ्यासारख्या अनेक गरीब , होतकरू व मागास जाती जमातीतील लोकांना , गुरुजनाना व विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा मार्ग दाखवितो . आपल्या राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळामार्फत नानासाहेबांनी समाजातील विषमता व अज्ञान यथाशक्ती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे . शिक्षणाचा ग्रामीण भागात केलेल्या प्रसारामुळे मुलींना आपला विकास करण्याची सुवर्णसंधी मिळाली .
नानासाहेबांची दृष्टी तळागाळातील वर्गाचा वेध घेणारी व भारतीय संस्कृतीचा शोध घेणारी आहे . अनेक अडचणींचे , संकटांच डोंगर सहज चिरणारा हा योद्धा गर्वाने , मीपणाने , स्तुतीसुमनांनी कधी भारावला नाही . सातत्याने सत्याची कास , सातत्याने घडपड , चिंतन , स्वत : साठी नाही , कुटुंबासाठी नाही तर जनतेच्या भल्यासाठी . संताचे हृदय लाभल्यामुळे जनतेमध्ये खरा जनार्दन दडलेला आहे . तो कोणत्याही देव्हाऱ्यात नाही , मंदिरात नाही की गिरीकपारीत नाही हे नानासाहेबांना समजू शकले व त्याप्रमाणे ' त्यागमय ' सेवाभावी आयुष्य ते आजपर्यंत जगले व पुढेही जगतील . नानासाहेबां व्यक्तीमत्वाचे खरे दर्शन मला या तुकारामाच्या अंभगात झाले . सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा ।
न लिंपे विटाळा अग्नि जैसा ॥१ ॥
- सत्यवादी करी संसार सकल ।
अलिप्त कमळ जळी जैसे ॥२ ॥
- घडे ज्या उपकार भूतांची ते दया ।
आत्मस्थिती तया अंगी वसे ॥३ ॥
न बोले गुण - दोष नाइके जो कानी ।
वर्तोनि तो जनी जनार्दन ॥४ ॥
तुका म्हणे वर्म जाणितल्याविण ।
पावो करिता शीण सांडी-मांडी||5||
ज्याने सर्वस्वाचा त्याग केला तो नेहमी सोवळा आहे.हे जे तुकाराम म्हणतात तसेच आमचे नानासाहेब सुध्दा सोवळे आहेत . ' हे सोड ते जोड ' या गोष्टींच्या नादी न लागता सतत पन्नास वर्ष एकाच ध्येय कार्यात सर्वस्वी त्यांनी झोकून दिले . ' मनुष्य पुष्कळ वेळा कार्याचे नावाखाली आपल्या देहासंबंधी फार स्वार्थी विचार करतो . ज्याने त्याने आपल्या हृदयस्थ परमेश्वरास शरण जाऊन आपली भुमिका ठरवावी.आपण लोक मरणाची गोष्ट निघाली की फार बारकाईने हिशेब ठेवू लागतो.पण जेथे एकाचे बलिदान हजारांचे अंत:करणात कार्याची स्फूर्ती आणते तेथे इतर बारीकसारीक हिशेब ठेवण्याची जरूरी नसते. गीतेची सुरूवातच देहमायाभंगापासून झालेली आहे.
मरण दाटे अमित्र जोवरी
आत्मोद्धार अशक्य तोवरी
देह न टाकवे जीर्णवस्त्रा परी
आत्मविचारी टोणपा तो ||
नानासाहेबांच्या व्यक्ती विशेष कंगोरयाचा शोध घेतल्यास खरोखरच अहंकाररहीत नम्र जीवनाची उपासना करतांना ते दिसतात. एखाद्या गरीबाच्या, सामान्याच्या घरात जाऊन आस्थेने विचारपूस करणारे नानासाहेब मी रोजच पहातो . हे तुमच्या आमच्या सारख्या पांढरपेशा वेशातील लोकांनाही जमू शकणार नाही . इतका मीपणा,दंभ आम्हाला चिकटलेलाअसतो.
नानासाहेब तुम्ही म्हणजे वाळवंटातील हिरवळ आहात. तरूणांचे आशास्थान आहात. भावी पिढीचे दैवत आहात. तुमच्या अंत : करणातील विशाल गुढ तर आम्ही जाणू शकत नाही . पण त्याची कल्पना तरी करु शकतो . ती अशी
मी प्रवासाला निघालोय
रिकाम्या हातानं , पण
आकांक्षांनी भरलेल्या मनानं
वाटेवर भिडतील अनंत संकटे
हा अनंताचा प्रवास मात्र
सुरुच राहील निर्भिड मनानं .
असा हा तुमचा प्रवास आहे . परमेश्वर तुमच्या ह्या निर्भिड प्रवासात कोणताच खंड पडणार नाही अशी सदिच्छा ! भावपूर्ण अंत : करणानी या अमृतमहोत्सवी व्यक्त करतो . तुम्हाला दीर्घायुरारोग्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा