श्री .नानासाहेबांची व माझी ओळख आणि परिचय गेली जवळजवळ २० वर्षाहून अधिक आहे . अखील भारतीय साने गुरुजी कथामालेचे खजिनदार परंतु मुख्यत : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , चाळीसगाव या संस्थेचे अध्यक्ष म्हणून व अनेक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक असे एक अद्वितीय मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व पहाण्याचे नव्हे अगदी निकटचा परिचय होण्याचे भाग्य मला लाभले . त्याबद्दल मी स्वत : ला खरोखरीच धन्य मानतो .
कथाकथन प्रबोधिनी आणि साने गुरुजी कथामाला यांचे कार्य वृद्धिंगत व्हावे , अनेकांच्या कानापर्यंत हा साने गुरुजींचा संदेश पोहचावा यासाठी अखंडपणे धडपडणारे असे हे धवल व्यक्तिमत्त्व आहे . कथामालेचा कार्यकर्ता आणि विशेषत : साने गुरुजी कथाकथन प्रबोधिनीचा मानद संचालक यादृष्टीने तर त्यांचे या कार्यावरील प्रेम यापेक्षाही आपल्या हाताखालच्या आणि जवळपासच्या कार्यकर्त्यांच्या कानावर , त्यांच्या हृदयापर्यंत हा अमूल्य संदेश पोहोचावा याबद्दल त्यांची कळकळही अनेक प्रसंगातून अनुभवली आहे . चाळीसगाव मध्ये कथाकथन प्रबोधिनीची अनेक शिबीरे झालीत . त्यावेळी ही शिबीरे अतिशय सुव्यवस्थितपणे पार पडावीत याकरीता त्यांची होत असलेली धडपड मी प्रत्यक्ष अनुभवली आहे . त्यांच्या संस्थेत आणि संस्थेबाहेरही अनेकजण अध्यापनाचे काम चांगल्या रितीने करीत आहेत . हे जरी असले तरी नानासाहेबांनी प्रबोधनाच्या मार्गाने या सर्वांना उत्तम कार्यकर्ते बनविले . ही त्यांची विशेष देणगी म्हणावी लागेल . या संस्थेतील शिक्षकांची तेथील विद्यार्थ्याकरीता होणारी धडपड अनुभवल्यानंतर मला तर असे वाटते की , एक सामाजिक कार्यकर्ता एवढे वर्णन श्री . नानांना पुरेसे नाही तर त्यांनी आपल्या परिसरात आणि त्यांच्या संस्थेमध्ये असलेल्या शिक्षक , प्राध्यापक आणि इतरांनाही ' आपणा सारखे करीती तात्काळ ' या उक्तीप्रमाणे या सर्वांना सच्चे कार्यकर्ते बनविले आहेत . ही त्यांची नुसत्या एका जिल्ह्यालाच नव्हे तर सर्व महाराष्ट्राला फार मोठी आणि अनमोल देणगी आहे . अनेक कार्यक्रमातून तर मला हे इतके जाणवले आहे किंबहूना मी हे प्रत्यक्ष मनाने , शरीराने अनुभवले व असून प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे .
विशेष म्हणजे गांधी जीवन दर्शन हा माझा दररोज तीन तास या प्रमाणे तीन दिवस कार्यक्रम चाळीसगावला कथाकथन प्रबोधिनी मार्फत आयोजित केला होता . या तीनही दिवशी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना या प्रास्ताविकातून थोडक्याच शब्दात परंतु अत्यंत योग्य असे कार्यक्रमाचे महत्व विषद करणारे आणि त्यातून राष्ट्रपिता म . गांधींबद्दल त्यांना असलेला अत्यंत आदर ते व्यक्त करीत आणि त्याचवेळी झालेल्या कार्यक्रमाचे मर्म बरोबर ते आपल्या समोरच्या श्रोत्यांवर बिंबविण्याचा प्रयत्न करीत . हे श्रोत्यांच्या मनांमध्ये किती खोलवर पोहचले आहे हे मी अनुभवले आहे . हे माझ्या मनातील नुसते विचार नाहीत तर प्रत्यक्ष त्याचे मला प्रत्यतर आले आहे . कार्यक्रमाचे शेवटी या तीनही दिवस हजर असलेल्या सर्वच श्रोत्यांना मी एक प्रश्नावली दिली होती . येथे पुण्यात आल्यावर श्रोत्यांनी भरुन दिलेल्या प्रश्नावली मी वाचल्या . त्याबद्दल सविस्तरपणे खुप लिहीणेही शक्य आहे . एवढेच नव्हे तर साने गुरुजी कथामालेच्या एका अंकात याबद्दल मी सविस्तरपणे लिहीलेही आहे . उदाहरण म्हणून त्यावेळी श्रोत्यांनी दिलेल्या काही प्रतिक्रीया फक्त नमूद करतो .
१ ) श्री . केळकरांचे तीन दिवस अखंडपणे चाललेले हे बोलणे खरेतर प्रवचन मी ऐकले . गांधीजींच्या चरित्रातील एक वाक्य ते वारंवार उद्धृत करीत होते . ते असे , “ गांधी म्हणतात जी गोष्ट मला अतिशय आवडली आणि अनुकरणीय वाटली ती वाचल्यानंतर माझ्या आचरणात मी ती आणिपर्यंत मला स्वस्थता मिळत नसे . " हे वाक्य मला इतके भावले की व्याख्यानाच्या दुसऱ्याच दिवशी मी दोन निश्चय केले . त्यावेळी माझ्याहातून एखादे गैरकृत्य म्हणता येईल अशी गोष्ट घडली तर माझ्या मनात मनोमन काहीतरी प्रायश्चित घेतले पाहिजे व पुनश्च हे माझ्याकडून घडू नये असे ठरविले .
दुसरे म्हणजे गांधीजी हे सत्य आणि अहिंसेचे मुर्तीमंत प्रतिक त्या सुर्याच्या जवळ जाण्याची माझी कोणती पात्रता म्हणून तिसऱ्या दिवशी मी मनाशी ठरविले की , यापुढे तरी आपल्या आयुष्यात असत्याच्या जवळ जाणारी कोणतीही गोष्ट घडू नये . आणि केळकर सांगत होते दुसऱ्याबद्दल कटू विचार येणे किंवा त्याच्या मनाला दुःख होईल अशी गोष्ट करणे म्हणजे सुद्धा हिंसाच . मला तर वाटते की एवढ्या दोनच गोष्टी जरी माझ्या हातून झाल्या तरी मी स्वत : ला धन्य मानीन .
तसेच महात्माजींबद्दल मी अनेकवेळा ऐकले आहे व वाचले ही आहे परंतु यावेळी केळकरांनी १ ९ २२ च्या अहमदाबादच्या सेशन कोर्टामध्ये चाललेला गांधींवरील आरोपाचा खटला अतिशय नाट्यमय रितीने कथन केला . त्यावेळी ते म्हणाले की , " जगाच्या सुरुवातीपासून अनेक मोठ्या लोकांवर खटले झालेत . त्यांना शिक्षाही झाल्यात . परंतु आज जो खटला मी तुमच्यापुढे सांगणार आहे तो अद्वितीय आहे . आपणास माहिती आहे की , कोर्टात सर्व वकिल वर्ग खटला सुरु असतांना ऐकायला येवू शकतो . आणि हा तर गांधीजींसारख्या महात्म्यावर असलेला राजद्रोहाचा खटला . तो ऐकण्याकरीता अनेक वकील हजर होते . न्यायाधिश मि.ब्रुमफिल्ड । हे कोर्टात आलेत आणि आता कैद्याला कोर्टात आणायचे तर कोर्टात कैद्याला कैद्याच्याच पोशाखात आणतात अशी पद्धत परंतू यावेळी आरोपीने मात्र आपल्या कमरेला पंचा , पायात खडावा . हातात आधारासाठीची काठी , डोळ्याला चष्मा अशा पोशाखात आरोपिला आणण्यात आले . आरोपीला कोर्टात आणल्यावर प्रथम न्यायालय मि.ब्रुमफिल्ड उठुन उभे राहिले . त्यानंतर सरकारी ब्रिटीश वकीलह उठून उभे राहिले . मित्रांनो आरोपी कोर्टात येतो न्यायाधिशासह सर्व वकीलवर्ग उभा राहतो अशी घटना अद्वीतीय होय कारण हा आरोपी होता" राष्ट्रपिता जगत्वंद्य महात्मा गांधी "
जगाचा इतिहास सर्व मला माहीती आहे असे मी मानीत नाही परंतु आरोपी कोर्टात पाऊल टाकतो आणि न्यायाधिशासह सर्व कोर्ट उभे राहते अशी गोष्ट जगाच्या इतिहासात केव्हा आणि कुठे झाली असेल याचा शोध घ्यावा लागेल .
गांधींवरील आरोपपत्र वाचून दाखविल्या नंतर गांधी म्हणाले " मला माझ्यावरील सर्व आरोप मान्यच आहेत . ब्रिटीश सत्तेबद्दल अप्रियता निर्माण करणे याचे मला जवळजवळ वेडच लागले आहे येथून बाहेर पडल्यावर मी हेच करणार आहे . " हे ऐकल्या न्यायाधिश संतापायला पाहिजे होते . परंतु तसे न होता गांधीजींना शिक्षा जाहीर करण्यापूर्वी न्यायाधिश म्हणाले आपल्या सारखा माझ्या समोर आरोपी म्हणून आलेला माणूस दुसरा नाही व येणारही नाही . तुम्ही गुन्हा मान्य केलाच असल्यामुळे माझे काम तुम्ही सोपे केले आहे.
कायद्याप्रमाणे याच देशांमध्ये झालेल्या दुसया एका राजद्रो हाच्या खटल्यात ( टिळकांच्या) त्यावेळी त्यांना न्यायाधिशांनी दिलेली शिक्षा ६ वर्षे कारावासाची तुम्हाला फार्मावितो परंतु परिस्थिति बदलली व तुमची ही शिक्षा शासनाने कमी केली तर माझ्या इतका आनंद जगात कोणालाही होणार नाही.
गांधीजींच्या जीवनातील एक अपूर्वाईचे नाट्यच आपण पहात आहोत असे मला वाटले आणि नानांची गुणग्राहकता इतकी की त्यांनी याचे यथार्थ वर्णन समारोपाच्या भाषणात केले.
नानासाहेब रोज आपल्या प्रास्ताविकाच्या भाषणात म्हणत होते की,केळकरांची प्रकृती फारशी बरी नाही.अशा स्थितीत गांधी चरित्र सांगणे त्यांना फारच अवघड आहे.
मी ईश्वराला अशी प्रार्थना करतो की , नानासाहेबांना किमान १०० वर्षे तरी आयुष्य लाभावे . त्यांची ही अमृतवाणी अनेकांपर्यंत पोहोचावी . माझ्या हृदयात तर तिने कायमचेच स्थान मांडले आहे . मला अजूनही चांगले स्मरते की , त्यावेळी नानासाहेबांचे डोळे हे प्रसंग ऐकत असताना पाणावत होते . गांधी जीवनावर मी आजपर्यंत २० ते २५ ठिकाणी कार्यक्रम केलेत . एवढेच नव्हे तर अमेरिकेतही काही कार्यक्रम केलेत . परंतु चाळीसगाव येथील कार्यक्रम आणि त्याचे सुत्रसंचालन करणारे नानासाहेब चव्हाण यांचे विस्मरण होणे शक्य नाही . शिक्षकांनी लिहीलेल्या या थोडक्याच परंतु बोलक्या प्रतिक्रिया मी याठिकाणी सांगितल्या यावरुन नानांच्या हाताखाली तयार झालेले कार्यकर्ते कोणत्या दर्जाचे असतात याचे चांगलेच प्रत्यंतर मला आले .
असे हे आमचे नानासाहेब चव्हाण अत्यंत साधे दिसणारे व तसेच आचरण करणारे व्यक्तिमत्त्व , सद्गुणांचा सागर असेच त्यांचे वर्णन करता येईल . असे नाना आज त्यांच्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत . त्याचा मला मोठा आनंद आहे . या शुभप्रसंगी त्यांना दीर्घआयुष्य लाभो अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा