मुख्य सामग्रीवर वगळा

श्री.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण: एक शिक्षणयोगी(प्रा.वसंतराव शंकरराव चव्हाण,बी.काॅम.,एम ए.(अर्थ.)एम.ए.(समाज) एम्.एड. सेवानिवृत्त प्राचार्य,नाशिक)

 

 . महात्मा गांधींनी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हटले आहे. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे . महाराष्ट्र हा समाज सुधारकांचा प्रदेश आहे . महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे . श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजतागायत या भूमीची विशेष मशागत झाली आहे . राजकारण , समाजकारण , अध्यात्म , शिक्षण , साहित्य , सहकार , कृषी , उद्योग अशा विविध क्षेत्रात हिमालयाच्या उंचीची माणसे या भूमीने दिली आहेत . घडविली आहेत . म्हणून तर आचार्य अत्र्यांसारखे महाराष्ट्राचा व मराठी असल्याचा स्वाभिमानाने उल्लेख करीत भारत हे राष्ट्र आहे , तर मराठी भाषिक राज्य असलेले महाराष्ट्र ' महा ' ' राष्ट्र आहे , असे बोलले जाते . त्यात तथ्य आहे . त्याबोलण्यातील आशय महत्वाचा आहे . महाराष्ट्राने कार्यकत्यांना ( त्या त्या क्षेत्रातील नेत्यांना ) जन्म दिला , त्यांना घडविले आणि त्याच कार्यकत्यांनीही महाराष्ट्र घडविला , विकसित केला , प्रगत केला आणि महान करण्याचा प्रयत्नही केला.   
  अशाच या कार्यकर्त्यांच्या मालिकेतील श्री . यशवंतराव नारायण तथा नानासाहेब चव्हाण एक होत . आज चाळीसगाव तालुक्यात बालवाडी , प्रा. शाळा , मा . शाळा , अंधशाळा , आश्रमशाळा , तांत्रिक विद्यालय , कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय असा  ४६ शाखांचा प्रपंच करणाऱ्या , २५००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देणारया आणि एक हजारच्या जवळपास शिक्षक - सेवक असलेल्या संस्थेची स्थापना , निर्मिती व प्रगती हे नानासाहेबांच्या कार्याचे दृश्यफल होय . तालुक्यात , जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . चाळीसगाव 'या संस्थेचे नाव आणि नानासाहेब यांचे नाव एकरूप झालेले ऐकावयास , पहावयास मिळते . त्यात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आला संस्थेच्या स्थापनेपासून १ ९५३-५४ पासून आजतागायत १ ९९ ७ - ९ ८ पर्यंत संस्थेची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. राजकीय सत्तेत , आर्थिक सत्तेत माणसे दीर्घकाळ कार्यरत असू शकतील पण सर्जनशील - विधायक कार्यात , शैक्षणिक कार्यात जेथे श्रम,.चिकाटी व जिद्द हवी असते . जेथे अवघड असे समाज प्रबोधन करावे लागते . जेथे रुढीपरंपरेच्या गर्तेत असूनही तेच योग्य मानणारे असतात आणि जेथे बदलण्याची तयारी नसते . विकास - प्रणाली म्हणजे काय हे ज्ञान नसते . आहे तेच ठिक आहे अशी दैवाधिनता असते ते दीर्घकाळ कार्य करणे अत्यंत कठीण असते . श्री. य. ना चव्हाण यांनी केवळ असे कार्य केले असे नव्हे , तर त्यावर प्रभावी ठसा उमटविला आहे . हे महत्वाचे आहे . शिवाय हे सारे त्याचे एकहाती , " एकला चलोरे ' या भूमिकेतून उभे राहिलेले कार्य आहे .        
स्वातंत्र्यसैनिक असलेल्या( कै. हरिभाऊ चव्हाण )काकांचा बाळपणीचा सहवास, 1936 मधील फैजपूर कॉंग्रेसच्या बालवयात ऐकलेल्या स्फूर्तिकथा, ग्रामीण शेती व्यवसायाची असलेले नाते, साधारण परिस्थितीमुळे प्राथमिक शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत श्रम करून ,काम मिळवून त्या द्वारे  स्वतःच्या शिक्षणाची केलेली यशस्वी वाटचाल ,1942 च्या आंदोलनाचा झालेला भाव विचार स्पर्श, साने गुरुजींची ओळख व त्यांच्या कार्याचा प्रभाव, वंचित, उपेक्षित ,मागासलेल्या व सतत दुष्काळी, निम दुष्काळाच्या छायेत जीवन व्यतीत करणाऱ्या ग्रामीण समाजाचे घडलेले दर्शन आणि कोणत्यातरी क्षेत्रात विधायक कामासाठी झोकून देण्याची ऊर्मी. यामुळे नानासाहेबांनी वकिली व्यवसाय न करतात,सामान्या प्रमाणे प्रपंच एके प्रपंच यात न रमता चाळीसगाव तालुका आपले कार्यक्षेत्र निवडले त्यातही शिक्षणाचे, शिक्षण प्रसाराचे ,शिक्षणाद्वारे जनजागृती करण्याचे व समाज बदलण्याचे काम त्यांनी पत्करले. उन्या पुऱ्या पन्नास वर्षात श्री गणेशा केलेल्या कार्याचा जसा आज वटवृक्ष झालेला पहावयास मिळतो तसेच त्यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ, विचारशिल, चिंतनशिल आणि व्रतस्थ स्वरूपात परिपक्व झालेले दिसते.  चाळीसगाव तालुक्यात कारयचा व्याप वाढवीत असतांना त्यांनी संपन्न गावे,मोठी गावे, हमरस्त्यावरील गावे व काहीशी जागृत गावे याच्यांऐवजी लहान गावे,दुर्गम परिस्थिती ,मागास-अतिमागास वस्ती , शिक्षणाच्या सर्वार्थाने गैरसोयी असलेल्यांना अग्रक्रम दिला.   अशा ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत शाळा सुरू केल्या.  नंतर इतरत्र लक्ष दिले . विद्यार्थी मिळविताना, त्याना प्रशावेश देतांना आणि समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देतांना ते छोट्या छोट्या वस्तीत,  गल्लीत, बोळात , वाड्या , तांडे इ.  ठिकाणी पायी फिरले.स्वत: 'कमवा व शिका ' याचे आचरण केलेले असल्यान या विद्यार्थ्यां कडून, सेवकांकडून शाळेची छोटी मोठी श्रमसंस्कारातून केली. औपचारीक शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांना खरया अर्थाने शहाणपण यावे, त्यांचा विकास व्हावा व त्याच्या ठिकाणी विविध मूल्याची जोपासना व्हावी यावर त्यांचा भर असतो . शिक्षणाचा फायदा समाजातील सर्व घटकांना मिळावा , त्याद्वारे सामाजिक अभिसरण व्हावे व सामाजिक परिवर्तनास गती मिळावी , यासाठीही ते जागृत असतात . याचे उदाहरण म्हणजे संस्थेत सेवकभरती करतांना त्या त्या गावात , वस्तीत गरजू , होतकरू व किमान शैक्षणिक पात्रता असलेल्यांना  त्यांनी सतत आवर्जून अग्रक्रम दिला मागास वर्गामधील अतिमागास असे वर्गांमधील अतिमागास असे मांग,गारुडी ,रामोशी ,नंदीबैलवाले, गोंधळी ,ढोर ,पाथरवट, वासुदेव  इ. जांतीच्या वस्तीत जाऊन चौकशी करून व त्यांना बोलावून घेऊन त्यांना सेवेत सामावून घेतले. काहीवेळा काहीएक शैक्षणिक पात्रता नसेल तर त्यांना चतुर्थ श्रेणी सेवेत घेतले. यामागील भूमिका  त्या समाज समूहांमध्ये  शिक्षणाची ओळख व्हावी.  ते शिक्षणाकडे आकर्षित व्हावेत . त्यांच्याच माणसा द्वारा त्यांचे प्रबोधन व्हावे. जागृती व्हावी अशीच असल्याने जाणवते . अशी दृष्टी व भूमिका ही निश्चितच आगळी होय. खरे तर आज सर्वच क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या लहान-मोठ्या कार्यकर्त्यांमध्ये ,नेत्यांमध्ये अशा दृष्टीची ,भूमिकेची नितांत गरज आहे. तसे झाले तर ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट प्रगती व समृद्धी दूर नाही .
श्री.य.ना. तथा नानासाहेब यांचे प्रत्यक्ष आलेले काही अनुभव व त्यांनी त्या त्या वेळी व्यक्त केलेले विचार यांचा उल्लेख करायला हवा.  आम्ही शिरसगाव ग्रामस्थांनी शिरसगावी  1958-  59 मध्ये 'न्यू इंग्लिश स्कूल' व ग्रामपातळीवर संस्था स्थापन केली होती. दोन वर्षे ग्रामस्थांनी हायस्कूल चालविले .नंतर मी, माझे काका व काही प्रमुख ग्रामस्थ यांनी वेगळा विचार केला . गाव की गाव कारण निर्माण होऊ नये आणि शाळेचा विकास व प्रगती व्हावी म्हणून शाळा तालुका/ जिल्हा /राज्य पातळीवर काम करणाऱ्या मोठ्या संस्थेत जोडावी. हा तो विचार होता  त्यास अनुसरून विचारविनिमयानंतर अनेक प्रस्तावां पैकी राष्ट्रीय शिक्षण संस्थेत आपली शाळा सोडावी व त्याच संस्थेत संस्था विलीन करावी असा निर्णय घेण्यात आला . नानासाहेबांनी ग्रामस्थांचा निर्णय स्वीकारताना  शाळा तुम्हीच चालवायची आहे.  तिच्या वाढ व विकासासाठी तुम्हीच प्रयत्न करावयाचे आहेत . आर्थिक योगदान सह सर्व प्रकारचे योगदानही तुम्हीच करावयाचे आहे . मी केवळ तुमच्यातील एक असेल आणि तुमच्या समवेत असेल. शाळा गाव व ग्रामस्थ परस्पर बांधील असावेत या शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली.  गेली 35- 36 वर्षे नानासाहेब यांची वाटचाल व भूमिका तीच राहिली आहे. त्यातच त्यांचे वेगळेपण आहे. तुमचा पण तुमच्यात राहूनही वेगळा हा त्यांचा स्वभाव आहे .
    १ ९६३-६४ चे वर्ष असेल . मी नाशिक येथे ना.जि.म.वि.प्र समाज संस्थ्येच्या महर्षि शिंदे ट्रेनिंग  काॅलेजच्या प्राचार्यपदी होतो. त्यावेळी  नाशिक येथे नानासाहेब प्रत्यक्ष भेटले. "आम्ही संस्थेचा व्याप- विस्तार वाढवित आहोत . ग्रामीण भागात शाखा  सूरू करीत आहोत , अनुभवी व सामाजिक बांधीलकी मानणा रयानी या कामात यावे. आपण या तालुक्यातीलही आहात .श्री गु. स. परदेशी संस्थेत आले आहेत . ( श्री. परदेशी पुढे महाराष्ट्र राज्याचे सेवेत गेले  व नंतर शिक्षणसंचालक पदावरून निवृत्त झाले . ) विचार करा इ ." त्यावर मी त्यांना म्हटले ,"  नानासाहेबा आपण चाळीसगाव तालुक्यात जे कार्य करताहात , तसलेच कार्य ही संस्था ही गेली पन्नास वर्षे करीत आहे . ह्या संस्थेचोही ध्येय - उद्दीष्टे व परंपरा उच्च श्रेणीच्या  आहेत. एक प्रकारे मी आपलेच काम करतो आहे . आपलेच क्षेत्र  विस्तारलेले आहे. असे मानावे आणि मला समजून घ्यावे" ,त्यांनी माझ्या भूमिकेचे कौतुक केले . तरीही आपण अधूनमधून तिकडे आल्यावर लक्ष देत चला . ही संस्था ( नाशिक मविप्र) माठी आहे . तिच्या शैक्षणिक , प्रशासकीय आणि अनुदानाविषयक विशेष बाबी सांगत जा. काही वैशिष्टयपूर्ण असेल तर ते  रा.स.शि.प्र. मंडळही निश्चित  कार्यवाहीत आणण्याचा प्रयत्न करील. या शब्दात त्यांनी त्यांचे  मोठेपण व्यक्त केले . तद नंत्तर आजतागायत त्याची ती भूमिका व  विचार कायम आहेत . नानासाहेब यांचे  मोठेपण त्यांच्या विचारात व  आचारात आहे . वरील घटने नंतर  तब्बल २०-२१ वर्षानंतर १ ९८४ -८५ मध्ये त्यांनी राष्ट्रीय महाविद्यालय , चाळीसगाव ' याचे प्राचार्यपद मी स्वीकारावे असे सुचविले . त्यांनी महाविद्यालय सुरु केल्यावर दोन प्राचार्य झाले होते . महाविद्यालयाचा विकास व प्रगती अधिक वेगाने व्हावी असे त्यांना वाटत होते . विशेषत : महाविद्यालयातील शिस्त , शैक्षणिक दर्जा व विद्यार्थ्यांचा अपेक्षित विकास यावर त्यांचा भर होता. माझी सेवानिवृत्ती पूर्वीची ७-८ वर्ष मी तालुक्यात घालवावी असे त्यांनी बोलून दाखविले . त्याहीवेळी मी विनम्रपणे माझ्या विषयीच्या त्यांच्या भावना व विचार याबाबत कृतज्ञता व्यक्त करुन असमर्थतता प्रकट केली . त्यावेळी मी वाणी महाविद्यालयात प्राचार्य होतो . नाशिक म. वि. प्र. समाजाचे संस्थापक कै . रावसाहेब थोरात यांची वणी ही जन्मभूमी , कर्मभूमी . त्याठिकाणी कामाची संधी मिळाली . रावसाहेबाचे ऋण म्हणून त्यांच्या गावी महाविद्यालय सुस्थिर करणे , त्यास विहीत आकार देणे व महाविद्यालयाचा विकास करणे हा माझा विचार मी व्यक्त केला . माझ्या प्रयत्नांची माहिती दिली .त्याहीवेळी नानासाहेब यांनी मला समजावून घेतले व  माझ्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या .आम्ही दोन अडीच तास नाशिक येथे  त्यांच्या मेहुण्यांकडे बोलत होतो. त्यावेली जाणवले ते त्यांच्यातिल शिक्षण - विषयकसेवाव्रत शिक्षणदानाचा या तेवत रहावा ही भावना नानासाहेब खऱ्या अर्थान शिक्षणयोगीच आहेत . 
     ३०-३५ वर्षाच्या वाटचालीत त्यांच्याशी कित्येकवेळा संस्थेची आर्थिक स्थिती , शाळासाठी जागा व इमारतीच्या समस्या , परीक्षांचे निकाल , सेवकाच्या सेवाशर्ती , त्याचे काम व शिस्त , कार्यकत्यांची साथ आणि तालुक्यातील , जिल्ह्यातील विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांचे सहकार्य व भूमिका , अनुदानविषयक अडचणी , अभ्यासक्रम व अभ्यासेतर उपकम एक ना दोन अनेक प्रश्नांवर चर्चा झाली, मोकळेपणी बोलणे झाले . परंतु त्यांनी ना कार्यकत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली . ना सेवकांबाबत उणीवा सांगितल्या , ना राजकीय नेत्यांबाबत प्रतिकूल भावना प्रगट केल्या . " होईल , करतील , हळूहळू त्यांनाही समजेल ,   लक्षात आले व कार्य दृष्टीपथात आले म्हणजे आपोआप सहभागी होतील आपण आपल्यापरीने सुरु ठेवावे . साथ मिळाली तर चांगलेच आहे . मात्र साथ नसलीतरी थांबावयाचे नाही . आपण करतो ते कोणी सांगितले म्हणून नव्हे . आपण स्वत : पत्करलेल्या कामासाठी आपणच धडपड करायला हवी . इ . स्वरुपात त्यांची भूमिका व विचार सुस्पष्ट पहावयास मिळत . नानासाहेबांनी खऱ्या अर्थाने चाळीसगाव तालुक्यातील शिक्षणाचा हा जगन्नाथाचा रथ एकट्यानेच चालविला , गतिमान केला . भले त्याचे श्रेय ' संर्वाचे ' म्हणून ते सर्वाना देवोत . पण ' एकला चलारे ' हेच त्यांचे ब्रीदवाक्य आहे . त्यांचे सांगणे , वागणे व जगणे यात एकसुत्रता दिसते . आचार - विचार यात एकरूपता पहावयास मिळते . आळस , देवाधिनता व निष्क्रियता यावर मात करता येते आणि हाती घेतलेले कार्य तडीस नेता येते हे त्यांचे जीवनसूत्र आहे . अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना शुभेच्छा देतांना , त्यांचे अभिष्टचिंतन करतांना त्यांच्या चाहत्यांनी , आजी - माजी विद्यार्थ्यांनी व संस्थेतील सेवकांनी त्यांच्या जीवन सुत्राचा किमान स्वरुपात का होईना अंगिकार करावा . तोच त्यांच्या विषयीचा  वास्तव आदर ठरेल . नानासाहेब शतायु होवोत ! त्यांना समाजसेवेसाठी निरामय आरोग्य लाभावे ! उर्वरित आयुष्यात उर्वरित कार्यासाठी त्यांना शक्ती सामर्थ्य लाभावे ही शुभेच्छा !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...