आज देशात एक प्रकारची अस्थिरता दृश्यमान होत आहे. राजकीय व सामाजिक जीवनात प्रचंड उलथापालथ होत असल्याने देशाचे भवितव्य अंधकाराच्या गर्तेत सापडल्यासारखे दिसत आहे. अशा परिस्थितीतही सामाजिक बांधिलकीने, वैचारिक निष्ठेने व अथक कर्तृत्वाने ,परिश्रमाने पाय रोवून खंबीरपणे कार्यरत असलेले अनेक थोर पुरुष आढळतात.आशांमध्ये चाळीसगावचे श्री. यशवंत नारायणराव उर्फ नानासाहेब चव्हाण यांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल.
वयाच्या पंचात्तरीतही युवकांना लाजवेल असे काम ते जिद्दीने व नीरपेक्ष भावनेने करीत आहेत.गेली पन्नास वर्षे जळगाव जिल्ह्यात विशेषता चाळीसगाव, भडगाव ,पाचोरा या तालुक्यातून विद्यालये ,महाविद्यालये, आश्रमशाळा ,अंधशाळा इत्यादी समाजाभिमुख उपक्रमांद्वारे ज्ञानप्रसार करणारी 'राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमीटेड चाळीसगाव' ही संस्था नानासाहेबांच्या कर्तृत्वाचे साक्षात प्रतीक होय.
कुठल्याही सत्ता लोभाला ,प्रसिद्धीचा हव्यासाला व वैयक्तिक लोभाला वश न होता नंदादीपाप्रमाणे शांतपणे तेवत राहणे हे नानानसाहेबांचे स्वभाव वैशिॆष्टयच होय. या स्वभावा मुळे मोठा मित्र परिवार, विस्तृत कार्यकर्त्यांवर्ग त्यांना लाभला आहे.इतकेच नव्हे तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम ,सहानुभूती व आदर त्यांना सतत प्राप्त होत आहे.या संस्थेतून निर्माण झालेल्या व आज समाजात विविध उच्च पदावर विराजमान असलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये जी सामाजिक बांधिलकीची जाणीव आढळून येत आहे,तिचे श्रेय नानासाहेबांना द्यावे लागेल .आज शिक्षण संस्थेला लाभलेल्या कार्यकर्त्यांकडे पाहिले म्हणजे 'महाराष्ट्र हे मधमाशांचे मोहोळ आहे'हे गांधीजींचे उद्गार सार्थ झाल्यासारखे वाटतात. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष श्री मधुकररावजी चौधरी, सानेगुरुजी कथामालेचे संस्था पक्षी प्रकाशभाई मोहाडीकर ,सुप्रसिद्ध साहित्यिक व साने गुरूजी कथामालेच्या अध्यक्ष श्री यदुनाथजी थत्ते प्रभूत्तीं सारखी ज्येष्ठ मंडळी नानासाहेबांचा मुक्त कंठाने गौरव करतांना आढळतात.साने गुरूजींच्या शब्दात सांगायचे झाले तर-
"कर्मामध्ये दिव्यानंद
सेवेमध्ये दिव्यानंद
नाही अन्य फळाचा छंद
नाही काही जरूर-
आम्ही देवाचे मजूर........."
हे जणू नानासाहेबांच्या जीवनाचे घोषवाक्यच बनले आहे.अर्थात हे यश नानासाहेबांना सहजासहजी लाभलेले नव्हे!तर त्यामागे त्यांच्या वडिलांची शिकवण ,गुरुजनांचे व वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन, त्यांची स्वतःची कठोर तपस्या कारणीभूत आहे.ही गोष्ट निर्विवाद होय.
दिनांक 7-1-1923 रोजी रांजणगाव, (तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव )येथे जन्मलेल्या नानासाहेबांनी लहानपणापासून जणू गरिबीचा वसाच घेतला होता.त्यांचे वडील नारायणराव हणमंतराव चव्हाण व्यवसायाने शेतकरी होते. त्या काळात पावसाच्या कृपेवर चरितार्थ चालविणाऱ्या शेतकऱ्याला धक्के खाण्याचे ,ओढगस्तीचे प्रसंग वारंवार येत नानासाहेबांच्या घराण्याला वारकरी संप्रदायाचा अमृतस्पर्श पूर्वीपासूनच लाभला होता. त्यांचे वडील संत तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी आदि ग्रथांचे भक्तीभावाने पठण करीत.श्रद्धापूर्वक पंढरपूर ,देहू ,आळंदी इत्यादी पवित्र क्षेत्रांना भेटी देत.धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी होत" आज माझ्या जीवनात मला कार्यरत ठेवणारा ,अनंत अडचणींवर विजय मिळणारा,मला सतत प्रेरणा व उत्साह देणारा जो ब्रम्हरस आहे ,त्याचा उगम माझ्या वडिलांच्या साध्याभोळ्या पण प्रखर भक्तिभावात आहे." असे ते म्हणत.याही पुढे जाऊन नानासाहेबांच्या शब्दांत ,सांगायचे झाले तर ---1961 सालातील गोष्ट . मला आठवते वयाच्या 80 व्या वर्षी माझे वडील पंढरपूरच्या वारीला निघाले .सोबत आपल्या पासोडीत ज्ञानेश्वरी, खांद्यावर घोंगडी ,अनवाणी ,नेसत्या वस्त्रानिशी,बाकी काहीही एक सोबत न घेता ते अगदी निष्कांचन अवस्थेत परमेश्वरावर श्रद्धा विश्वास टाकून रांजणगाव ते पंढरपूर अशी पायी वारी करण्यात यशस्वी झाले नमूद करावेसे वाटते की वारीला निघतांना त्यांनी घरून सोबत पैसे व दशम्या ही घेण्याचे नाकारले."परमेश्वर रस्त्याने माझी संपूर्ण व्यवस्था करील असे ते आत्मविश्वासाने म्हणाले .'ही घटना माझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत सतत प्रेरणादायी ठरणार आहे . त्याचप्रमाणे टाळांचा आवाज माझ्या अंत करणात मांगल्याचे स्पंदन निर्माण करतो असे नानासाहेब कृतज्ञतेने व्यक्त करतात.
नानासाहेबांच्या मातोश्री कै. लक्ष्मीबाई स्वभावत: हो अतिशय कष्टाळू, प्रेमळ व सोशिक होत्या.लहानपणी ऐकलेली प्रेमळ मातेच्या जात्याची घरघर आजही नानासाहेबांच्या जीवनात पथदर्शक ठरली आहे .माता पित्याकडून मिळालेला प्रेमाचा व परमेश्वर निष्ठेचा वारसा नानासाहेबांनी जीवापाड जपला आहे किंबहुना तो सहस्त्र पटींनी वाढवून समाजावर त्यांची मुक्त हस्ताने उधळन करीत आहेत असा अनुभव वारंवार येतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा