मुख्य सामग्रीवर वगळा

अबोल परंतु कर्तबगार व्यक्तीमत्व(श्री.द्वारकानाथ लेले संयुक्त कार्यवाह,साने गुरूजी कथामाला,पत्रकार नगर,पुणे-16)


  वेश असावा बावळा , परि अंतरी नाना कळा , अशी मराठीत एक म्हण आहे . त्यात थोडा बदल करुन ' वेश असावा साधासुधा , परि अंतरी नाना कळा ' अशी म्हण श्री . नाना चव्हाण यांच्या बाबतीत पूर्णपणे लागु पडते . नाना म्हणजे मूर्तीमंत सौजन्यमूर्ती , अंगात खादीची गांधी टोपी , शर्ट आणि धोतर तेही अगदी स्वच्छ . बोलणे गरजेपुरते . ज्याला नानांची कर्तबगारी माहिती नाही त्यांचा नानांविषयी प्रथमदर्शनी गैरसमजच होईल . एक अगदी सामान्य माणूस असेच त्याला वाटेल . पण नानांची कर्तबगारी समजल्यावर तो निश्चित नतमस्तक होईल . मी . स्वत : साने गुरुजींना प्रत्यक्षात पाहिले नाही . परंतु त्यांची छायाचित्रे पाहीली , खूप वाचले , ऐकले . त्यावरुन मलातरी साने गुरुजी आणि नाना चव्हाण यांच्यात कमालीचे साम्य वाटते . श्री.नाना चव्हाण यांचा जीवनपट थक्क करणारा आहे . अगदी प्रतिकुल परिस्थितीतही केवळ जिद्दीच्या जोरावर नानांनी केवढेतरी मोठे यश प्राप्त केले आहे . पण नानांचा मोठेपणा असा की याचा लवलेशही त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसत नाही . नानांनी जे रोपटे लावले त्याचा आज महावृक्ष झाला आहे . म्हणजे एका दृष्टीने नानांचे एक शैक्षणिक साम्राज्यच आहे . पण नाना सम्राट म्हणून वागत नाहीत . हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे . आजकाल महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशी शैक्षणिक साम्राज्य उभी राह्यली आहेत आणि त्याचा फायदा घेऊन अनेकजणांनी राजकीय पदे प्राप्त केली आहेत . पण नानांनी हे केले नाही  म्हणून ते मोठे . नानांचा जीवनपट पाहीला तर एक गोष्ट प्रकर्षान दिसते की नाना कधीही सत्तेच्या किंवा संपत्तीच्या मागे लागले नाहीत . तर त्यांनी सदैव सामाजिक / विधायक कार्याचीच कास धरली . श्री . नाना चव्हाण यांचा डोळ्यात भरणारा मोठा गुण म्हणजे मितभाषीपणा . मी आजवर अनेकदा नानांना भेटलो . पण नाना चकाट्या पिटतायेत असे कधीच दिसले नाही . ते आवश्यक तेवढच आणि तेही मोजक्या शब्दात बोलणार . श्री . नाना स्वत : शिक्षक होते . त्यांनी गेली ४३ वर्षे चाळीसगावची राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था यशस्वीपणे चालवली . अनेक सहकाऱ्यांकडून मोठमोठी कामे करुन घेतली . हे सर्व नानांना कमी बोलून कसे करता आले याचे मला आश्चर्य वाटते . वास्तविक एवढा पसारा सांभाळताना अनेकदा संघर्षाचे , वादावादीचे प्रसंग नक्की आले असणार . अशा स्थितीत मितभाषी नानांनी या प्रसंगावर कशी मात केली असेल याचे मलातरी गुढ आहे . नानांनी स्वत : अनेक विधायक उपक्रम केले . ते संस्थेतही आणले . इतरांना केवळ आदेश न देता स्वत : कृती करण्याच्या नानांच्या वागण्यातून त्यांनी संघर्षाचे प्रसंग टाळले असावेत , इतरांना कार्यप्रवृत्त केले असावे असे वाटते . श्री . नाना चव्हाण यांचा आणि माझा संबंध आला तो साने गुरुजी कथामालेच्या कार्यातून . त्यांच्या समवेत कार्यकारिणीच्या सभा , वार्षिक अधिवेशने , कथाकथन , प्रशिक्षण शिबिरे आणि भूकंपग्रस्त भागातील भाव जागरण दिंडी अशा विविध प्रसंगी नानांचा सहवास लाभला . या प्रत्येकवेळी त्यांचे अस्तित्व म्हणजे अतिशय शांतपणे स्वत : जळत इतरांना प्रकाश देणाऱ्या नंदादीपाप्रमाणे असायचे . ते कोणत्याही वादात भाग तर घेत नसतच . उलट वाद टाळण्याचा प्रयत्न करायचे . श्री.नाना चव्हाण यांची राहणी अतिशय साधी आहे . मित आहार व स्वावलंबन यामुळे आज पंचाहत्तरीतही त्यांची प्रकृती कार्यक्षम आहे . अशीच प्रकृती व दीर्घायुष्य त्यांना लाभो आणि त्यांच्याकडून खूप सामाजिक कार्य होवो ही सदिच्छा .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक अनावृत्त पत्र(वा.रा.सोनार,अमळनेर)

  माननीय श्री . नानासाहेब यशवंतराव चव्हाण ,        सा.न.वि.वि.   आपल्या अमृत - महोत्सवी वर्षासाठी माझे मन : पूर्वक अभिवादन . याचवेळी आपणास 'नंदिनी ' पुरस्कार प्राप्त झाला आहे हा एक अमृत योगच म्हणायला हवा . कथामालेचा पुरस्कार आपणास मिळावा याचा आनंदच आहे . एका संपन्न , दीर्घोद्योगी , तपस्वी , ऋषीतुल्य पण तरीही आमच्या जगातल्याच एका माणसाचा हा गौरव होत असतांना आपण मुळीच हुरळून जाणार नाही याची खात्री आहेच , पण आम्ही तुमचे चाहते हुरळून गेलो तर तुम्ही आम्हाला क्षमा करा . आपल्याला ते रुचायचे नाही कदाचित् पण आमच्या आनंदाला तुम्ही वेसण घालणार नाही याचीही खात्री आहे . अशावेळी आपल्या मनातली कृतार्थ भावना डोळ्यातून ओसंडून देतांना तुम्ही अजून किती क्षितिजं पार करायची आहेत याचीही स्वप्नं डोळ्यातून पाखरांसारखी उधळून लावाल असे वाटत राहाते .       नाना , आपल्याला थोरल्या प्रेरणांनी आयुष्यात एवढे बळ दिले हे समजून घेतांना आश्चर्य वाटते . दारिद्रयाशी झुंज घेतांना माणसे थकून जातात , कालांतराने विझून जातात , जिवंत राहिलीच तर किमान कडवट होतात हे आम्ही पहात आलो ...

कर्मयोगी - आदरणीय नानासाहेब य.ना.चव्हाण इतिहासाचा मी एक साक्षीदार(अँडव्होकेट श्री.सदाशिवराव रा.देशमुख,चेअरमन,श्री.गो.से.हायस्कूल कमेटी,पाचोरा)

   ज्यांचा आदर्श जीवनात घ्यावा, ज्यांच्या कर्तृत्व गुणांपुढे नतमस्तक व्हावे , ज्यांनी समाज जीवनात वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त केले आहे, ज्यांचा आधार, आश्रय आशीर्वादामुळे माझ्या जीवनाची जडणघडण झाली त्या अशा अनेक आदरणीय व्यक्तींपैकी एक आहेत श्री नानासाहेब य.ना. चव्हाण जो मी आज येथे आहे तेथे मला मिळालेल्या यश ,प्रतिष्ठेतील श्रेयात  वंदनीय नानासाहेबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल.     भूतकाळाकडे वळून बघतो तेव्हा आठवतो सन १ ९ ६० चा काळ , माझी ज्ञानार्जनाची दुर्दम ज्ञानलालसा परंतू तितकीच घरची विपन्नावस्था . माननीय नानासाहेबांनी स्थापन केलेल्या , ' राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळा'च्या माध्यमिक विद्यालय तळेगाव शाखेत सन १ ९ ६० मध्ये अध्यापक म्हणून नोकरीची संधी दिली नसती तर जीवनातील महत्वाकांक्षेचे तारू दिशाहीन अवस्थेत कोठेतरी भरकटत जावून आदळले असते . त्यांनी दिलेल्या आधार व प्रेरणेमुळे जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली . काळाच्या ओघात प्रयत्न व दैवामुळे जीवनात स्थित्यंतरे होत गेलीत.अध्यापनासह अध्ययन करत पदवीधर झालो.सन 1960 मध्ये संस्थेच्या माध्यमीक विद्यालय तळेगा...

'आहे तरी सर्वाठायी,पाहो जाता कोठेची नाही!'-सुशिलाताई चव्हाण.(प्रा.सौ.अनिता नाईक,राष्ट्रीय कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव)

   ' There is always a lady      behind every successful man ' .       " प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे नेहमीच एक ' स्त्री ' असते " . या उक्तीची सत्यता पटते ती मा . नानासाहेबांच्या सहचारिणी सौ . सुशीलाताईंचा संपुर्ण जीवनपट नजरेसमोर आणल्यानंतरच . राष्ट्रीय शिक्षण संस्था म्हटली की , उत्तर एकच येते मा . नानासाहेब तथा य . ना . चव्हाण ! संस्थेस स्थापनेपासून तो तिला आजचे संपूर्ण , विकसित व विस्तृत स्वरूप प्राप्त करून देण्यास केवळ श्री . नानासाहेबांचे नेतृत्व व मार्गदर्शनच कारणीभूत आहे , हे त्रिकालाबाधीत सत्यच आहे . परंतु त्यांनी लावलेल्या रा.स.शि.प्र.मं. च्या इवल्याशा रोपाचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरीता त्यांना सतत जी प्रेरणा दिली ती त्यांच्या धर्मपत्नी , ' सौ . सुशीलाताई चव्हाण यांनीच .     नाशकांतील कै.श्रीपतराव गायकवाड व लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या सुसंस्कृत कुटुंबात सौ . सुशीलाताईंचा जन्म झाला . तीन बहिणी आणि तीन भाऊ असे हे मोठे कुटुंब , त्यात सर्वात मोठी लीलाताई . भावंडामध्ये मोठं असलं की आपोआपच लहान्याचं सर्व काही करण्याची...