शिक्षण क्षेत्रातील नंदादीप-नानासाहेब य.ना.चव्हाण(प्रा.डाॅ.के.आर्.सोनवणे,नुतन मराठा महाविद्यालय,जळगाव)
7 जानेवारी 1998 रोजी मान.कर्मवीर शिक्षणमहर्षी नानासाहेब य.ना. चव्हाण यांचा अमृत-महोत्सव साजरा होत आहे .त्यानिमित्ताने त्यांचे विद्यार्थी डाॅ.के.आर्.सोनवणे यांनी अर्पण केलेली भावसुमनांनजली.
महाराष्ट्रात अनेक कर्मवीर , शिक्षणमहर्षी , कर्मयोगी जन्माला आले . त्यांनी स्वार्थापेक्षा परार्थाला आणि परमार्थाला अधिक महत्व दिले. रक्त , घाम आणि माया - ममता ओतून त्यांनी ही भूमी खऱ्या अथनि सुजल , सुफल बनविण्याचा प्रयत्न केला . ' सारेच दीप कसे मंदावले आता ' असे कविवर्य अनिल यांनी म्हटले आहे . त्यात बराच तथ्यांश आहे . सारे दीप मंदावले तरी देवाजवळचा नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्यासारखा एखादा तेजोमय नंदादीप जोपर्यंत अंतर्यामीच्या आर्ततेने प्रज्वलित आहे तोपर्यंत आशेला जागा आहे . अशा या नंदादीपाच्या सहवासात १ ९ ५६ पासून राहण्याचा योग मला आला . व्ह.फा ( मराठी सातवी ) ची परीक्षा देण्यासाठी मी चाळीसगावी गेलो . त्यावेळी तालुक्याच्या ठिकाणी मराठी सातवीच्या परीक्षेचे केंद्र होते . राष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहात आम्हा सर्व विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था होती . तिशीच्या आसपास वय असलेला , चेहऱ्यावर तेज , राजबिंडे व्यक्तिमत्व असलेला तरुण , अंगावर पांढरे शुभ्र खादीचे धोतर , सदरा - टोपी , पायात एकनाथी चप्पल अशी साधी राहणी असलेले उमदे व्यक्तिमत्व सर्व विद्यार्थ्यांच्या नजरेत भरत असे .ही व्यक्ती म्हणजे या वसतीगृहाचे व्यवस्थापक यशवंतराव चव्हाण आमचे शिक्षक मोठ्या आदराने त्यांच्याशी वागत . सातवीच्या परिक्षेचा निकाल लागला . माध्यमिक शाळा फक्त चाळीसगाव येथेच त्यामुळे राष्ट्रीय वसतीगृहात सवलतीच्या दराने भोजन व निवास व्यवस्था व्हावी या अपेक्षेने मी व माझे वडील असे आम्ही नानासाहेब चव्हाण यांना भेटण्यासाठी चाळीसगावी गेलो . नानांनी माझी कौटुंबीक माहिती घेतली . घरात अठराविश्व दारिद्रय . चाळीसगाव केंद्राला मी दुसऱ्या क्रमांकाने जरी उत्तीर्ण झालो तरी भविष्यात सर्वत्र गडद अंधार दिसत होता . अशावेळी नानारुपी नंदादीपाने मला प्रकाश दिला. वसतीगृहात अर्ध नादारीने निवासाची व भोजनाची सोय झाली. उरलेल्या भोजनखर्चाच्या दरमहा पाच रुपयांसाठी काही व्यक्तिं कडे घरगुती कामे केलीत . त्यावेळी वसतीगृहाला दर महिन्याला दोन पायली धान्य , दोन शेर गहु , एकशेर दाळ आणि भोजनखर्च म्हणून रोख पाच असा साधारणत : खर्च येत असे . धान्य , गहू व दाळ न भरण्याची सवलत नानांनी दिली . १ ९ ५७ साली ' राष्ट्रीय विद्यालय' या नावाने माध्यमिक विद्यालय नानांनी सुरु केले आणि पहिल्याच वर्षी आठवी, नववी या वर्गाची प्रत्येकी एक तुकडी सुरू झाली . आम्ही वस्तीगृहातील आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेलेेे सर्व विद्यार्थ्यी राष्ट्रीय विद्यालयात नववीच्या वर्गात दाखल झालोत. राष्ट्रीय विद्यालयाच्या वर्गाची साफसफाई आठवड्यातूूून एकदा सर्व वर्ग शेणाने सारवणे, पिण्याचे पाणी भरणे, बेल्ले देणे इत्यादी कामे अवघ्या पाच रुपये महिन्याच्या मोबदल्यात मी केलीत, त्यामुळे भोजन खर्चाची सोय झाली. वसतीगृहातील दैनंदिनी अतिशय व्यवस्थीत आणि शिस्तबध्द होती.सकाळी पाच वाजता सर्वांनी उठणे,सामुदायिक प्रार्थना,पाच ते सात अभ्यास सात ते साडेसात साफसफाई व श्रमदान,आठ ते दहा अभ्यास,दहा वाजता भोजन,अकरा ते पाच पर्यंत विद्यालयातिल तासांना हजेरी,पाच ते सहा खेळ व व्यायाम,संध्याकाळी सहा वाजता भोजन,रात्री सात ते नऊ अभ्यास रात्री नऊ वाजता सामुदाईक प्रार्थना,त्यानंतर रात्री दहा पर्यंत अभ्यास व रात्री दहा वाजता सर्वांनी झोपी जाणे.पुन्हा सकाळी पाच वाजता उठणे.यासर्व दैनंदिनीवर नानासाहेबांचे कटाक्षाने लक्ष असावयाचे. सकाळी प्रार्थना झाल्यावर वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक तास इंग्रजी विषय व रात्री नऊ वाजता प्रार्थना झाल्यावर एक तास गणित विषय नाना स्वत: शिकवीत असत.त्यामुळे वसतीगृहातील विद्यार्थी गणित व इंग्रजी विषयात नापास होणे अशक्य.मला स्वत:ला गणित विषयाची आवड होतीच,परंतु त्या विषयाचे आकलन नानांमुळे झाले.सकाळी पाच नंतर आणि रात्री दहा पूर्वी कोणीही झोपी जाऊ नये म्हणून नाना स्वत: वसतिगृहातील प्रत्येक खोलीत बाहेरूनच खिडकीतून लक्ष ठेवत.अर्ध्या तासाच्या अंतराने फेरी मारत असत.जो कोणी झोपलेला सापडला त्याला हातात झाडू देऊन साफसफाईची शिक्षा ठरलेली.रात्री दहा नंतर कुणीही जागू नये असा दंडक होता.वसतिगृहातील विद्यार्थी चोरून लपून सिनेमाला जाणार नाहीत या साठी वसतीगृहाबाहेरील अंधारया जागी नाना पातळीवर असत.रात्री बारा वाजता सिनेमा सुटल्यावर गुपचूप पणे कोणी वसतिगृहात प्रवेश करतो काय या साठी बरयाच वेळा नाना पहारा करित असत.अशा वेळी नाना हजर आहेत हे पाहिल्यावर विद्यार्थी पळ काढीत असत.नानांनी अशांचा पाठलाग सुध्दा केलेला आहे.ग्रामिण भागातील विद्यार्थी शहरी वातावरणाने बहकून जाऊ नयेत या बाबत नावांचा कटाक्ष होता.जवळ जवळ दिवसातील वीस-बावीसतास विद्यार्थ्यां साठी नाना व्यतीत करीत असत.हे करतांना त्यांनी स्वत:च्या संसाराची सुखाची पर्वा केली नाही .स्वत:ला वसतिगृहाच्या कामात इतके झोकून दिले की,त्या पलिकडे दुसरे विश्व त्यांना माहीत नव्हते.वसतिगृहातिल सर्व कामे विद्यार्थी आळीपाळीने,गटागटाने करित त्यात साफसफाई,भाजीपाला आणने, दळण निवडणे, भाजी चिरणे,चक्कीवरून दळन दळून आणने, भोजन वाटप व्यवस्था वसतिगृहाच्या भांडाराची व्यवस्था,बाजार हाट,वसतीगृहाचे आर्थीक व्यवहार इ. कामे विद्यार्थीच करीत.त्या साठी भोजनमंत्री , दळणमंत्री , साफसफाई मंत्री , भांडारमंत्री इ . मंत्री पदे निर्माण करण्यात आलेली होती . संपूर्ण वसतीगृहाचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडेच होते . प्रत्येक विद्यार्थी आपले काम जबाबदारीने , प्रामाणिकपणे , शिस्तबद्धरित्या वेळच्यावेळी पार पाडीत असत . ह्या प्रत्येक कामात नाना स्वत : विद्याथ्यांसोबत सहभागी होत असत . नानांनी हे सर्व आदर्श विद्यार्थ्यांना आपल्या आचरणाने व कृतीने घालून दिलेत . श्रमसंस्कार , नैतिक संस्कार इ . मुल्य संस्कार विद्यार्थ्यांवर त्यांनी बिंबवलेत . विद्यार्थी आजारी असला तर त्याची सुश्रुषा आईच्या ममतेने नाना करीत असत . साने गुरुजींने दुसरे रुपच नाना होते . परंतु ते सानेगुरुजी इतके भावूक नव्हते . ते अतिशय करारी , शिस्तप्रिय होते . त्यांच्याविषयी भितीयुक्त आदर विद्यार्थ्यांमध्ये होता . आपल्या हातून कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रत्येकजण जपत असे . राष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृह म्हणजे कर्मयज्ञ - ज्ञानयज्ञ . या सर्वांचे शिल्पकार नानासाहेब चव्हाण . हे वसतीगृह जर नानांनी सुरु केले नसते तर अनेक होतकरु विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा असूनही त्यांना शिक्षण घेणे शक्य झाले नसते . शाळा कॉलेजची द्वारे उघडी ठेवली की , सर्वांनाच त्यात शिक्षण घेता येते असे नाही . कित्येक विद्यार्थ्यांची चाळीसगाव शहरात राहण्याची सोय नव्हती . कित्येकांची गरीबी व जात आडवी येत होती . नानांनी । अनेक गरीब व होतकरु विद्यार्थ्यांची मोफत सोय वसतीगृहात केली . - विद्यार्थ्यांना घरापेक्षा वसतीगृहात अधिक एकाग्र चित्ताने अभ्यास करता आला . एकलकोंडा स्वभाव जाऊन सर्वांशी मिळून - मिसळून । वागण्याची सवय झाली . जात पात न मानता एकत्रित सहभोजन घेता आले. नानासाहेबांसारखा आदर्श व्यवस्थापक वसतीगृहाला । लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन , सहकार्य , सहिष्णुता , - शिस्त , नियमितपणा व श्रमप्रतिष्ठा इ . सद्गुणांची वाढ झाली . आज या वसतीगृहातून बाहेर पडलेले माजी विद्यार्थी , प्राचार्य प्राध्यापक , शिक्षक , वकील , डॉक्टर , इंजिनिअर , तंत्रज्ञ , शास्त्रज्ञ , साहित्यिक ,व आमदार , वरिष्ठ अधिकारी , समाजसेवक आणि समाजधुरीण आहेत . त्यांना घडविण्याचे श्रेय नानासाहेबांच्या दिव्य दृष्टीला , तळमळीला आणि त्यांच्या अखंड तपश्चर्येला आहे . सन १ ९ ५१ ते ५४ या कालावधीत नानासाहेब चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट हायस्कूलमध्ये शिक्षक होते . सुखाची नोकरी होती . परंतु शिक्षण घेतांना ज्या गरीबीचे चटके लहानपणी त्यांनी सहन केले . शिक्षणासाठी धुळे - बडोदा - पुणे अशी भटकंती त्यांनी केली ती झळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लागूनये यासाठी त्यांचा आत्मा रात्रंदिवस तळमळत असे . व्यक्तिच्या आत्म्याचे मोठेपण त्यांच्या प्रभावी अंत : प्रेरणेत व विकासशील व्यक्तिमत्वात आढळते . एखाद्या असामान्य व्यक्तिचा आत्मा कुठल्यातरी लौकिक निमित्ताने खडबडून जागा झाला म्हणजे बाह्यत : शिला वाटणाऱ्या पाषाणातून अहिल्येसारखी रुपवती तपस्विनी बाहेर पडावी तसा चमत्कार घडतो . एक नवे जग निर्माण करण्याच्या प्रबळ इच्छेने हा जागृतआत्मा इतका भारावून जातो की , त्याच्यापुढे त्याला स्वत : च्या प्राणाचीही पर्वा राहत नाही . असामान्य व्यक्तिच्या जीवनात आत्मजागृतीचा क्षण केव्हा व कसा येतो हे पाहिले म्हणजे या जागृतीला निमित्तमात्र झालेली घटना अगदी सामान्य वाटू लागते . अंधारात विज चमकावी , तिचा प्रकाश दश दिशांना पसरावा आणि त्या क्षणिक उज्वल प्रकाशात आपली वाट चुकली आहे हे जागरुक प्रवाशाच्या ध्यानी यावे , तसे इथे घडते . त्या अलौकिक आत्मशक्तीला आपल्या जीवनाचे ध्येय एका क्षणात गवसते . नानासाहेबांचया बाबतीत असेच झाले . आनंदीबाई बंकट हायस्कूलच्या सेवेत त्यांचा आत्मा रमला नाही आणि दिव्यक्षणी राजीनामा देऊन ३१ डिसेंबर १ ९ ५३ रोजी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ मर्यादित , चाळीसगाव या संस्थेची अधिकृत स्थापना व नोंदणी त्यांनी केली . नोकरी करुन स्वत : चा व स्वत : च्या कुटुंबियांचा उद्धार करणे एवढेच मर्यादित ध्येय त्यांचे नव्हते . ' विद्या विना मती गेली , मती विना गती गेली गतिविना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले , इतके सर्व अनर्थ एका अविद्येमुळे झाले ' हे नानांना माहीत होते , म्हणून त्यांनी सर्वांचा उद्धार व्हावा ह्या हेतूने सहन प्रेरित होऊन प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक , वरिष्ठ महाविद्यालय , तांत्रिक विद्यालय आणि संगणक केंद्र इ . शाखांचा हेका टप्प्याटप्प्याने विस्तार केला . या शिक्षण संस्थेची आज नऊबालक मंदिरे , दोन प्राथमिक शाळा , पंचवीस माध्यमिक शाळा , पाच कनिष्ट महाविद्यालये , एक वरिष्ठ महाविद्यालय , एक अंधशाळा , दोन आश्रमशाळा आणि एक संगणक केंद्र अशा ४६ शाखांचा शिक्षणरुप । वटवृक्ष फोफावला आहे . १ ९ ६० साली तांत्रिक शिक्षण खाजगी संस्थेद्वारा देणारे राष्ट्रीय तांत्रिक विद्यालय त्यांनी सुरु केले , तर मुलींच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय कन्या विद्यालय व कन्या छात्रालयाची स्थापना त्यांनी केली . त्यांच्या सुविद्य पत्नी सौ . सुशीलाताई ह्या अनेक वर्ष राष्ट्रीय कन्या छात्रालयाच्या व्यवस्थापिका म्हणून मोफत कामकाज पाहत आहेत . संत विनोबा भावे यांची भूदान यात्रा चाळीसगाव तालुक्यातून गेली , त्यावेळी १ ९ ५ ९ साली रांजणगाव ते चाळीसगाव आणि चाळीसगाव ते मेहूणबारे अशा पदयात्रेत नाना स्वत : आम्हा विद्यार्थ्यांसोबत सामील झाले . सानेगुरुजींना पाहण्याचे भाग्य आम्हा विद्यार्थ्यांना लाभले नाही , परंतु सानेगुरुजींच्या सर्व कथा व कविता नानांच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळाव्यात , केवळ कथा व कविता यावरच ते थांबले नाहीत तर तसे आचरणही नानांनी केले . ' बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले ' या उक्तीप्रमाणे सर्व जीवन नानांनी व्यतीत करुन आम्हा विद्यार्थ्यांवर संस्कार केले . अंध विद्यार्थ्यांसाठी अंधशाळा सुरु करुन अनेक अंध विद्यार्थ्यांना ज्ञानचक्षू देण्याचे पवित्र कार्य नानांनी केले . त्यांच्यामध्ये स्वावलंबी जीवन जगण्याची नवी उमेद नानांनी निर्माण केली . दररोज मोल मजूरी करणाऱ्या मजूरांसाठी " लोणजे मजूर सहकारी मंडळ " त्यांनी काही वर्ष चालविले . अनेक वर्ष या मंडळाचे ते सदस्य व अध्यक्ष होते . नानांचे आईवडील वारकरी संप्रदायाचे . नानांनी ते संस्कार जीवनभर जपलेत . आम्हा विद्यार्थ्यांची टाळ मृदुंग बरोबर घेऊन पायी दिंडी जनार्दन स्वामींच्या कर्मभूमीत चाळीसगाव ते दौलताबाद एका वर्षी नेली तर दुसऱ्या वर्षी नाथांच्या कर्मभूमीत चाळीसगाव ते पैठण अशी नेली . अध्यात्मिक शिक्षण , गणित व विज्ञानाचे शिक्षण , तांत्रिक शिक्षण , संगणकशास्त्रासारखे प्रगत शिक्षण , नैतिक शिक्षण , श्रमसंस्कार शिक्षण , अंधांचे शिक्षण , मोलमजूरी करणाऱ्यांचे शिक्षण आणि शेतकन्यांचे शिक्षण अशा रीतीने सर्वव्यापी शिक्षण देऊन अनेक आदर्श विद्यार्थी व तरुण नानांच्या सहवासातून , कर्तृत्वातून निर्माण झालेत . ७५ वर्षाच्या आपल्या आयुष्यात भव्यदिव्य असे शैक्षणिक व सामाजिक कार्य त्यांनी केले . कार्य करीत असताना इतर कोणत्याही क्षेत्रात त्यांनी लुडबूड केली नाही , कोणत्याही राजकीय प्रवाहात ते पडले नाही . एकदा चाळीसगावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई आलेत . नानांचे कार्य त्यांच्या कानावर गेले त्यावेळी ते म्हणालेत , पंढरीच्या पांडुरंगाचे आज आम्हाला दर्शन झाले .ही उक्ती किती सार्थ आहे याची प्रचिती नानांच्या कृतीतून प्रत्येकास येते . १ सप्टेंबर १ ९ ५० ते ७ जानेवारी १ ९९ ८ असा ४८ तासाचा कर्तृत्वाचा आलेख , त्यासोबत एक आदर्श विद्यार्थी म्हणून विद्यार्थी दशेचा आलेख . १ ९ ३८ मध्ये जळगाव केंद्रात व्ह . फा . मराठी सातवी परीक्षेस पंधराशे विद्यार्थी बसले होते . त्या विद्यार्थ्यांमध्ये नानासाहेब तृतीय क्रमाकांने उत्तीर्ण झालेत . १ ९ ३८ ते १ ९ ४० या कालावधीत धुळे येथील शेतकी शाळेत शिक्षण घेतले . प्रत्येक वर्षी प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झालेत . विद्यार्थी दशेतच १ ९ ४२ च्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली . त्यामुळे धुळे येथील जेलमध्ये दोन महिने तुरुंगवास . विद्यालयीन शिक्षण बडोदा येथील सयाजी मराठा वसतीगृहात , अर्धनादारीने वसतीगृहाचे कामकाज करुन स्वावलंबनाने पूर्ण केले व १ ९ ४८ मध्ये बी . ए . परीक्षा विशेष उत्तीर्ण झालेत .1 ९ ४८ ते ५० पुणे येथील विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतले . त्यावेळी वसतीगृहाच्या खाणावळीत काम करुन मोफत जेवण्याची सोय करुन घेतली . ही विद्यार्थी दशेजी जाज्वल कारकीर्द म्हणजे त्याग , अहर्निश कष्ट , स्वावलंबन , श्रमप्रतिष्ठा , नैतिकता , प्रामाणिकपणा , चारित्र्य अशा आदर्श जीवनाची यशोगाथाच होय . व्यक्ती मोठी होते स्वकर्तृत्वाने . व्यक्तीचे मोठेपण ती कशासाठी जगली यावर अवलंबून असते . व्यक्तीने समाजाला काय दिले , कोणत्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केले यास अनन्यसाधारण महत्व आहे . नानासाहेबांनी स्वार्थ पाहिलाच नाही . त्यांनी ' स्वअर्थ शोधला आणि त्यातही परमार्थ पाहिला " त्यावर आधारीत संपूर्ण जीवनभर कार्य केले , अशा या कर्मवीर शिक्षण महर्षी व्यक्तीस लाख प्रणाम . दिव्यत्वाची जिथे प्रचिती । तेथे कर माझे जुळती ॥

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा