मुख्य सामग्रीवर वगळा

श्री. नानासाहेब य.ना.चव्हाण जीवन व कार्यपरिचय(श्री.यशवंत बळवंत क्षीरसागर,संपादक,'बालविकास',मुबंई)1

  आई वडिलांच्या ममतेने नानासाहेबांवर सतत प्रेम करणारी व त्यांच्या जीवनाला सार्वजनिक कार्यासाठी प्रेरणा देणारी थोर व्यक्ती म्हणून त्यांचे चुलते कै.हरिभाऊ चव्हाण यांचा निर्देश करावा लागेल.हे कट्टर गांधीवादी व विनोबावादी विधायक कार्यकर्ते होते.गांधीजींच्या आदेशानुसार ग्रामीण भागातून ते स्वदेशी प्रचार ,सामाजिक विषमते विरूध्द वैचारीक जागृती करित.ऋषितुल्य,त्यागमय,सेवाभावी जीवन व्यतीत करीत.भारतीय स्वातंत्र्या साठी लढणारया काँग्रेसचे ते निष्ठावान पाईक होते.1936 साली फैजपूर येथे भरलेल्या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनात त्यांनी स्वयंसेवी वृत्तीने खुप कामही केले होते.श्री. नानासाहेबांच्या जीवनात आज आढळणारी राष्ट्रीयवृत्ती,देशप्रेम ,सेवाभाव,स्वावलंबन,साधी व शुद्ध राहणी ही कै.हरिभाऊच्या जीवनातून त्यांना मिळालेली सदगुण संपत्तीच होय.
         रांजणगाव येथे प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवतांना छोट्या नानासाहेबांच्या जीवनावर दोन बहुमोल संस्कार घडले.आई-वडिलांना मदत म्हणून केलेल्या शेती व्यवसायामुळे त्यांच्या जीवनात श्रम-प्रतिष्ठेचे बीज पेरले गेले. तसेच शाळेभोवतालच्या  सुंदर बागेच्या जोपासनेने निसर्गावर प्रेम करण्याची आवड जागृत झाली.
     स्वावलंबन हे तर नानासाहेबांच्या जावनाचे आधारभूत ठरलेले प्रमुख जीवन सुत्रच होय.म्हणून दरमहा 1 रूपया पगारावर गावातील टपालवाटपाचे काम त्यांनी आवडीने केले होते.अध्ययनाच्या बाबतही विद्यार्थीदशेत ते कधी मागे राहीले नाहीत.लहानपणापासून शिक्षणा विषयीची आवड व जिज्ञासा  सातत्याने टिकून राहिल्यामुळे 1938 साली   व्हर्नाक्यूलर फायवलच्या  परीक्षेत जळगाव केंद्रात नानासाहेब सुमारे 1500 विद्यार्थ्यामध्ये तिसरया क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकले.नानासाहेब सारख्या कोणत्याही सर्वसाधारण बुद्धिमान विद्यार्थ्यांना   व्हर्नाक्यूलर      फायनल नंतर इंग्रजी शिक्षणाचा   मोह   होणे स्वाभाविक होते.परंतु त्या काळात गांधीजींनी सुरू केलेल्या राष्ट्रीय चळवळीचे संस्कार व चुलते कै. हरिभाऊ  चव्हाण  यांच्या कडून मिळालेल्या देशभक्तीचा वारसा यांच्या बळावर त्यांनी एक कठोर निर्णय घेतला व आधुनिक पद्धतीने आदर्श शेती करून सार्वजनिक कार्यात भाग घ्यावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 1938 मध्ये धुळे येथील शेतकी शाळेत त्यांनी प्रवेश मिळविला.
   शेती शाळेत सकाळच्या न्याहरी नंतर शेती कामाची प्रात्यक्षिके सुरू होते तेव्हा नानासाहेब  झपाटल्या सारखे तन्मयतेने व एकाग्रतेने काम करीत.स्वतःचे काम संपवून इतर विद्यार्थ्यांनाही मदत करू लागत त्यामुळे अगदी सहजतेने विद्यार्थीवर्गात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली होती व अध्यापकांनाही त्यांच्या विषयी कौतुक वाटे.1938 ते 40 या दोन्ही वर्षांत नानासाहेब शेती शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकले यात आश्चर्य नाही.
     धुळे येथे असतांना नानासाहेबांचे तेथील प्राणीरक्षक संस्थेच्या वाचनालयाशी जवळचे संबंध आले त्यामुळे त्यांचे खूप ग्रंथांचे वाचन घडले.इंग्रजी भाषेतील उदारता व प्रगल्भता ध्यानात घेऊन त्यांच्या मनातील इंग्रजी शिक्षणाविषयीची अनास्था दूर झाली . कोणत्याही शिक्षणाला कसल्याही प्रकारचे बंधन नसते.
विशेषता मानवी विकासासाठी ज्ञानाची निश्चित आवश्यकता असते याची जाणीव होऊन त्यांनी स्वतःचे जीवन व कार्य अधिक परिपुष्ट करावी असा संकल्प केला.
   शेती शाळेतील अभ्यास पूर्ण झाल्यावर  ते इंग्रजी शिक्षणाकडे  वळले .उपजात कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे धुळे येथील गरुड स्कूलमध्ये थेट इंग्रजी चौथीच्या परिक्षेला बाहेरून बसण्याचे धाडस त्यांनी दाखविले व ती परीक्षा 1941 साली ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.                                                  नानासाहेबांच्या  धुळ्यातील वास्तव्यात  त्यांच्या सहकारी विद्यार्थी मित्रांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा इतका उत्तम प्रभाव पडला होता की,इयत्ता  चौथीनंतर सतत चार वर्षे त्यांच्या दररोजच्या भोजनाची विनामूल्य सोय विद्यार्थी मित्रांनी अगत्यपूर्वक केली होती.हे वर्तमान काळातील आश्चर्यच म्हणावे लागेल . नानासाहेबांच्या याच अंगीभूत गुणांन   मुळे या प्रदीर्घ कालावधीत त्यांच्या रात्रीच्या निवासाची सोय कै.अ.स.टोणगांवकर यांच्या सहकार्यामुळे  धुळे देवपूरच्या  स्वोध्दारक  वसतीगृहात विनामुल्य होऊ शकली हे सुद्धा नमूद करण्याजोगे आहे. या विद्यार्थी वर्गाच्या गुरूजनांच्या ऋणांचे विस्मरण त्यांना कधिच होऊ शकत नाही.तसेच उन्हाळ्याची व दिवाळीची अशी मोठी सुट्टी शाळेला लागली की नानासाहेब अभंग ,ओव्या गात धुळे ते रांजणगाव असा चाळीस मैलाचा प्रवास पायी करीत.या मधून त्यांची कष्टाळू व धार्मिक वृत्ती सहज जाणवते.
     1942चे साल हा नानासाहेबांच्या जीवनातील क्रांतीकारक काळ म्हणावा लागेल.9 आँगस्ट 1942 रोजी गांधीजींनी अंतिम स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकले तेव्हा भातर देश आसेतू हिमाचल जागृत झाला होता.नानासाहेबांच्या जीवनात लहानपणापासून गांधीजीमविषयी परमोच्च आदरभाव असल्यामुळे ते दरवर्षी शेतकी शाळेतमुख्याध्यापकांच्या ुपरवानगीने उत्स्फुर्तपणे गांधी जयंती साजरी करीत.मुलांना त्यांच्याविषयी आदर वाटे. तर काही व्रात्य मुले उपहासाने 'बापूजी' म्हणून ही हाक मारीत.पुढे हीच  उपाधीआदरार्थी झाली.1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढल्या बद्दल त्यांना धुळे येथे दोन महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा झाली.या तुरूंगवासाचा नानासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये व त्यांची शिक्षा टळावी म्हणून त्यांनी सरकारजवळ माफीपत्र द्यावे अशी सुचना सद् भावनेने पोल्ट्री फार्मचे मॅनेजर श्री ब.प.साळुंखे व धुळे येथील जेष्ट सामाजिक कार्यकर्ते डाॅ.दादासाहेब घोगरे यांनी नानासाहेबांना केली होती.परंतु ही सूचना मान्य होणे नानासाहेबांच्या स्वाभिमानी स्वभावाला सुतराम शक्य नव्हते. 
   तुरूंगातून सुटल्यानंतर नानासाहेबांनी काही काळ भूमिगत राहून कार्य केले व कालांतराने पुनश्च शिक्षणाला प्रारंभ केला.1944 साली ते मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले.

  बडोदे संस्थानात गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या 
विशेष सवलती असल्यामुळे नानासाहेबांनी मॅट्रिकनंतर तेथील 
महाविद्यालयात जाण्याचा निश्चय केला .तेथे गेल्यानंतर रावपुरा रोडवरील सुर्य नारायण मंदिराभोवतालच्या बागेतिल एका 
बाकाखाली आपली वळकटी ठेवली व नंतर ते कुठे काम मिळते का म्हणून शोधात राहिले.योगा योगाने  त्यांना सयाजी मराठा वस्तिगृहाचा पत्ता मिळाला.त्याचवेळी तेथील एका पोलिसाने त्यांना तेथे आपली वळकटी अधिक काळ ठेवण्यास मनाई केली . म्हणून वळकटी सह ते बाहेर पडले आणि सयाजी मराठा वसतिगृहात गेले.तेथे त्या वेळी वसतिगृहाचे कामकाज पाहणाऱ्या सेक्रेटरीस अर्धनादारी  ची  सवलत होती तिचा फायदा घेण्यासाठी त्यांनी वसतिगृहाची सेक्रेटरी पदाची निवडणूक लढविण्याचे ठरवले. सदर वसतिगृहात त्यापूर्वीच्या सेक्रेटरी बद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असंतोष होता .याचा परिणाम म्हणून नानासाहेब विद्यार्थ्यांच्या मतदानाने वसतिगृहाचे सेक्रेटरी म्हणून निवडले गेले.1944 साली नानासाहेबांना तेथील सयाजी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. बडोदा येथील वास्तव्यात ते वसतिगृहाचे भोजन चिटणीस म्हणून काम पाहात असतांना एकदा स्वयंपाक करणाऱ्या आचारी महिला तेथील विश्वामित्री नदीला पुर आल्यामुळे कामाला येऊ शकत नव्हत्या.काही सहकाऱ्यांसोबत घेऊन त्यांनी स्वयंपाक करून विद्यार्थ्यांना जिव्हाळय़ाने खाऊपिऊ घातले.  वसतिगृहाचा असा नियम होता की,विद्यार्थ्यांना संध्याकाळच्या जेवणात दूध भाकरी दिली जायची.या साठी लागणारे दूध स्वत: नानासाहेब अत्यंत प्रामाणिक पणे ,न्यायपूर्ण रितीने वाटत असत.तसेच भाजीपाला,किराणासामान खरेदी करणे,कोठी सांभाळणे ,विद्यार्थ्यांकडिल फीचे पैसे वसूल करणे इ. सर्व हिशेब अतिशय चोख ठेवत.यामुळे विद्यार्थ्यांचे प्रेम व आदर त्यांना सहज प्राप्त झाला.या मन:पूर्वक व चोख केलेल्या कामामुळे या पदावर ते सतत चार वर्ष राहिले व मिळालेल्या सवलती मुळे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.
      एकदा बडोदा येथील महाविद्यालयात एका प्राध्यापकाला त्रास देण्याच्या हेतूने नानासाहेबांच्या वर्गातिल काही व्रात्य विद्यार्थ्यांनी कोंबडीची पिसे,हाडे,अंड्याची टरफले इ. वस्तू टेबलावर ठेवल्या .प्राध्यापक वर्गावर आल्यानंतर हे दृश्य पाहून फारच नाराज झाले.त्यांनी अगदी शांतपणे विद्यार्थ्यांना आवाहन केले की ज्यांनी ही घाण टेबलावर टाकली असेल त्यांनी ती प्रामाणीकपणे उचलून बाहेर टाकावी .त्या वेळी एकाही विद्यार्थ्याने आपली चूक कबूल केली नाही.त्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांना आवाहन केले की ,ज्यांना ही धाण उचलणे कमीपणाचे वाटत नसेल त्यांनी ती बाहेर फेकावी.अशावेळी स्वत: नाना साहेबांनी प्राध्यापकांच्या शब्दाचा मान ठेवून व विद्यार्थ्यांचा रोष पत्करून आपल्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरून टेबल स्वच्छ केला.
  "विघ्नै: पुन: पुनरपी प्रतिहन्यमाना:
 प्रारब्धं उत्तमजना: न परित्यजन्ति" या उक्तिनुसार कितिहीअडचणी किंवा संकटे ,उपहास वाट्याला आला ,तरी आपल्या सद्सद्   विवेकबुद्धीला स्मरूनच सुरू केलेले कार्य पूर्णपणे तडीस नेण्याचे बाळकडू जणू नानासाहेंबाना मिळाले आहे.
  सयाजी मराठा वस्तिगृहात सेक्रेटरी असतांना अर्धनादारीच्या सवलतीने व जळगांव येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेतून कर्जरूपाने मिळालेल्या आर्थीक मदतीच्या बळावर आपले बडोदा येथील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्यांनी 1948 साली बी.ए.ची पदवी संपादन केली.
    15 आँगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा काळ क्रांतिवीरांच्या व देशभक्तांच्या कर्तृत्वाने भारावलेला ,मंतरलेला असा होता.राजकिय व सामाजिक क्षेत्रात वावरणारया अनेक कार्यकर्त्यांनी कायदयाचे ग्यान प्राप्त केलेले दिसून येत होते.साहजिकच आपणही कायद्याचा अभ्यास करावा आणि स्वत:ला एखाद्या सार्वजनिक कार्यात झोकून द्यावे या हेतूने नानासाहेबांनी पुण्याला येऊन लाॅ काॅलेज मध्ये प्रवेश मिळविला.
    खरंतर नानासाहेबांच्या घरची आर्थीक परिस्थिती अतिशय बेताची होती.बी.ए. नंतर मुलाने एखादी चांगली नोकरी करून पैसा मिळवावा व कुटुंबाचा चरितार्थ चालवावा हे स्वप्न सर्वसाधारण पालकांप्रमाणे त्यांचे आईवडीलही पहात होते.परंतु या भावनाही नानासाहेबांना अडवू शकल्या नाहीत.पुढेही जीवनात अनेक वेळा जेव्हा अशा प्रकारच्या कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या तेव्हा त्यांच्यातील ध्येयवादाने त्यावर मात केलेली दिसते.
       पुण्यात सुध्दा कुणाचिही ओळख नाही,जेवणाची,निवासाची व्यवस्था नाही,शहरी वातावरण.पण या अडचणी नानासाहेबांना निराश वा दु:खी करू शकल्या नाहीत.धुळ्याच्या पोल्ट्री फार्मचे मॅनेजर श्री .साळुंखे यांची नुकतीच पुण्याला बदली झाली होती.सुरूवातीच्या काळात नानासाहेबांची त्यांच्याकडे तात्पुरती व्यवस्था झाली.परंतु कायद्याचा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असल्यामुळे जेवणाची व राहण्याची कायम स्वरूपि व्यवस्था होणे जरूरीचे होते.योगायोग असा की ,त्यावेळी पुण्यातिल प्रसिद्ध समाजसेवक व "नवा झंकार" चे संपादक कै.पु.रा.भिडे यांनी आपल्या कडे एक सवर्ण व एक अस्पृश्य अशा दोन विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची विनामुल्य सोय स्वत:च्या घरी करण्या बाबत आपला मनोदय जाहीर केला होता.ही माहीती मिळाल्या मुळे अर्थातच नानासाहेबांना खूप आनंद झाला व ते इतर विद्यार्थ्यां सोबत कै.भिडे यांच्या कडे मुलाखतीला गेले असता बरयाच संवर्ण विद्यार्थ्यामधून त्यांनी नानासाहेबांची निवड केली.ती त्यांच्या मधिल गुणांची पारख करूनच.नानासाहेबांची एक फार मोठी अडचण दूर झाली.मात्र ते आपली वळकटी घेऊन कै.भिडे यांचे सोबत त्यांच्या निवासस्थानी  गेले असता एक वेगळा अनुभव आला.कै.पु.रा.भिडे यांना काही कौटुंबीक अडचणींन मुळे या दोन्हीं विद्यार्थ्यांची केवळ निवासाची व्यवस्था  करणे सोयीचे होते.या मुळे भोजनाचा प्रश्न पुन्हा अनुत्तरीतच राहीला.पण नानासाहेबांची परमेश्वरावरील प्रगाढ श्रध्दा अशा आलेल्या संकटांना खंबीरपणे  तोंड द्यायला समर्थ ठरली.पोटाचा प्रश्न सुटल्याशिवाय कायद्याचा अभ्यास करणे केवळ अशक्य होते.ही बिकट समस्या सोडवण्याच्या हेतूने विचारपूर्वक एक खुलासेवार पत्र लाॅ काॅलेजच्या वसतीगृहाचे त्यावेळचे रेक्टर प्रा.पंडीत यांना लिहून आपली समस्या त्यातून कथन केली व वसतीगृहातील खानावळ चालकाकडे काम मिळवून देण्याची विनंती केली.आश्चर्य असे की,ते पत्र वाचून रेक्टर प्रा.पंडीत अतिशय प्रभावित झाले व नानासाहेबांना भेटायला शुक्रवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात पत्र्यांच्या खोलीत प्रत्यक्ष दाखल झाले.प्रा.पंडीतांना पाहून नानासाहेबांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना .जगात अशीही उदार,नम्र वकनवाळू माणसं असू शकतात याची जाणीव त्या दिवशीनानासाहेबांना झाली.रेक्टर पंडीतांनी च्यांची संपूर्ण विचारपूस केली.त्यावेळी त्यांना नानासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचा एक आगळा वेगळा पैलू नकळत निदर्शनास आला.तो म्हणजे अध्यात्माची आवड.ग्यानेश्वरीतील महत्वाच्या सुंदर ओव्यांचे टिपण त्यांनी एका वहीत करून ठेवले होते आणि नेमकी तीच वही प्रा.पंडीतांच्या हाती लागली.नानासाहेबांचा ग्यानेश्वरीचा व पर्यायाने संत वाङमयाचा व्यासंग सदर वहित प्रतिबिंबीत झाला होता.साहजिकच  प्रा.पंडीत या गुणांनी प्रभावीत झाले व त्यांनी वसतीगृहाच्या खानावळ चालकाशी बोलणी करून खानावळीत नानांनी पडेल ते काम करावे व रोजचे दोन्ही वेळचे भोजन विनामुल्य त्या बदल्यात घ्यावे अशी व्यवस्था केली.एल.एल.बी.होईतो ती कायम राहीली.नानासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे आपल्या पासून कुणाला त्रास होऊ नये याची ते सतत दक्षता घेत असत.याचे एक उदाहरण सांगायचे झाल्यास भिडयांच्या शुक्रवारपेठेतील वाड्या पासून लाॅ काॅलेज पर्यंत बरेच अंतर होते.एके दिवशी वसतिगृहातिल खानावळीतील कामे आटोपून वाड्यावर येण्यास बरीच रात्र झाली.सर्वत्र निजानिज झाली होती.वाड्याचा मुख्य दरवाजा नियमां प्रमाणे वेळीच बंद झाला होता.अशा वेळी आपल्या मुळे इतरांच्या झोपेत व्यत्यय नको या हेतूने कुणालाही झोपेतून न उठवता नानासाहेब आल्या पावली परत फिरले व संबध रात्र पर्वतीच्या मंदीरात काढून दुसरया दिवशी सकाळी ते वाड्यात दाखल झाले.संतवाङमयाच्या अध्ययनाने संताच्या अंतकरणाची मृदूता नानासाहेबांना अभावितपणे प्राप्त झाली आहे.
 अशा प्रकारे अनेक आघात-प्रत्याघात सहन करीत 1950 साली नानासाहेबांनी पुण्यातील कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.परंतु वकिलीचा व्यवसाय करून पैसा मिळविण्याचा मनोदय नसल्यामुळे त्यांनी सनदीची परिक्षा उत्तीर्ण होऊनही सनद स्वीकारली नाही.पैसा हा व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात कितीही आवश्यक असला तरी पैशाचा मोह नानासीहेबांच्या जीवनात कुठे ही आढळून येत नाही! गांधी- विनोबांच्या शिकवणीचा कदाचित हा परिपाक असू शकेल.                          कायद्याचा अभ्यास पूर्ण झाल्यावर नानासाहेबांनी चाळीसगांव येथिल बंद पडलेल्या राष्ट्रिय वसतीगृहाचे 1 संप्टेंंबर1950 रोजी पुनरूज्जीवन करून आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा शुभारंभ केला.
     1951 साली त्यांनी त्यांनी चाळीसगांव येथील आनंदीबाई बंकट हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारून  अध्यापनाला सुरूवात केली व लवकरच विद्यार्थी-प्रिय शिक्षक म्हणून लौकीक प्राप्त केला.तास सुरू होताच वर्गात हजर राहणे,शिकवितांना विद्यार्थ्यां मध्ये रमणे ,गोष्टीं व समर्पक उदाहरणा  द्वारा मुलांना शालेय विषय समजून देणे ही नानासाहेबांची अध्यापनाची हतोटी होती.सहाजिकच मधल्या सुट्टीत देखिल ते विद्यार्थ्यांच्या गराड्यात असत.
    शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना पैसे खर्च करून सहलीला जाणे शक्य नसते. म्हणून विद्यार्थ्यांच्या कमी खर्चाच्या पायी सहलीवर नाना साहेब भर देत. चाळीसगाव ते नागपूर,वेरूळ,दौलताबाद,औरंगाबाद,पैठण ई.अनेक ठिकाणि पायी सहलींचे आयोजन करीत.यानंतर लांबच्या असले तरी सगळ्यांच्या उत्साहाने सहज पार होत असे. नानासाहेबांचा अशी सहल आयोजित करण्या मागचा दृष्टीकोन मुलांची निसर्गाशि ओळख व्हावी,धिटपणाअंगी यावा,स्वावलंबन अंगवळणी पडावे असा असायचा.त्यांनी एकदा चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवीची काढलेली सहल खरोखरच अतिशय धाडसाची म्हणावी लागेल.पाटणा गाव चाळीसगावच्या पंचक्रेशित असा समज होता की,पाटणा देवीच्या जंगलातिल वाघ रोज रात्री पाटणा देविच्या जंगलातच असलेल्या मंदिरात देविच्या दर्शना साठी येतो.संध्याकाळ व्हायच्या आतच पुजारीच काय पण एकही माणूस वाघाच्या भितीने तिथे राहत नसे.अशा वेळी नानााहेबांनी रात्रिच्या वेळी पाटणा देविच्या मंदिरात सहल घेऊन जायचे व तेथे देवि जवळ मु्क्काम करायचा आणि या भ्रामक समजुतिची शहानिशा करून घ्यायची म्हणून सहलिची सुचना मुलांना दिली.अर्थातच बरयाच पालकांनी या गोष्टीला विरोध केला.अशा प्रतीकूल परिस्थिती तही 50/60 विदयार्थी पालकांच्या सहमतीने सहलिस जाण्यास तयार झाले.संध्याकाळच्या वेळी चाळिसगांवहून पायीच पाटणा देविकडे निघाले.आणि रात्रि वाघाची वाट बघत सर्वजण तेथिल पायरयांवरच  बसले.सारया विदयार्थ्याच्या चेहरयावर भय व कुतुहल दाटले होते.अशातच जंगलही काळोखाने अधिक गडद होऊ लागले.आता वाघ पाणी प्यायला येईल,मग येईल अशी वाट पाहता पाहता सर्वांचे डोळे कधि लागले ते कळलेच नाही.जाग आली तेव्हा पहाट झालेली होती.या त्यांच्या धाडसी प्रयोगातून विदयार्थ्यांचे आत्मिक बळ तर वाढलेच,पण त्यांच्यातील अंधश्रध्दा देखील दुर झाली. म्हणून एक प्रयोगशिल व्यक्तिमत्व म्हणणे उचित ठरेल.                                   नानासाहेबांनी काढलेली सहल विदयार्थ्यांना व्यवहारग्यान व प्रामाणिकपणा यांचे धडेही देत असे.या सहलीच्या खर्चाचा हिशेब मुलेच ठेवित व सहलिहून परतल्या नंतर आलेला खर्च सुचना फळ्यावर लावीत व सहलीची वर्गणि शिल्लक राहिल्यास ती तत्परतेने लगेच परत करित.'A man of truth,must also be a man of care.'(सत्यप्रिय माणसाने अतिशय दक्षतापूर्वक वागायला हवे)हा गांधीजींचा सिध्दांत जणू नानासाहेब आपल्या दैनदिन आचरणातून प्रकट करित होते.
          राष्ट्रीय विदयार्थ वसतिगृहातील काळ तर नानासाहेबामच्या जीवनातील सोनेरी काळ म्हणावा लागेल. व्हर्नाक्यूलर फायनलचे चाळीसगाव  हे केंद्र झाल्या नंतर तालुक्यातील विद्यार्थी परिक्षेसाठी चाळीसगावला येत.त्यांचा पडाव राष्ट्रिय विद्यार्थी वसतिगृहात असायचा.आलेल्या विद्यार्थ्यांची जेवणाची,राहण्याची अतिशय अल्पदरात तेथे व्यवस्था व्हायची.त्यांना अभ्यासा बाबत जिव्हाळ्याने मार्गदर्शन मिळायचे व म्हणून फायनलची परिक्षा देतांना त्यांना कोणतीही अडचण उरत नसे.
          परिणामत:  नानासाहेबांची ओळख हळूहळू सबंध चाळिसगाव तालुक्यात होत गेली व पुढे राष्ट्रिय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना नानासाहेबांकडून घडून आल्या नंतर या मंडळाला ग्रामिण भागातिल विद्यार्थ्यांचे नागरिकांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळत गेले.दि.31 डिसेंबर 1953 रोजी या मंडळाला शासनाची अधिकृत मान्यता मिळाली. येथूनच त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण पर्वाला प्रारंभ झाला असे म्हणने वावगे ठरणार नाही.वसतिगृहात राहत असतांना विदयार्थ्या मध्ये शिस्त व स्वावलंबनाची भावना रूजावी म्हणून नानासाहेब सतत प्रयत्नशिल असत.वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी चराचे संडास बांधलेले असत.त्यात जमा होणारे सोनखत ते स्वत:च्या हातांनी उपशित.साहजिकच विद्यार्थीही  या कामा साठी पुढे येत.हे सोनखत बैलगाडीत टाकून त्याची विक्री केली जाई.इतक्या बारीक सारीक गोष्टीतून नानासाहेबांनी स्वत: चंदनाप्रमाणे झिजून इतरांनाही कार्यप्रवृत्त केले व संस्थेला अधिकाधिक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले.गांधजी व चुलते कै.हरिभाऊ चव्हाण यांचा सेवाभाव नाना साहेबांच्या नसानसातूव भिनलेला दिसतो.त्याचे प्रत्यंतर नेहमीच येत असते.                                        हळूहळू   संस्थेचा प्रसार व प्रचार होऊ लागला व व्यापही वाढला.कै.हरिभाऊ चव्हाण यांच्या हस्ते चाळीसगाव शहरात खड्डे जीन येथे 1957 मध्ये अतिशय साध्या समारंभाद्वारा राष्ट्रिय विद्यालयाची स्थापना करण्यात आली.
      इ.स.1953 ते 1977 पर्यंतच्या काळात 24 वर्षे चिटणीस म्हणून तर पुढे 9 वर्षे उपाध्यक्ष म्हणून नानासाहेबांनी संस्थेचे काम पाहिले आहे.1987  पासून आजतागायत संस्थेचे कर्तबगार अध्यक्ष म्हणून ते संपूर्ण जळगाव जिल्ह्याला सुपरिचीत आहेत.या काळात संस्थेची झालेली लक्षणिय प्रगती  पुढिल प्रमाणे सांगता येईल.     
   1953-54 साली रू.7,352 असलेला रिझर्व्ह फंड आज(1996-97 )मझ्ये रू.22,76,494 पर्यंत पोहचला आहे.संस्थेची जिंदगी (मालमत्ता) रू.10,784 वरून रूपये 3,10,36,840 पर्यंत गेली आहे.सुरूवातीला 1953-54 व 1957-58 या दोन्ही वर्षात  संस्थेचा आँडिट वर्ग'ब' होता.नंतर 1961-62 पासून ते आजतागायत सातत्याने संस्थेचा आँडिट वर्ग 'अ' आहे.ही बाब विशेष उल्लेखनिय आहे.
         चाळिसगाव शहर व संपूर्ण तालूका त्याच प्रमाणे भडगाव व पाचोरा तालूक्यात मिळून-1वरिष्ट महाविद्यालय(राष्ट्रिय कला,विग्यान व वाणिज्य महाविद्यालय,चाळीसगाव),5 कनिष्ट महाविद्यालये,25 माध्यमिक शाळा,1 अंधशाळा,2 आश्रमशाळा ,2 प्राथमिक शाळा,1 राष्ट्रिय संगणक अभ्यास केंद्र,9 मुलांमुलिची वसतिगृहे व बालक मंदिरे अशा प्रकारे संस्थेच्या एकूण 46 शाखा आज कार्यरत असलेल्या आढळून येतात.
       संस्थेच्या  सुरुवातील 78 असलेली विद्यार्थी संख्या आज 31,429 झाली आहे.तर वसतिगृहातिल त्यावेळच्या एका सेवका ऐवजी आज 853 अध्यापक व सेवक संस्थेचे काम तत्परतेने करीत आहेत.
       संस्था गेल्या काही वर्षा पासून  दरवर्षि सुमारे 10 ते 12 लाखांचि बांधकामे करित आलेली आहे.अजून पर्यंत संस्थेची एकूण बांधकामे 1,54,60,193 रूपयांची झालेली आहेत.
    संस्थेचा इतका मोठा विस्तार होत असतानाही नानासाहेबांच्या स्वाभिमानी व करारी वृत्तीमुळे संस्था कधीही व कुठल्याही राजकीय पक्षाच्या आहारी गेली नाही ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अपूर्व घटना म्हणावी लागेल. नानासाहेबांच्या कर्तबगारीला सर्वसामान्य जनतेने दिलेली ही पावतीच होय.
       वरीलप्रमाणे सर्व दृष्टींनी संस्थेची फार मोठय़ा प्रमाणात प्रगती होत असताना नानासाहेबांना संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे व सेवकांचे सहकार्य नेहमीच मिळाले आहे.पण त्यात नानासाहेबांची भूमिका-                                                        सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता |                               न ऊलासे ,न संतापे ,त्याची  प्रज्ञा स्थिरावली||                      या स्थितप्रज्ञेच्या वर्णनाशी मिळती- जुळती दिसते .अशा व्यक्ती फार तुरळक आढळतात.
      नानासाहेबांच्या अथक परिश्रमांनी शिक्षणाचीही अमृत गंगा चाळीसगाव तालुक्यातील खेडोपाडी, अगदी झोपडी च्या दारापर्यंत पोहोचली आहे असे म्हणणे वावगे होणार नाही.यामुळे विशेषत: खेडय़ापाडय़ातील मुलींनाही शिक्षण प्राप्त करणे सहज शक्य झाले आहे.
        शिक्षण दान करताना नानासाहेबांनी कधीही जाती धर्माचा किंवा स्पृश्याअस्पृश्यतेचा  कुठलाही भेदभाव मानलेला नाही किंवा अशा भेदभावांना चुकूनही कधी थारा दिलेला नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थिती जन्मलेले, वाढलेले अनेक विद्यार्थी
नानासाहेबांच्या परि स्पर्शामुळे उच्च विद्याविभूषित होऊन शासनात आणि शिक्षण क्षेत्रात इतरत्र बहुमानाचे पद भूषविताना आढळून येतात.
        आपल्या सुमारे पन्नास वर्षांच्या सार्वजनिक जीवनात नानासाहेबांनी शैक्षणिक कार्याइतकेच सामाजिक कार्याला ही महत्त्व दिले आहे. पुज्य विनोबाजींच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव त्यांच्या जीवनात आढळतो. शिक्षकांच्या अंगी तीन गुण असावेत असे विनोबाजी म्हणत,
1)  निर्वैरता
2)   नि:पक्षता
3)   नि:स्वार्थीपणा
     नानासाहेबांच्या अंगी हे तीनही गुण सामावलेले आढळतात. 'शाळा आणि घंटा या दोन्ही गोष्टींच्या मर्यादेत शिकवणाऱ्या शिक्षकाला स्वर्गात जागा मिळणार नाही' किंवा 'ज्ञानदान करताना शिक्षकांनी लांबी- रुंदीला नव्हे तर खोलीला महत्त्व द्यावे ' इ. विनोबाजींच्या बहुमोल विचाराचां अवलंब  शिक्षण क्षेत्रात केला जावा असा नानासाहेबांचा आग्रह असतो. 'विनोबा-विचार' हे स्वतःला लाभलेले अमृत आहे अशी नानासाहेबांची धारणा आहे .याच तत्व प्रणालीमुळे महाराष्ट्र आचार्य कुलाचे संघटक आणि कार्यकर्ते श्री मामा क्षीरसागर यांच्या आदनेने 1972 पासून नानासाहेबांनी चाळीसगाव तालुक्यात आचार्य कुलाचे संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली व15 वर्षे कार्यकारीणीत सदस्यत्वही भूषविले आहे.
      1951मध्ये पवनार येथे संत विनोबाजींच्या सहवासात शिबीरार्थी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य नानासाहेबांना मिळाले होते.ऋषी शेती व कांचन मुक्ती शिबिरात विनोबाजींचे बहुमोल मार्गदर्शन व शरीर श्रमाचे त्यांनी विषद केलेले महत्त्व यांचा मोठा लाभ सदर शिबिरात नानासाहेबांना झाला. हातात कुदळ व डोक्यावर पाटी घेऊन सर्वस्व विसरून तना-मनाने काम करणारे विनोबा व सायंकाळी शिबिरार्थी पुढे प्रवचन करताना हाती टाळ घेऊन भजनात दंग होणारे विनोबा ही त्यांची रुये नानासाहेबांच्या अंतकरणावर कायमची कोरली गेली आहेत.
          विनोबांनी भजनात म्हटलेल्या संत एकनाथांच्या काही ओव्या आजही नानासाहेबांच्या स्मरणात आहेत ते म्हणतात,        साखर दिसे परी गोडी न दिसे |                                             ती काय त्या वेगळी असे?                                                   तैसा जनी आहे जनार्दन |                                               त्याते पहावया सांडी अभिमान ||     

कापूरा अंगी परिमळू गाढा|                                           पाहाता उघडा केवी दिसे?                                               पाठ-पोट जैसे नाहीची सुवर्णा |                                        एका जनार्दनी त्यापरी जाणा ||     
      परमेश्वराचे अस्तित्व जर शोधायचे असेल तर ते सर्वसामान्य जनतेत शोधा, त्यांची सेवा करा ,पण ती सेवा मनापासून निरपेक्ष बुद्धीने करावी.त्यात अहंकार नसावा. असे ते सांगत. म्हणूनच पुढे ते नामदेवाचा दाखला देतात                                        नामा म्हणे बा केशवा |        
जन्मोजन्मी द्यावी सेवा ||                                    नानासाहेबांच्या सेवेत ही दृष्टी प्रामुख्याने दिसून येते. संत विचारांचा त्यांच्या मनावर झालेला हा संस्कार त्यांना यशस्वीतेकडे तर नेत नसेल ना! 
    नानासाहेबांचे चुलते कै. हरिभाऊ चव्हाण हे त्यागी व ध्येयवादी कार्यकर्ते होते. काँग्रेस व गांधीजींच्या कार्यावर त्यांची अपार निष्ठा होती. सार्वजनिक सेवा धर्म त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू होता. सानेगुरुजी , सरदार वल्लभभाई सारखी ज्येष्ठ मंडळी त्यांच्या रांजणगावी त्यांना आवर्जून भेटायला येते. या संपूर्ण वातावरणाचा लाभ नानासाहेबांना खूप झाला.कै.हरिभाऊंमुळेच
  विनोबांशी प्रत्यक्ष संबंधही आला.कै. हरिभाऊंचे व विनोबाजींचे तर जिव्हाळ्याचे स्नेह संबंध होते .दर महिन्याला 18 तारखेला हरिभाऊ विनोबाजींना पत्र लिहीत व विनोबाजी त्याचे उत्तर न चुकता पाठवीत. पवनार शिबिराहून परततांना कै. हरिभाऊंनी व नानासाहेबांनी विनोबाजींजवळ संदेशासाठी आग्रह धरला होता तेव्हा विनोबाजींनी 19-2-51रोजी खालील संदेश दिला होता.
  "हरिभाऊंचे रांजणगाव आदर्शच असले पाहिजे.आदर्श गावात पाचांची पंचायत असलि पाहिजे.पाच माणसांची नव्हे पाच गुणांची-
   1)प्रेमभाव
    2)निर्भयता
     3)उद्योग
       4)स्वच्छता
          5)शिक्षण
  या पाचांच्या पोटात काय येत नाही?ग्रामराज्य आणि रामराज्य यांनिच साधायचे."
   अंतकरणात विनोबाजीं विषयी अतिशय भक्ति व आदरभाव असल्या मुळे नानासाहेब विचारात आणि आचारात अगदि 'विनोबामय' झालेले दिसतात.

 भुदान यात्रेत फिरतानां  विनोबाजी जळगाव जिल्ह्यात आले असता रांजणगाव व चाळीसगाव पाडावाची जबाबदारी नानासाहेबांनी चोखपणे पार पाडली होती.इतकेच नव्हेतर मराठवाड्यातिल भांबरवाडी ते खांदेशातिल तरवाडे पर्यंत भूदान पदयात्रेत ते कर्तव्यबुद्धीने सामीलही झाले होते.विनोबाजी विरचीत 'गिताई' व संताचा 'प्रसाद' अजुनही नानांच्या हातातिल पिशवित कायम स्वरूपि दिसतात.वेळमिळेल तेव्हा आजही भक्तिभावाने ते त्यांचे वाचन करित असतात.विनोबांच्या विचार निष्ठेवर आधारित "मैत्री" मासिकाचे ते जुने जिव्हाळ्याचे वाचक आहेत.
      याच वैचारिक निष्ठेने नानासाहेबांनी गीता-प्रतिष्ठान तर्फे संचलित ' गीताई-शिबीर' चाळीसगाव येथे आयोजीत केले होते.राष्ट्रपति पारीतोषिक विजेते प्रा.प्र.द. पुराणिक ,बालविकास मासिकाचे संपादक श्री.यशवंत क्षीरसागर यांचे विशेष मार्गदर्शन प्रस्तुत शिबीरात लाभले होते.'गीताई' चे अमृत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विशेषत: विद्यार्थ्यां पर्यंत पोहचविणे ही मोठी तळमळ नानासाहेबांना लागली आहे.याच दृष्टीकोनातून चाळीसगाव येथिल अंधशाळेत ,सामाजिक कार्यकर्ते श्री.रामभाऊ  शिरुडे यांचे हस्ते गीताई अभ्यास केंद्राचे उदघाटन  करण्यात आलेले आहे.प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक अविरत धडपड ,अविरत कार्य करित राहणे हा नानासाहेबांचा जणू स्वभाव धर्मच  बनला आहे.
       विनोबाजीं प्रमाणेच साने  गुरूजी  हे देखील नानासाहेबांच्याजीवनाचे एक दैवत होय.साने गुरूजींचे जीवन त्यांना सतत प्रभावीत करीत आले आहे.

      खरा तो एकची धर्म
       जगाला प्रेम अर्पावे |
या त्यांच्या गीतात वर्णिलेल्या अवघड प्रेमधर्माचे पाईकपण ज्या थोडयांनी सहज स्विकारले आहे.त्यात नानासाहेबांचा अंर्तभाव  होतो. याच मनोभुमिकेतून नानासाहेबांची अखिल भारतीय कथामालेशी जवळिक निर्माण झाली व अलिकडे कित्येक वर्षे कथामालेच्या मध्यवर्ति मंडळाचे कोषाध्यक्ष म्हणून ते बहूमोल जबाबदारी पार पाडत आहेत.कथामालेच्या दूरदूरवर होणारया अधिवेशनांना ते आगत्याने उपस्थित राहतात.कसल्याही बाबतीत कधिही नानासाहेबांनी तक्रार केल्याचे आम्हाला आठवत नाही .त्यांच्या गरजा अतिशय मोजक्या असल्या मुळे ,कुठल्याही परिस्थितीशी ते सहज जमवून घेऊ शकतात.
नानासाहेबांचे बोलणे नेहमी मोजके व अनाक्रमक असते.त्याचा उगम अंत:करणातून असल्या मुळे ते दुसरयाच्या मनाला आकर्शित करू शकते.नानासाहाबांना दुसरयाची अकारण निंदा करतांना , कुणाशी अभिमानाने उंच्च स्वरात बोलतांना पाहिल्याचे कुणाला आठवणार नाही.त्यांचे हे विलोभनिय व्यक्तिमत्व कथामालेचे भुषण ठरले आहे.
    कथामालेचे 22 वे अधिवेशन 22 ते 24 फेब्रूवारी1983 मध्ये चाळीसगाव येथे भरवण्यात नाना साहेबांनी जीवापाड परिश्रम घेतले होते.परंतु तरिही स्टेजवर येण्याचा हव्यास त्यांनी कधी बाळगलेला नाही.सर्वसामान्य कार्यकर्त्या प्रमाणे संपूर्ण अधिवेशनाच्या नियोजनात ते दंग होऊन गेले होते.
       इ.स.1995 मध्ये झालेल्या कथामालेच्या मालवण अधिवेशनाच्या पूर्व तयारी साठी फोंडाघाट ,कणकवली परिसरात त्यांनी स्वत: पदयात्रा काढली होती.तसेच मराठवाड्यातील दुर्देवी भूकंपग्रस्तांचे मनोबल वाढविण्यासाठी कथामाला आयोजीत 'भावजागरण' दिंडीत नानासाहेब उत्स्फुर्तपणे सामील झाले होते.विनोबा जन्म -शताब्दी निमित्ताने कथामाला संघाने केलेल्या संकल्पानूसार-
1)विनोबाजींच्या आश्ररमातून प्रसध्द होणारया 'मैत्री'                  मासिकाचे   100 वर्गणीदार बनविणे.
2)'गिताई'  च्या दहा हजार प्रति व गीता प्रवचनांच्या 500 प्रती     खपविणे.
3)विनोबा गीताई अभ्यास केंद्राची निर्मिती करणे.
           हे तिन संकल्प नानासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने सिध्द केले आहेत. स्वभावत: कमी बोलणारया नानासाहेबांच्या कर्तृत्वाचा हा बोलका विजय होय!
      कथामालेने शालेय विदयार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या साने गुरूजी आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नानासाहेब दर 24 डिसेंबरला साने गुरूजी जयंती निमीत्ताने करित असतात.विदयार्थ्यांच्या अंगी साने गुरूजींचा आदर्श उभा रहावा, हा  त्यांचा या मागील हेतू असतो.
                      साने गुरूजींच्या आंतर भारतीचा विचार आजच्या काळात अतिमहत्वाचा असल्यामुळे कै.चंद्रकांत शहा यांनी सुरू केलेल्या 'गुजरात दर्शन' आंतरभारताच्या यात्रेत आपल्या शाळेतील शिक्षकांना नानासाहेब न चुकता सामील व्हायला सांगत असतात.आपल्या शिक्षक मित्रांना नव वैचारीक दर्शन घडावे हा यामागील हेतू असतो.
     याच आंतर -भारती विचारांच्या अनुषंगाने साने गुरूजी परिवाराच्या विद्यमाने चाळीसगाव येथे नानासाहेबांनी 1 जानेवारी 1976 पासून कानडी ,बंगाली,गुजराथी भाषांचे अध्ययन करण्या साठी खास अभ्यासवर्ग उघडले होते.सदरील वर्ग पुन्हा चालविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
   अशा रितीने साने गुरूजी ,विनोबांजीच्या विचारांनी भारावलेला हा निरपेक्ष,सेवाभावी कार्यकर्ता आपल्या धिर गंभीर
व निश्चयी कृती मुळे व आरशा प्रमाणे प्रामाणिक पारदर्शक व्यवहारा मुळे सर्वांना आकर्षित करून कथामालेच्या कार्याला नवा उजाळा देत आहे.असे म्हणने अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
       नानासाहेबांनी मागील वर्षि दि. 7-1-1996 रोजीचा आपला 74 वा वाढदिवस कुठल्याही मान -सन्मानाला विरोध करून केवळ प्रकाशभाई मोहाडीकरांच्या हस्ते शाल श्रीफळ स्विकारून साजरा केला होता .ही गोष्ट लक्षात ठेवण्या सारखी आहे.
     मा.नानासाहेबांच्या अमृतमहोत्सवा निमित्त राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ आपण जमवलेल्या निधी मधून संस्थेसाठी अद्ययावत छापखाना उभारणार आहे.
  अखिल भारतिय साने गुरूजी कथामालेचे कार्यकर्ते अमृतमहोत्सवा निमित्त त्यांनी जमवलेल्या पैशातून साने गुरूजी भवनाची निर्मिती करणार आहेत. साने गुरूजी भवनात साने गुरूजी वाचनालय ,कार्यालय ,सभागृह आणि बाहेर गावाहून येणारया कार्यकर्त्यां साठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था असेल.
         संस्थेतिल माजी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते त्यांनी संकलीत
केलेल्या निधीमधून स्वावलंबन वसतीगृहाची निर्मिती करून हे वसतिगृह संस्थेला अर्पण करतील.
   साने गुरूजी कथामालेच्या कैर्यकर्त्यांनी या पूर्वी विनोबा जन्मशताब्दि निमित्त 'गीताई अभ्यास केंद्राचे' उद् घाटन केले आहे.तसेच महात्मा गांधी जन्मशताब्दी निमीत्त निसर्गोपचार केंद्र उभारण्याचीही मनिषा व्यक्त केली आहे.साने गुरूजी भवनाची निर्मिती केल्या नंतर या दोन्ही उपक्रमांची योग्य ती उभारणी करण्याचे साने गूरूजी कथामालेच्या कार्यकर्त्यांनी निश्चित केले आहे.
   विशेष उल्लेखनिय आणि आनंदाची बाब म्हणजे दिनांक 11 जून 1997 रोजी वर उल्लेख केलेल्या संकल्पातील साने गूरूजी वाचनालय हा एक संकल्प प्रसिध्द सामाजीक कार्यकर्ते अँडव्होकेट हिरालालजी चव्हाण यांचे हस्ते उद् घाटन करून तडीस नेला.
    ग्रामीण भागातून शहरात येऊन स्वत:ची उन्नती साधणारे अनेक जण आपल्या जन्म गावाला विसरून जात असतात.नानासाहेब अशांपैकी नव्हेत.त्यांनी जन्मगावी रांजणगाव येथे ग्राम सेवा मंडळ स्थापन करून तेथे ग्रामोध्दाराचे विविध उपक्रम  राबविले आहेत.रांजणगाव येथे जिल्हा लायब्ररी संघाचे अधिवेशन भरविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.रांजणगाव शेजारी 'लोंजे मजूर सहकारी मंडळ ' या संस्थेचे आरंभी कार्यकारीणी सदस्य व नंतर अध्यक्ष या नात्याने त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.श्री क्षेत्र वालझिरी वारकरी संस्था पिंपरखेड,ता. चाळीसगांव  या संस्थेचे गेली 34 वर्षे नानासाहेब विश्वस्त व कार्यकारीणी सदस्य म्हणून काम पाहत आहेत .हे त्यांच्या लोकप्रियतेचे गमकच म्हणावे लागेल.
   शिक्षण क्षेत्रात शिक्षकांचे महत्व असाधारण होय.शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे,शासना कडून शिक्षकांच्या हितसंबधांचे रक्षण व्हावे म्हणून नानासाहेब सतत झगडत आले आहेत. विद्यार्थ्यां साठी आखलेल्या नविन अभ्यास क्रमात शिक्षण पध्दतिला उत्तम दिशा मिळावी म्हणून ते सतत  प्रयत्नशिल  असतात.महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक संघ महामंडळ कार्यकारीणित 1971 पासून नानासाहेब सुमारे 10 वर्षे कार्यकारीणीत सदस्य आहेत.शिवाय जळगांव जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या कार्यकारिणीत संस्थापक,सदस्य, व चिटणीस म्हणून त्यांनी तीन वर्षे जबाबदारी स्विकारली होती. या संघाचे अधिवेशन चाळीसगाव येथे यशस्वि करण्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता.जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाची स्थापना व्हावी म्हणून नानासाहेबांनी केलेले प्रयत्न अनेकांना ठाऊकच असतील.
      विद्यार्थ्यांच्या व्यवसायिक आणि शारिरिक शिक्षणावर नाना साहेब नेहमी भर देत असतात..विद्यार्थ्यांनी या योगे स्वत:च्या पायावर उभे राहून आपले जीवन स्वयंभू वृत्तीने जगावे .असा त्यांचा आग्रह असतो.मा.मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री असतांना स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य तांत्रीक एज्युकेशन बोर्डाचे नाना साहेब तीन वर्ष सदस्य होते. चाळीसगाव तालुक्यात तांत्रीक शिक्षण देणारे एकमेव केंद्र नानासाहेबांनी सुरू केल्या मुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना हे शिक्षण घेण्याची व स्वत:चे जीवन घडविण्याची संधी मिळाली.
     राष्ट्रिय क्रिडा मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून नानासाहेब आज महत्वाची कामगिरी बजावत आहेत.या मंडळा तर्फे चाळीसगाव येथे महाराष्ट्र राज्य स्तरीय स्पर्धांचे दोन वेळा यशस्वी आयोजन करण्यात आले.
   आपल्या सार्वजनिक सेवाव्रताचे आचरण करतांना नानासाहेब अंध -अपंगांना विसरलेले नाहीत . आपल्या संस्थेत श्री. हिरालाल चव्हाण यांनी स्थापन केलेल्या अंधशाळेत तसेच अंधाच्या समस्यांना वाचा फोडण्या साठी चाळीसगाव येथे अखिल महाराष्ट्र तृतिय अंधजन अधिवेशन भरविण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.सदर ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन मा. नानासाहेब गोरे यांच्या हस्ते झाले होते.ही गोष्ट चाळीसगावचे नागरिक कधिच विसरणार नाहीत.
      या शिवाय ब्लांईंड मेन्स असोशिएशन ,मुंबई व अंधशाळा, चाळीसगाव या संस्थांच्या विद्यमाने त्यांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे अखिल महाराष्ट्र ब्रेल वाचन स्पर्धा चाळीसगाव येथे आयोजित केल्या होत्या.
                चाळीसगाव येथील डोळ्यांच्या धर्मार्थ दवाखान्यात 1965 पासून आजतागायत कार्यकारी सदस्य व मानद सहसचिव म्हणून नानासाहेब काम पहात आहेत.डोळ्यांच्या दवाखान्याची स्वच्छता,आवारातील वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, साफसफाई या बाबतित नानासाहेबांच्या सुविद्य पत्नी सौ.सुशिला ताई कन्या शाळेतिल विद्यार्थीनींच्या सहकार्याने या कार्याला हातभार लावला.ही गोष्ट नमूद करण्या जोगा आहे.
         नानासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाचा आढावा त्यांच्या अमृत महोत्सवा- निमीत्त घेतांना काहीसे आश्चर्य वाटल्या खेरीज राहत नाही.हे एकट्यादुकट्याचे काम नव्ह !  एक कुठली तरी महान शक्ति नानासाहेबांच्या रूपाने कार्यरत आहे यात शंका नाही.ईश्वराच्या हातातिल आपण एक साधन आहोत , हीच नानासाहेबांची स्वत:विषयीची धारणा होय.
      वाचकांच्या ध्यानात आले असेल की, एका आगळ्या वेगळ्या संत प्रवृत्तीने नानासाहेबांचे जीवन अलंकृत झालेले आहे.अशा वृत्तीला देश-काळाच्या सीमा नसतात किंवा प्रादेशिक बंधनेही नसतात .1977 या वर्षी जेव्हा आंध्रप्रदेशात भीषण वादळ झाले, तेव्हा नानासाहेब सहज प्रेरणेने तथे धावले व अवनिगुड्डा केंद्रात दाखल होऊन त्यांनी अपादग्रस्तांची सेवा केली.
   अखिल भारतीय सानेगुरूजी कथामालेने म. गांधींचे पाचवे मानस पुत्र थोर देशभक्त स्व.जमनालालजी बजाज यांच्या जन्मशताब्दी निमीत्ताने पाच लाख मुलांना त्यांचे जीवन चरित्र
गोष्टी रूपाने सांगण्याचा संकल्प केला होता.स्व.जमनालाल बजाज यांचे राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामात असलेले मोलाचे योगदान,त्यांची देशभक्ति,त्याग,सेवा आणि रचनात्मक कार्य यांची माहीती नविन पिढीला व्हावी आणि त्या पासून काही प्रेरणा मिळावी या दृष्टीने एक प्रकल्प या कथामालेने हाती घेतला होता.
         या प्रकल्पा नुसार दि.4 ते 7 जानेवारी 1991 असा दौरा विविध शाळांमधून चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल या तालुक्यात आयोजीत केला होता.या दौरयाच्या वेळी श्री यदुनाथ थत्ते, श्री.यशवंत क्षीरसागर, श्री. मधु नाशिककर, श्री. राम मोहाडीकर, श्री प्रकाश मोहाडीकर, श्री.दामोदर मराठे इ. कथामालेचे कार्यकर्ते हजर होते.
       या दौरयाची संपूर्ण जबाबदारी चाळीसगाव कथामाला संघाने घेतली होती.या प्रकल्पा साठी कथा निवेदक तयार करण्याच्या दृष्टीने शनिवार दि.23 व रविवार दि.24 सप्टेंबर रोजी एक शिबीर राष्ट्रिय विद्यालयाच्या तांत्रिक विभागात आयोजीत करण्यात आले होते.या शिबीरास जवळजवळ 40 कार्यकर्ते उपस्थीत होते.ही गोष्ट निश्चितच अभिमानास्पद  आहे.
   1997 साली सुरू झालेल्या भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव हे नानासहेबांच्या कल्पकतेला व कतृत्वा मिळालेले मोठे आव्हानच होते.9आँगस्ट ते 18 आँगस्ट 1997 या काळात संस्थेच्या  सर्व शाळांच्या परिसरातिल शिक्षकांनी,विद्यार्थ्यांनी व कथामालेच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानाचा आनंद मिळविला आणि सुमारे हजारभर झाडे लावली.या आगळ्या वेगळ्या उपक्रमा मुळे चाळीसगावात एक नविन उत्साहाचे वातवरण निर्माण झाले.
       साधारणत: द्रव्य बळाच्या सहाय्याने कार्य सिध्दीस नेण्याचे प्रयत्न चहूकडे चाललेले असतात.परंतु द्रव्यबळा ऐवजी मानवी मनाला प्रेरणा देऊन त्यांची श्रमशक्ति जागृत करणे व तिच्या बळावर प्रचंड कार्य यशस्वी करण्या कडे नानासाहेबांचा कल असतो.श्रमाधिष्टीत कार्य सिध्दीला जात असतेच पण त्याही पलिकडे जनशक्तिचा मोठा आधार त्यामागे   उभा राहत असतो.नानासाहेबांना मिळालेल्या यशाचे हे फार मोठे गमक 
होय . 
          त्यांच्या यशात त्यांच्या अर्धांगिनीचा  सौ सुशीला बाईंचा किती मोठा वाटा आहे, याची जाणीव नानासाहेबांच्या मित्रांना व स्वतः नानासाहेबांना आहे.
    सौ. सुशीला बाईंचे माहेरचे नाव लिलाबाई असून 1952 साली विवाहाच्या वेळी त्या फक्त आठवी पर्यंत शिकलेल्या होत्या. पुढे नानासाहेबांच्या प्रोत्साहनाने त्या मॅट्रिक झाल्या व राष्ट्रीय कन्या छात्रालयाच्या व्यवस्थापिका म्हणून त्यांनी किमान वीस वर्षे विनामूल्य काम सांभाळले. छात्रालयाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यात ही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.               नानासाहेबांच्या या प्रचंड कार्या मुळे त्यांच्या घरी सतत कार्यकर्त्यांची वर्दळ असे. अशावेळी आलेल्या पाहुण्यांचे योग्यप्रकारे आदरातिथ्य करून संसार धर्माची सारी कर्तव्ये त्यांनी अगदी आनंदाने उत्साहाने पार पाडली. म्हणूनच त्यांच्या या असलेल्या पण दिसत नसलेल्या कार्याचा उल्लेख या प्रमाणे करावा लागेल,
                  'आहे तरी सर्वा ठायी
                 पाहो जाता कोठेची नाही|'
 गांधी विचारांवर वाढलेल्या नानासाहेबांनी 1938 पासून म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षापासून खादीचे व्रत स्वीकारले, 1946 पर्यंत तर स्वतः कातलेल्या सुताचे वस्त्र धारण करीत. यातून ते वस्त्र स्वावलंबनाचे पालन करताना दिसतात .पुढे कार्यबाहुल्यामुळे स्वतः सूतकताई करणे जरी जमत नसले तरी खादीची पांढरी स्वच्छ वस्त्र हे नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक अविभाज्य अंग बनले आहे.
     नानासाहेबांच्या बाबतीत आणखी एक विशेष येथे नमूद करावासा वाटतो की स्वातंत्र्यसैनिक असूनही शासनाची कोणतीही सवलत न स्वीकारता ते अत्यंत स्वाभीमानाने, प्रामाणिकपणे, स्वावलंबनाने जगत आहेत. हे पाहून त्यांच्या विषयीचा आदर अधिकच दुणावतो. 
    अत्यंत गौरवाची आणि आनंदाची बाब म्हणजे नानासाहेबांच्या आयुष्यभराच्या अथक परिश्रमांची परिपूर्ती म्हणजे नुकताच 'राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ मर्यादित' या संस्थेला 1997 98 चा' साने गुरुजी बाल सेवा पुरस्कार' अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई तर्फे 25000 रोख, प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह या स्वरूपात यवतमाळ च्या अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या निवड समितीत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, प्राचार्य श्री. राम शेवाळकर ,प्राध्यापक ग.प्र प्रधान, श्री यदुनाथ थत्ते ,श्री. राम मोहाडीकर यांचा समावेश आहे.
 नानांच्या शैक्षणिक कामाची समाज जागृत पणे नोंद घेत आहे याची आनंददायी जाणीव होते ती त्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या नाशिक मधील सारडा प्रतिष्ठानच्या 'नंदिनी' पुरस्कारामुळे रू.25,000/- रोख व प्रशस्तीपत्रक यांचा समावेश असलेला'नंदीनी पुरस्कार 1998 सन्मानार्थी' निवड समितीत विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री मधुकरराव चौधरी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्री. अजय मेहता, डॉक्टर निंबा कृष्ण ठाकरे  (पुणे विद्यापीठ) या तीन सदस्यांचा समावेश आहे. नानांना लाभलेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या शैक्षणिक कामाच्या यशो मुकुटातील आणखी एक शिरपेचच होय.                 नानासाहेब यांची जीवनगाथा म्हणजे शून्यातून अनंताकडे झेपावलेला, कधीही न संपणारा प्रवास आहे. चिरंतनाचा ध्यास त्यांना आहे. परंतु ते चिरंतन -तत्त्व गिरी कपारी किंवा एकांतवासात न  राहता बहुजन समाजात त्याचा साक्षात्कार करून घेण्याची असोशी त्यांनी बाळगली आहे . जितक्या उत्कटतेने व  भक्तीने ते एखाद्या मंदिरात प्रवेश करतात तितक्याच उत्कटतेने व श्रद्धेने ते एखाद्या शाळेत किंवा एखाद्या कार्यक्रमात भाग घेतात . समोरील व्यक्तीत दडलेल्या ईश्वर धुंडाळण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न चाललेला असतो.                  या प्रयत्नात नानासाहेब किती यशस्वी झाले आहेत हे त्यांचे त्यांनाच ठाऊक ! कारण त्यांना मिळणाऱ्या आनंदाचे किंवा यशाचे मोजमाप करणे आपल्या शक्ती पलीकडचे आहे . पण इतके मात्र खरे की संतांच्या कृपेने व गांधी, विनोबा वरील निष्ठेने चैतन्यशील झालेले नानासाहेबांचे अंतकरण त्यांच्या सुखी समाधानी कौटुंबिक जीवनात व कृतार्थ सार्वजनिक जीवनात प्रतिबिंबित झालेले दिसत आहे.                                     नानासाहेबांचा हा आनंद सतत वर्धिष्णू रहावा,त्यांचे स्वतःचे व त्यांच्या परिवाराचे जीवन सुखी, निरामय रहावे व जन्म सामान्यांशी त्यांनी जोडलेले स्नेहबंध अधिकाधिक बळकट व व्यापक होत जावेत, हीच इच्छा त्यांच्या अमृतमहोत्सवी प्रसंगी आम्ही नम्रपणे प्रकट करू इच्छितो ! !
 
  
            
                    
           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षण दाता : नानासाहेब(डाॅ.प्रकाश जी.पाटील ,जुना मालेगांव रोड,चाळीसगाव)

  सर्वप्रथम प्राचार्य मा . श्री . बाळासाहेब चव्हाण यांचे  आभार मानतो . त्यांनी मला शिक्षणमहर्षी शिक्षणदाता मा . श्री . नानासाहेब य . ना . चव्हाण यांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची संधी दिली .       समाजात क्रांती , परिवर्तन , समाजाला योग्य दिशा , नवा पायंडा , समाजकार्यासाठी सर्वस्वी जीवन अर्पण करणारे जगाच्या पाठीवर फार थोड्या व्यक्ती जन्माला येतात . कर्मवीर भाऊराव पाटील , महर्षि विठ्ठल रामजी शिंदे , साने गुरुजी इ . यांच्या सारख्या व्यक्तिंनी समाजपयोगी कार्य केलं . त्यांचा वारसाही ठराविक व्यक्ती चालवत आहे . त्यापैकी एक नानासाहेब . नानासाहेबांनी चाळीसगाव शहर व पूर्ण ग्रामीण भागात शिक्षणाचा दिवा घरोघरी पेटवून मुलामुलींना शिक्षणाचा परिसस्पर्श देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे .  अन्नम् दानम् महादानम् ।  विद्यादानम् महत्तमम् ॥  न अन्येय क्षणिका तृप्ती ।  यावत जिवतू विद्यया ॥      या उक्तीचा परीपूर्ण उपयोग करणाऱ्या चाळीसगाव परिसराच्या कान्याकोपऱ्यात दीन , दलीत , मागास , होतकरु , अंध विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची गंगोत्री त्यांच्य...

चाळीसगावच्या शैक्षणिक क्षेत्राचे आधारवड मा.य.ना.तथा नानासाहेब चव्हाण(प्रा.राजेंद्र वसंतराव देशमुख पत्रकार,स्तभलेखक,जळगाव)

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील एक आर्थिक , व्यावसायिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न तसेच चांगल्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभवी सांस्कृतिक वारसा लाभलेल तालुक्याच गाव - जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस ,   थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या स्मृतींचा सुगंध अजूनही या परिसरात दरवळतोय . आज चाळीसगावात अनेक मान्यवर शिक्षण संस्था कार्यरत आहेत . त्यापैकी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि . , ही एक अग्रेसर शिक्षण संस्था ! श्री . य . ना . तथा नानासाहेब चव्हाण हे या संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान चेअरमन , येत्या ७ जानेवारी १ ९९ ८ रोजी नानासाहेबांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस चाळीसगाव नगरीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतोय , या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त समस्त शिक्षणप्रेमीच्या वतीने आदरणीय नानासाहेबांचे अभिष्टचिंतन !      या गौरव सोहळ्याचे खरं तरं कृतज्ञता सोहळ्याचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाणांनी स्नेहपूर्वक पाठविलेले निमंत्रण हाती पडले त्याच दिवशी दै . सकाळ मध्ये नानासाहेबांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'नंदिनी...